वसई: नायगाव आणि भाईंदर दरम्यान असणाऱ्या खाडी पुलावरील ओव्हरहेड वायर तुटल्यामुळे रविवारी सकाळी लोकल सेवा विस्कळीत झाली होती. ओव्हरहेड वायरच्या दुरुस्तीसाठी विविध मार्गांवरील गाड्या अडवण्यात आल्या होत्या. विरार ते चर्चगेट दरम्यान दररोज हजारोंच्या संख्येने प्रवासी प्रवास करतात. शनिवार आणि रविवार या सुट्टीच्या आणि कमी गर्दीच्या दिवशीही सकाळ व संध्याकाळच्या सुमारास या मार्गावर धावणाऱ्या लोकल गाड्यांमध्ये भरगच्च गर्दी असल्याचे दिसून येते.

पण, लोकल गाड्या किंवा ओव्हरहेड वायरमध्ये बिघाड झाल्यास अनेकदा लोकल रेल्वेची वाहतूक विस्कळित होते. रविवारी सकाळीसुद्धा अशाच एका तांत्रिक बिघाडामुळे विरार ते चर्चगेट मार्गावर लोकल सेवा विस्कळीत झाली होती. नायगाव आणि भाईंदर दरम्यान असणाऱ्या खाडी पुलावर ओव्हरहेड वायरमध्ये बिघाड झाल्यामुळे सर्वच मार्गांवरील लोकल गाड्या काही काळ थांबवण्यात आल्या होत्या.

यामुळे विरार, डहाणू तसेच बोरीवली आणि चर्चगेट या मार्गांवर धावणाऱ्या लोकल अर्धा ते पाऊण तास उशिराने चालवल्या जात होत्या. यामुळे सुट्टीनिमित्त तसेच कामानिमित्त बाहेर पडलेल्या प्रवाशांची मोठी तारांबळ उडाली. तर ओव्हरहेड वायर दुरुस्त होईपर्यंत लोकलमधील प्रवासी रेल्वे रुळांवर फिरतानाचे, लोकलच्या दरवाज्यावर बसल्याचे व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचे दिसून येत आहे.

ओव्हरहेड वायर म्हणजे काय?

ओव्हरहेड वायर म्हणजे खांब किंवा टॉवर्सच्या साहाय्याने जमिनीच्या वर हवेत टांगलेल्या विद्युत वाहक तारा. या तारांचा वापर प्रामुख्याने वीज पारेषण (ट्रान्समिशन), वितरण (डिस्ट्रिब्युशन) आणि रेल्वेसारख्या इलेक्ट्रिक वाहनांना वीज पुरवठा करण्यासाठी केला जातो. रेल्वे ट्रॅकच्या वर असलेल्या तारांना ‘ओव्हरहेड इक्विपमेंट’ (ओएचइ) म्हणतात, जेथून ट्रेनला वीज मिळते.