वसई : विरार येथील बोळिंज आगाशी परिसरात करण्यात आलेली नालेसफाई अजूनही अपूर्णच राहिली आहे. या भागातील नाल्यांना जलपर्णीचा विळखा कायम राहिला आहे.मागील काही वर्षांपासून वसई विरार शहरात पूरस्थिती निर्माण होत आहे. याचा मोठा फटका वसई विरारच्या जनतेला बसत आहे. पावसाळय़ात पाण्याचा निचरा योग्य प्रकारे व्हावा यासाठी दरवर्षीप्रमाणे पालिकेकडून नालेसफाई करण्यात आली आहे. पालिकेने ९५ टक्के इतकी नालेसफाई झाल्याचा दावा केला आहे. मात्रविरार येथील बोळिंज आगाशी परिसरातील नाल्यांमध्ये अर्धवट नालेसफाई झाले असल्याचे येथील नागरिकांनी सांगितले आहे. याआधी जी सफाई करण्यात आली होती तीसुद्धा तात्पुरती होती. त्यानंतर पुन्हा पालिकेने नालेसफाईचे काम हाती घेतले होते. परंतु पावसाळा तोंडावर आला तरी अजूनही येथील नाले हे जलपर्णीने वेढले आहेत. त्यामुळे पावसाळय़ात पाण्याचा निचरा कसा होणार असा प्रश्न येथील नागरिकांनी उपस्थित केला आहे.

पालिकेने नालेसफाईचे काम हाती घेताना पूर्ण नाल्याची पाहणी करणे गरजेचे होते. परंतु तसे न झाल्याने केवळ समोर दिसेल इतकाच गाळ उपसा व जलपर्णी काढून टाकण्यात आली आहे. नाल्याच्या आतील भागात अजूनही जलपर्णीच्या वेळी तशाच राहिल्या आहेत. पूर्णत: नालेसफाई होतच नसेल तर कोटय़वधी खर्च करून काय उपयोग असा प्रश्न आता नागरिकांनी केला आहे.

नालेसफाईचे काम हे आधीपासून सुरू करायला हवे होते. जेणेकरून कोणत्या नाल्यात किती गाळ व कचरा आहे याचा अंदाज आला असता आणि वेळेत सर्व नाले स्वच्छ करता आले असते असे सामाजिक कार्यकर्ते महेश भोईर यांनी सांगितले आहे. पालिकेने आता तरी यावर लक्ष देऊन या भागातील नाल्यांमधील सांडपाणी निचरा होण्यास अडथळे निर्माण करणाऱ्या जलपर्णी काढून टाकावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.