वसई: कॅगने सादर केलेल्या अहवालानंतर विविध रेल्वे स्थानकातील पिण्याचा पाण्याच्या स्वच्छतेचा मुद्दा चर्चेत असताना नुकतीच पश्चिम रेल्वेच्या वैद्यकीय विभागाने विविध रेल्वे स्थानकातील पाण्याची नमुना चाचणी आणि तपासणी केली. यावेळी एक हजारहून अधिक क्लोरीन चाचण्या व २७६ नमुन्यांच्या चाचण्या करण्यात आल्या.
भारताचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक विभागाने (कॅग) नुकत्याच जाहीर केलेल्या अहवालात विविध विभागातील रेल्वे स्थानातील पिण्याच्या पाण्याच्या गुणवत्तेबाबत गंभीर आक्षेप घेत वॉटर कुलरच्या नमुन्यांमध्ये ई-कोलायसारखे घातक जिवाणू आढळल्याचा अहवाल जाहीर केला होता. यात मध्य रेल्वे विभागातील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी), कल्याण, भिवंडी रोड आणि लोणावळा येथील नमुन्यांमध्ये त्रुटी आढळल्या होत्या. तर वॉटर कूलरची नियमित साफसफाई न होणे आणि गाळ साचणे यांसारख्या बाबीही समोर आल्या होत्या.
त्यामुळे प्रवाशांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी मध्य रेल्वे मंडळाने २० हजार ठिकाणी टँक-टू-टॅप गाळण प्रणाली बसवण्याचे नियोजन केले आहे. तसेच वॉटर कूलर्सवर पाण्याच्या गुणवत्तेवर देखरेख ठेवणारी यंत्रणाही बसविण्याचे तसेच जुन्या आणि जीर्ण झालेल्या पाण्याच्या साठवण टाक्या टप्प्याटप्प्याने बदलण्याचे काम हाती घेतले जाणार आहे. तर दुसरीकडे पश्चिम रेल्वेच्या वैद्यकीय विभागाकडूनही रेल्वे स्थानातील पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता निश्चित करण्यासाठी ९ ते १५ सप्टेंबर, २०२६ या सात दिवसांच्या कालावधीत मोठ्या प्रमाणावर नमुना चाचणी आणि तपासणी मोहीम राबविण्यात आली.
पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी, विनीत अभिषेक यांनी जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, पश्चिम रेल्वे नियमित जिवाणूशास्त्रीय चाचणी आणि रेसीडुअल क्लोरीन चाचणीद्वारे पिण्याच्या पाण्याची व्यापक देखरेख करत आहे. २७६ जिवाणूशास्त्रीय नमुन्यांची चाचणी करण्यात आली, ज्यामध्ये एकूण ९९% पेक्षा जास्त नमुने योग्य असल्याचे आढळले, तर पश्चिम रेल्वेमध्ये १ हजार ७४५ रेसीडुअल क्लोरीन चाचण्या घेण्यात आल्या, ज्यापैकी ९६% पेक्षा जास्त चाचण्यांचे निकाल समाधानकारक आढळले. अयोग्य ठरलेल्या नमुन्यांची माहिती संबंधित विभागांना देण्यात आली असून, स्वच्छ पाण्याचा अखंड पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी सुधारणात्मक उपाययोजना केल्या जात आहेत, असेही पश्चिम रेल्वेकडून सांगण्यात आले आहे.
हा तपासणी कार्यक्रम रेल्वे स्थानकांवर आणि रेल्वेच्या इतर परिसरांमध्ये नियमितपणे राबवला जात आहे, ज्यामध्ये पिण्याच्या पाण्याच्या सुविधा आणि वॉटर कूलर्सवर विशेष लक्ष दिले जात आहे. सुरक्षित पिण्याचे पाणी, योग्य क्लोरीनीकरण आणि स्वच्छता सुनिश्चित करणे हा या कामाचा उद्देश असून संबंधित विभागांच्या समन्वयाने, पश्चिम रेल्वे पाण्याच्या टाक्या, पाईपलाईन, वॉटर कूलर्स आणि पिण्याच्या पाण्याच्या सुविधांची स्वच्छता व देखभालीकडेही बारकाईने लक्ष देत असल्याचे पश्चिम रेल्वेकडून स्पष्ट करण्यात आले.
