वसई:- प्रवाशांच्या वाढत्या गर्दीमुळे पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय गाड्यांतून प्रवास करणे धोकादायक बनले आहे. मागील दोन महिन्यांत मीरारोड ते वैतरणा या सात स्थानकांच्या दरम्यान घडलेल्या रेल्वे अपघातात २८ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे.

मागील काही वर्षांपासून वसई विरार व मिरा भाईंदर शहराचे नागरीकरण झपाट्याने वाढत आहे. या वाढत्या नागरिकरणासोबतच लोकल गाड्यांतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी संख्या बेसुमार वाढली आहे. विरार, नालासोपारा, वसई, नायगाव, भाईंदर, मिरारोड या स्थानकातून मुंबईच्या दिशेने ये-जा करणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक आहे.

वाढत्या प्रवास गर्दीमुळे प्रवाशांना अक्षरशः धोकादायक प्रवास करावा लागत आहे. काही वेळा लोकल गाड्यांच्या अनियमित वेळांमुळे प्रवाशांची गर्दी मोठ्या प्रमाणात होत असते. या गर्दीमुळे काही प्रवासी लोकलच्या दरवाजाला लटकून प्रवास करतात. त्यामुळे तोल जाऊन प्रवाशांचे अपघात होण्याचे प्रमाण अधिक आहे. तसेच अनेकदा लवकर लोकल पकडण्यासाठी रेल्वे रूळ ओलांडून व निष्काळजीपणे धावत जाताना भरधाव वेगाने येणाऱ्या एक्सप्रेस गाड्यांच्या धडका प्रवाशांना लागून होणाऱ्या अपघाताच्या घटनाही आता वाढल्या आहेत.

आतापर्यंत मिरारोड ते वैतरणा या स्थानकांदरम्यान जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन महिन्यात २८ जणांचा मृत्यू झाला आहे. यातील २४ जणांच्या मृतांच्या वारसाचा शोध लागला आहे. तर ४ मृतांच्या वारसांचा शोध लागला नसल्याची माहिती रेल्वे पोलिसांनी दिली आहे. तर १८ प्रवासी हे रेल्वे अपघातात जखमी झाले आहेत. दररोज लोकलमधून लाखोंच्या संख्येने प्रवासी प्रवास करतात मात्र काही प्रवासी हे निष्काळजीपणे प्रवास करतात त्यामुळे अशा घटना समोर येत आहेत, असे पोलिसांनी सांगितले आहे.

रेल्वे अपघात घटवण्यासाठी जनजागृती मोहीम
वसई विरार रेल्वे स्थानकातील प्रवाशांचे वाढते अपघात रोखण्यासाठी वसई लोहमार्ग पोलीस आणि रेल्वे सुरक्षा बलाकडून विशेष जनजागृती मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेंतर्गत नालासोपारा स्थानकात प्रवाशांना रांगेत लोकलमध्ये चढण्याची शिस्त लावली जात आहे. तर रेल्वे सुरक्षा नियम आणि गर्दीच्या वेळी घ्यायची खबरदारी, यांबाबत विविध उपक्रमांच्या माध्यमातून जनजागृती केली जात आहे.

रेल्वे अपघात रोखण्यासाठी प्रशासनामार्फत विविध उपाययोजना राबविल्या जातात. मात्र प्रवाशांनी प्रवासादरम्यान घाई न करता काळजीपूर्वक प्रवास करणे गरजेचे आहे.
:- भगवान डांगे, वरीष्ठ पोलीस निरीक्षक लोहमार्ग पोलीस ठाणे</strong>