वसई : पश्चिम रेल्वेच्या मिरारोड ते वैतरणा या स्थानकांदरम्यान रेल्वे अपघातांचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाहीये. गेल्या अवघ्या पाच महिन्यांत या पट्ट्यात तब्बल ८० जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. सरासरीचा विचार केला तर दर दोन दिवसांमागे एका व्यक्तीला येथे आपला जीव गमवावा लागला आहे. विशेष म्हणजे, यातील अनेक घटना रेल्वे रुळावर येऊन केलेल्या आत्महत्या असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
मिरारोड ते वैतरणा अशी ३१ किलोमीटरची वसई रेल्वे पोलीस ठाण्याची हद्द असून यात सात स्थानकांचा समावेश आहे. गेल्या काही वर्षांत विरार, नालासोपारा, वसई आणि नायगाव या स्थानकांतून मुंबईच्या दिशेने या-जा करणाऱ्या प्रवाशांची संख्या प्रचंड वाढली आहे. या गर्दीमुळे काही प्रवासी लोकलला लटकून प्रवास करतात आणि तोल जाऊन पडतात. तर काही जण वेळेची बचत करण्यासाठी रेल्वे रुळ ओलांडताना भरधाव लोकल किंवा एक्स्प्रेसच्या कचाट्यात येतात. मात्र, या सर्व अपघातांमध्ये आता आत्महत्येच्या वाढत्या घटनांनी रेल्वे प्रशासनाची चिंता अधिक वाढवली आहे.
रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पाच महिन्यात ८० जणांचा रेल्वे अपघातात मृत्यू झाला आहे. अनेक घटना रुळ ओलांडताना झालेल्या अपघातांच्या नसून, त्या थेट आत्महत्या आहेत. कौटुंबिक कलह, मानसिक तणाव किंवा आर्थिक विवंचनेतून अनेक व्यक्ती टोकाचे पाऊल उचलण्यासाठी या ३१ किलोमीटरच्या निर्जन पट्ट्याचा वापर करत असल्याचे तपासात समोर आले आहे. ही वाढती प्रवृत्ती आता अत्यंत चिंतेची बाब बनली आहे.
मागील वर्षी १७० जणांचा रेल्वे अपघातात मृत्यू झाला होता. त्यात ३० घटना आत्महत्येच्या असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले होते.
सुरक्षाजाळ्या अभावी दुर्घटना
विरार ते वैतरणा या भागात रेल्वे रुळाच्या लगत सुरक्षा जाळ्या नसल्याने अनेक प्रवासी व आजूबाजूच्या भागातील नागरिक थेट रेल्वे रूळ ओलांडून, व रेल्वे मार्गातून प्रवास करताना दिसून येत आहेत. काही जण मोबाईल मध्येच गुंतलेले असतात. त्यामुळे सुद्धा अपघात घडत असल्याचे रेल्वे पोलिसांनी सांगितले आहे. या ठिकाणी जर सुरक्षा जाळ्या असतील प्रवासी रेल्वे रूळ ओलांडून जाण्याचे प्रमाण कमी होईल. याबाबत रेल्वे प्रशासना सोबत ही पत्रव्यवहार करण्यात आला असल्याची माहीती रेल्वे पोलिसांनी दिली आहे.
२४ मृतदेह बेवारस
रेल्वे अपघात अत्यंत विचित्र स्वरूपाचे असतात. त्यामुळे छिन्नविच्छिन्न झालेल्या मृतदेहांची ओळख पटवणे हे रेल्वे पोलिसांसमोर मोठे कठीण काम असते. मृत व्यक्तीची ओळख पटवण्यासाठी पोलिसांना मोठी कसरत करावी लागत आहे. सध्या मृत्यू झालेल्या ८० व्यक्तींपैकी २४ मृतदेह अजूनही बेवारस सापडले आहेत त्यापैकी १९ मृतदेहांची विल्हेवाट लावली आहे तर ५ मृतदेह अजूनही बाकी आहेत.
वैतरणा ते मिरारोड या दरम्यान अपघातांचे प्रमाण वाढत आहे. अनेक घटनांमध्ये आत्महत्या करण्याचे प्रमाण अधिक असल्याचे तपासातून समोर येत आहे. रेल्वे अपघात कमी करण्याच्या दृष्टीने गस्ती पथकाद्वारे विशेष लक्ष दिले जात आहे. – भगवान डांगे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक लोहमार्ग पोलीस ठाणे वसई.
