वसई: वसई विरार शहरात पावसाचा वाढता जोर आणि विस्कळीत होणारी रेल्वे सेवा यामुळे पश्चिम रेल्वेकडून देखभाल दुरुस्तीसाठी शनिवार आणि रविवार मध्यरात्री वसई ते वैतरणा रेल्वे स्थानकांदरम्यान मेगाब्लॉक घेतला जाणार असून या दरम्यान अप आणि डाऊन मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
वसई विरार रेल्वे स्थानकातील रेल्वे रुळांवर पावसाचे पाणी साचल्यामुळे रेल्वे सेवा विस्कळीत होत आहे. प्रवाशांना तासंतास लोकलची वाट पाहता फलाटावर उभे राहावे लागत आहे. त्यामुळे पश्चिम रेल्वे मार्गावरील रेल्वे रुळांची दुरुस्ती, सिग्नल यंत्रणेचे आधुनिकीकरण आणि ओव्हरहेड विद्युत तारांच्या देखभालीच्या कामांसाठी आज आणि उद्या मध्यरात्री विशेष जम्बो ब्लॉक घेण्यात येणार आहे. हा ब्लॉक वसई रोड ते वैतरणा स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन दोन्ही जलद मार्गांवर घेण्यात येणार आहे. ४ आणि ५ जुलै च्या मध्यरात्री घेतल्या जाणाऱ्या या ब्लॉकमुळे रात्रीच्या आणि पहाटेच्या लोकल प्रवाशांना काही प्रमाणात गैरसोयीचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.

हा जम्बो ब्लॉक मध्यरात्रीच्या सुमारास घेण्यात येत असला, तरी या काळात धावणाऱ्या काही उपनगरीय लोकल फेऱ्यांवर याचा थेट परिणाम होणार आहे. काही लोकल गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत, तर काही गाड्यांच्या वेळा बदलण्यात आल्या आहेत. ब्लॉक दरम्यान प्रभावित होणाऱ्या सर्व लोकल ट्रेनची सविस्तर आणि अचूक यादी पश्चिम रेल्वेच्या संबंधित सर्व स्थानकांवरील स्टेशन मास्टर यांच्या कार्यालयात प्रवाशांच्या माहितीसाठी उपलब्ध करून देण्यात आली असल्याचे पश्चिम रेल्वे प्रशासनाने सांगितले आहे.
ज्या नागरिकांना आज रात्री किंवा उद्या पहाटेच्या सुमारास या मार्गावरून प्रवास करायचा आहे, त्यांनी रेल्वे स्थानकावर येण्यापूर्वी लोकल फेऱ्यांचे अद्ययावत वेळापत्रक नक्की तपासून घ्यावे. प्रवाशांनी आपल्या प्रवासाचे नियोजन या ब्लॉकच्या वेळा लक्षात घेऊनच करावे, जेणेकरून स्थानकावर ताटकळत राहावे लागणार नाही, असे आवाहनही प्रवाशांना करण्यात आले आहे.
ब्लॉकचे वेळापत्रक:
- रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार जलद मार्गांवर खालील वेळेत ब्लॉक असेल:
- अप जलद मार्ग: रात्री २३:५५ वाजेपासून ते पहाटे ०२:५५ वाजेपर्यंत (एकूण ३ तास).
- डाऊन जलद मार्ग: मध्यरात्री ०१:३० वाजेपासून ते पहाटे ०४:३० वाजेपर्यंत (एकूण ३ तास).
