पाणीपुरवठा तात्काळ बंद करण्याचे स्टेम प्राधिकरणला महापौरांचे आदेश

भाईंदर : मीरा-भाईंदर शहराला स्टेम प्राधिकरणाकडून होणाऱ्या पाणीपुरवठय़ाच्या जलवाहिनीला बेकायदा वाहिनी जोडून ठाण्यातील घोडबंदरच्या विकासकांना पाणी देण्यात येत असल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे हा पाणीपुरवठा तात्काळ बंद करावा, अन्यथा आक्रमक भूमिका घेणार असल्याचे आदेश मीरा-भाईंदरच्या महापौरांनी स्टेम प्राधिकरणाला दिले आहेत.

मीरा-भाईंदर शहराला स्वतंत्र पाणी स्रोत नसल्यामुळे स्टेम प्राधिकरण आणि एमआयडीसी विभागाकडून मिळणाऱ्या पाणीपुरवठय़ावर शहराला अवलंबून राहावे लागत आहे. यात स्टेम प्राधिकरणकडून शहराला ८६ दशलक्ष लिटर, तर एमआयडीसी विभागाकडून १३५ दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होतो. यातील स्टेम प्राधिकरणाची निर्मिती सन २००० मध्ये ठाणे महानगरपालिका, मीरा भाईंदर महानगरपालिका, भिवंडी-निजामपूर महानगरपालिका आणि ठाणे जिल्हा परिषद अशा चार संस्थांनी मिळून केली आहे. सद्य:स्थितीत स्टेम प्राधिकरणात मीरा-भाईंदर महानगरपालिकादेखील मालक आहे. मात्र गेल्या काही महिन्यांपासून या पाणी कोटय़ातील पुरवठय़ात कपात करण्यात येत असल्याने शहरात मोठय़ा प्रमाणात पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. 

अशा परिस्थितीत ठाणे महानगरपालिका हद्दीतील घोडबंदर भागात उभारण्यात आलेल्या मे दोस्ती अद्रिका डेव्हलपर्स, मे मेक्रोटेक डेव्हलपर्स, मे गोल्डन  माइल बिल्डर्स आणि टाटा मंत्रा या गृहसंकुलाला स्टेम प्राधिकरणाने मीरा-भाईंदरच्या जलवहिनीतून पाणीपुरवठा उपलब्ध करून दिला आहे. मात्र हा पुरवठा बेकायदा असून तो शहराला मान्य नसल्याचे महापौर ज्योस्त्ना हसनाळे यांनी म्हटले आहे.

त्याशिवाय मीरा-भाईंदरला देण्यात आलेल्या या जलवाहिनीला जोडवाहिन्या जोडण्यात आल्याने याचा गंभीर परिणाम शहराला मंजूर असलेल्या पाणीपुरवठय़ावर होत आहे, याकडे महापौरांनी प्राधिकरणाचे लक्ष वेधले आहे.  

मीरा-भाईंदर शहरात गेल्या काही महिन्यांपासून पाणीटंचाईची समस्या तीव्र झाली आहे. त्यामुळे शहराला योग्य पद्धतीने पाणीपुरवठा व्हावा याकरिता मी प्रयत्न करत आहे. अशा परिस्थितीत ठाणे महानगरपालिका हद्दीतील विकासकामांना आपल्या स्टेमच्या जलवाहिनीतून पुरवठा करण्यात येत असल्याचे माझ्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे तो पुरवठा आम्हाला मान्य नसून तो बंद करण्याचे पत्र मी स्टेम प्राधिकरण आणि ठाणे महानगरपालिकेला पाठवले आहे.

ज्योस्त्ना हसनाळे, महापौर, मीरा-भाईंदर महानगरपालिका

घोडबंदर येथील विकासकामांना देण्यात आलेल्या पाण्याचा निर्णय स्टेम प्राधिकरणाचा आहे. या संदर्भात महापौरांनी स्टेम प्राधिकरणाला पत्रदेखील पाठवले आहे.

सुरेश वाकोडे, कार्यकारी अभियंता, पाणीपुरवठा विभाग