वसई: नालासोपारा पश्चिमेतील वाघोली ते शनी मंदिर या रस्त्याच्या कडेला असणाऱ्या उघड्या गटारांमुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अरुंद रस्त्यावर वाहने वळवताना तसेच वाहतूक कोंडीतून वाहन काढताना काही वाहनचालक गटारात पडले असल्याची माहिती रहिवाशांनी दिली आहे.नालासोपारा पश्चिमेतील वाघोली ते शनी मंदिर महत्त्वाचा वाहतुकीचा रस्ता गेला आहे. निर्मळ, वसई पश्चिम आणि महामार्गाला जोडणारा हा मुख्य रस्ता असल्यामुळे या रस्त्यावर वाहनांची मोठी वर्दळ असते.
तसेच शनिवारी आणि रविवारी शनी मंदिरात दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या भाविकांच्या वाहनांच्या दुतर्फा पार्किंगमुळे हा रस्ता अधिकच अरुंद होतो.तर या रस्त्याला लागूनच परिसरातील पाण्याचा निचरा होण्यासाठी तयार केलेली गटारं आहेत. पण, या गटारांवर स्लॅब नसल्यामुळे वाहनचालकांसाठी ती धोकादायक ठरू लागली आहेत. महिन्याभरात काही वाहनचालक या गटारात पडल्याच्या घटना समोर आल्याचेही स्थानिक रहिवाशांनी सांगितले.
तर समस्येबाबत बोलताना स्थानिक रहिवासी अंकिता नाईक म्हणाल्या की, गेल्या चार ते पाच वर्षांपासून या गटारांवर स्लॅब टाकण्यात आलेला नाही. वारंवार तक्रार करूनही प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष केले जात आहे. मंगळवारी दुचाकी पार्क करताना माझे पती या गटारात पडले. त्यामुळे त्यांच्या खांद्याला, हाताला आणि पायाला गंभीर दुखापत झाली आहे. तसेच त्याच्या गळ्यातले सोन्याचे लॉकेटही हरवले आहे. या एका अपघातामुळे आम्हाला प्रचंड आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे.
उघड्या गटांराचा पादचाऱ्यांनाही धोका
वाघोली ते शनी मंदिर या रस्त्याला लागूनच अनेकांची घरे आहेत. तसेच या रस्त्याच्या शेजारी पादचाऱ्यांना चालण्यासाठी पदपथाची सोय नसल्यामुळे नागरिकांना रस्त्याच्या कडेवरून चालावे लागते. तर कधी एखाद्या वाहनाची धडक लागल्यास किंवा अपघाता झाल्यास पादचारी थेट गटारात पडण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे.
बंद पथदिव्यांमुळे धोका
तसेच या रस्त्यावरील पथदिवे अनेकदा बंद पडत असतात. त्यामुळे रात्रीच्या सुमारास उघडी गटारं नीट दिसून येत नाहीत. यामुळे एखादा वाहनचालक वाहन पार्क करण्यास त्या भागात गेल्यास किंवा वाहन वाळवताना अपघात होण्याची शक्यता आहे.
रस्त्याच्या आणि उघड्या गटाराच्या कामांसाठी शासनाकडून मार्च महिन्यात निधी प्राप्त झाला आहे. तर यासाठीचा विकास आराखडा लवकरच सादर करण्यात येईल. गटारं पूर्णपणे बंदिस्त केल्यास त्यांच्या स्वच्छतेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे लोखंडी जाळ्या किंवा लोखंडी खांब गटारांच्याशेजारी बसविण्यात येतील. संजय यादव, उपअभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग
