scorecardresearch

वसई-विरार ग्रामीण भागातील ६९ गावांचा पाणीप्रश्न कायम

वसई-विरार ग्रामीण भागातील ६९ गावांच्या प्राण्याचा प्रश्न अजूनही सुटला नाही.

दोन दशकांपासून पाण्याची प्रतीक्षा;जमिनीत खड्डे खणून तहान भागवण्याची वेळ

विरार : वसई-विरार ग्रामीण भागातील ६९ गावांच्या प्राण्याचा प्रश्न अजूनही सुटला नाही. पालिका पाणी देणार या आशेवर ही गावे मागील दोन दशकापासून पाण्याची वाट पाहत आहेत. या प्रकल्पाला पालिकेकडून पाणीपुरवठा देण्यासाठी हिरवा कंदील न मिळाल्याने जलवाहिन्या चाचणीचे काम घेता येत नसल्याने अजूनही ही गावे जमिनीत खड्डे खणून आपली तहान भागवत आहेत. वसई पूर्व पट्टीत असलेल्या ६९ गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी शासनाकडून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून योजना राबवून या गावांचा पाणी प्रश्न मार्गी लावण्यात येणार होता. या योजनेंतर्गत ६९ गांवात जलवाहिन्या जाळे उभारण्यात आले असून ६९ गावात जलकुंभसुद्धा उभारले असल्याची  माहिती प्राधिकरणाकडून देण्यात आली आहे. पण अनेक वर्षांचा काळ लोटला पण या जलकुंभात पाणी आलेच नाही. आता काम पूर्ण झाले असता पालिकेत समावेश असलेल्या केवळ ५२ गावांना पालिका हे पाणी देणार असल्याचे सांगत इतर गावांचा भार जिल्हापरिषद आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांनी सोसावा असे पालिकेने सांगितले. त्यातही ५२ गावांना पालिकेने अजूनही पाणी दिले नाही.    

वसईतील चिंचोटी, कामण, कोल्ही, मोरी, पोमन, शिल्लोत्तर, नागले, देवदळ, बापाणे , सारजा, ससूनवघर, चंद्रपाडा, आगाशी, अर्नाळा, वटार, सत्पाळे, राजोडी, नाळे, वाघोली, मदरेस, नेवाळे, निर्मळ या गावांचा या योजत समावेश आहे. पण आता शहरालाच पाणीपुरवठा कमी होत असल्याने पालिकेने पाणी देण्याचा प्रस्ताव राखून ठेवला आहे. त्यात बापाणेपुढील गावांना अतिशय कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने जलवाहिन्यांची चाचणी होऊच शकली नाही. यामुळे अजूनही ही गावे तहानलेली आहेत.  येथील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध नसल्याने पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. नैसर्गिक जलस्त्रोतावर अवलंबून राहावे लागत असून काहींना टँकरचे विकत घ्यावे लागते. तर काही गावात जमिनीत खड्डे मारून त्यातून मिळणाऱ्या पाण्यानी आपली तहान भागवावी लागत आहे.  या योजनेमुळे गावागावात पाणी मिळणार होते, पण आता गावकऱ्यांचे पाण्याचे स्वप्न दुभंगणार असल्याची भीती निर्माण झाली आहे.

स्रोतसुद्धा दूषित

गावात असलेल्या कामण नदीमुळे पावसाळय़ात आणि उन्हाळय़ाच्या सुरुवातीच्या महिन्यात पाण्याचा प्रश्न मार्गी लागत होता. पण मागील काही वर्षांत या परिसरात वाढत्या बेकायदा औद्योगिक वसाहती आणि तबेले यामुळे नदीचे पात्र प्रदूषित झाल्याने गावातील इतर स्रोतसुद्धा दूषित झाले आहेत. यामुळे नागरिकांना पाण्यासाठी मोठी फरफट करावी लागत आहे.

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कडून जलवाहिनी विस्ताराचे काम पूर्ण झाले आहे. पालिकेने पाणी दिल्यावर जलवाहिन्या तपासणीचे काम पूर्ण होऊन तीन ते चार महिन्यात गावांना पाणीपुरवठा केला जाऊ शकतो. यासाठी पालिकेने पाणी देणे गरजेचे आहे.’’

 -राजन धादवड,  प्रभारी कार्यकारी अभियंता,  महाराष्ट्र जीवन प्राधिकरण

मराठीतील सर्व वसई विरार ( Vasaivirar ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Water problem persists villages rural area ysh

ताज्या बातम्या