वसई: पश्चिम रेल्वेच्या सफाळे-केळवे रोड स्थानकांदरम्यान शनिवार आणि रविवारी मध्यरात्री विशेष ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे डहाणू – विरार मेमू गाड्यांसह लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या वेळापत्रकावरही परिणाम होणार आहे.

पश्चिम रेल्वेमार्फत सफाळे आणि केळवे रोड स्थानकादरम्यान पूल क्रमांक ११४ वरील गर्डर काढण्याच्या कामासाठी दोन टप्प्यात ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात येणार आहे. शनिवार, ३१ जानेवारी रोजी अप मार्गावर (विरारच्या दिशेने) पहाटे ०२:१५ ते पहाटे ०३:१५ वाजेपर्यंत आणि डाऊन मार्गावर (डहाणूच्या दिशेने) पहाटे ०१:४५ ते पहाटे ०५:४५ वाजेपर्यंत ब्लॉक घेतला जाणार आहे. तर रविवार, १ फेब्रुवारी अप आणि डाऊन मार्गांवर मध्यरात्री ००:३० ते पहाटे ०४:३० वाजेपर्यंत ब्लॉक घेतला जाणार असल्याचे पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी जारी केलेल्या परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

सलग दोन दिवस मध्यरात्रीच्या वेळेस घेतल्या जाणाऱ्या या ब्लॉकमुळे डहाणू-विरार मेमू लोकल गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर अनेक लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या वेळापत्रकातही बदल करण्यात आला आहे. त्यामुळे सुट्टीच्या दिवशी बाहेर पडणाऱ्या प्रवाशांचे हाल होण्याची शक्यता आहे. तर रेल्वे पुलाच्या देखभालीच्या कामासाठी हा ब्लॉक अत्यावश्यक असून, प्रवाशांनी गाड्यांचे वेळापत्रक विचारात घेऊनच प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन पश्चिम रेल्वे प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

रद्द करण्यात आलेल्या गाड्या

३१ जानेवारी रोजी सकाळी सात वाजता डहाणूवरून सुटणारी डहाणू रोड – विरार मेमू गाडी आणि पहाटे ४ वाजून ५० मिनिटांनी विरारहून सुटणारी विरार – डहाणू रोड मेमू गाडी रद्द करण्यात आली आहे. तर विरार – भरूच एक्स्प्रेस गाडी अंशतः रद्द करण्यात आली आहे. ३१ जानेवारी रोजी ही गाडी विरारऐवजी पालघर स्थानकातून सुटेल.

‘या’ एक्सप्रेस गाड्यांच्या वेळापत्रकातही बदल

पश्चिम रेल्वेकडून घेण्यात येणाऱ्या मेगाब्लॉकमुळे काही एक्सप्रेस गाड्यां तीस मिनिटे ते दीड तास उशिराने धावणार आहेत. ३१ जानेवारी रोजी विरार – सुरत मेमू, ओखा – मुंबई सेंट्रल मेल एक्सप्रेस, भुज – वांद्रे टर्मिनस सुपरफास्ट, भुसावळ – दादर स्पेशल, अहमदाबाद – वांद्रे टर्मिनस (लोकशक्ती), वेरावळ – वांद्रे टर्मिनस एक्सप्रेस, एकता नगर – दादर सुपरफास्ट, अहमदाबाद – दादर एक्सप्रेस, इंदूर – मुंबई सेंट्रल सुपरफास्ट, भगत की कोठी – वांद्रे टर्मिनस, हनुमानगड – दादर एक्सप्रेस, दादर – एकता नगर सुपरफास्ट, वांद्रे टर्मिनस – जामनगर एक्सप्रेस या लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या वेळापत्रकात बदल होणार आहे. तर १ फेब्रुवारी रोजी डहाणू रोड – बोरिवली मेमू, दादर – भुसावळ एक्सप्रेस, वांद्रे टर्मिनस – हरिद्वार एक्सप्रेस या गाड्या नियमित वेळेपेक्षा काहीशा उशिराने धावतील.