भाईंदर :- उत्तन येथे साचलेल्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी प्रशासनाने कंत्राटदाराची नियुक्ती केल्यानंतर अवघ्या दोन महिन्यांत जवळपास दहा हजार मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया पूर्ण झाल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात आला आहे. त्यामुळे येत्या वर्षभरात नागरिकांची दुर्गंधीतून कायमची मुक्तता होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

उत्तन येथे ओला व सुका असा वर्गीकरण न झालेला कचरा उघड्यावरच टाकला जातो. गेल्या दहा वर्षांहून अधिक काळ साचलेल्या या कचऱ्याचे आता डोंगर उभे राहिले आहेत. या कचऱ्यामुळे मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी पसरते. उन्हाळ्यात या कचऱ्याला वारंवार आग लागून प्रचंड धूर निर्माण होतो आणि तो आसपासच्या गावांत पसरतो. परिणामी उत्तन व परिसरातील रहिवासी त्रस्त झाले आहेत. घनकचरा प्रकल्पाविरोधात स्थानिकांनी अनेक वेळा आंदोलने केली असली तरी परिस्थितीत कोणताही ठोस बदल झालेला नाही.

दरम्यान, महापालिकेने दोन वर्षांपूर्वी कचऱ्याचे मोजमाप केले असता तो तब्बल नऊ लाख टन असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानुसार बायोमायनिंग प्रक्रियेद्वारे हा कचरा नष्ट करण्यासाठी महापालिकेने कंत्राटदार नेमले आहेत. काम थांबू नये म्हणून तीन कंत्राटदारांना प्रत्येकी तीन लाख मेट्रिक टन कचऱ्याचे वाटप करून काम देण्यात आले आहे. त्यावरून महापालिका आयुक्त राधा बिनोद शर्मा यांनी नुकताच या कामाचा पाहणी दौरा केला. यावेळी पहिल्या दोन महिन्यांत दहा हजार मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे येत्या वर्षभरात ही समस्या कायमची मार्गी लागणार असल्याचा दावा प्रशासनाकडून पत्रकाद्वारे करण्यात आला आहे.

पर्यावरणीय खबरदारी घेण्याचे सक्त आदेश :-

पाहणीदरम्यान आयुक्तांनी संबंधित अधिकारी व ठेकेदारांशी चर्चा करून प्रकल्पातील प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश दिले. तसेच कामकाजात गुणवत्ता, सुरक्षितता आणि पर्यावरणीय नियमांचे काटेकोर पालन होईल याची दक्षता घेण्याचे आदेशही यावेळी देण्यात आले. याशिवाय बायोमायनिंगचे काम नियोजित कालावधीतच पूर्ण करण्याची सक्त ताकीद आयुक्त राधा बिनोद शर्मा यांनी दिली.