Western Railway New AC Local Trains Services: प्रजासत्ताक दिनापासून पश्चिम रेल्वे मार्गावर १२ नव्या एसी लोकल फेऱ्या सुरू करण्यात येणार आहेत. यात ६ लोकल फेऱ्या अप मार्गावर तर ६ लोकल फेऱ्या डाऊन मार्गावर वाढवल्या जाणार आहेत. त्यापैकी ४ एसी लोकल फेऱ्या या विरार ते चर्चगेट मार्गावर तर २ नव्या एसी लोकल भाईंदर ते चर्चगेट मार्गावर सुरू केल्या जाणार आहेत. पण रेल्वे प्रशासनाच्या या निर्णयामुळे प्रवास सुखकर होण्याऐवजी तो अधिकच त्रासदायक होणार असल्याचे मत प्रवाशांकडून व्यक्त केले जात आहे.

पश्चिम रेल्वे मार्गावरील विरार रेल्वे स्थानक एक गजबजलेले रेल्वे स्थानक आहे. गेल्या काही काळात वसई, विरार आणि नालासोपारा शहरात मुंबई, ठाणे, पालघर यासह महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यातून आणि देशातील गुजरात, उत्तरप्रदेश, उत्तराखंड आणि बिहारसारख्या राज्यातून मोठ्या प्रमाणावर लोकांचे स्थलांतर झाले आहे.

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर असणारी कोंडी, विरार ते ठाणे, मुंबई आणि पालघर शहरांतर्गत नसणारी बस सेवा, तसेच खाजगी वाहतूक सेवांकडून आकारले जाणारे भरमसाठ भाडे यामुळे बहुतांश प्रवासी लोकलने प्रवास करणे पसंत करतात. जलद प्रवास आणि तिकिटाच्या परवडणाऱ्या किंमती यामुळे दैनंदिन हजारो प्रवासी लोकलने प्रवास करतात.

प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे प्रशासनाकडून सर्वच मार्गांवर सामान्य लोकलसह एसी लोकल सुरू करण्यात आल्या आहेत. सुरुवातीच्या काळात विरोध केल्यानंतर हळू हळू प्रवाशांनी एसी लोकलने प्रवास करायला सुरुवात केली आहे. पण, एसी लोकलच्या मर्यादित फेऱ्या आणि जास्तीचा तिकीट दर यामुळे वसई विरार तसेच मिरा भाईंदर सारख्या मध्यमवर्गीयबहुल शहरातील बहुतांश प्रवासी अजूनही सामान्य लोकलने प्रवास करणे पसंत करतात. पण, प्रजासत्ताक दिनापासून विरार ते चर्चगेट पश्चिम रेल्वे मार्गावर एसी लोकलच्या १२ फेऱ्या वाढवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. यामुळे विरार सारख्या लांब पल्ल्याच्या ठिकाणाहून मुंबईच्या दिशेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून मात्र याबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे.

का होणार प्रवाशांचा खोळंबा?

एसी लोकलच्या फेऱ्या वाढवल्यामुळे एसी लोकलच्या एकूण फेऱ्यांमध्ये १०९ वरून १२० फेऱ्या इतकी वाढ होणार आहे. पण, यानंतरही लोकलच्या दैनंदिन फेऱ्या १ हजार ४०६ इतक्याच राहणार आहेत. त्यामुळे सामान्य लोकलच्या फेऱ्या रद्द करून त्या जागी या एसी लोकल चालवल्या जाणार आहेत. त्यामुळे एसी लोकलचे प्रवास न करणाऱ्या प्रवाशांना भरगच्च गर्दीने भरलेल्या लोकलच्या डब्यातून लटकतच प्रवास करावा लागणार आहे.

नव्या एसी लोकलचे वेळापत्रक

अप मार्ग:

विरार – चर्चगेट (जलद) – सकाळी १० वाजून ८ मिनिटे
विरार – चर्चगेट (धीमी) – दुपारी १२ वाजून ४४ मिनिटे
भाईंदर – चर्चगेट (जलद) – संध्याकाळी ३ वाजून ४५ मिनिटे

डाऊन मार्ग:

चर्चगेट – विरार (जलद) – सकाळी ८ वाजून २७ मिनिटे
चर्चगेट – विरार (धीमी) – दुपारी १ वाजून ५२ मिनिटे
चर्चगेट – भाईंदर (जलद) – सकाळी ११ वाजून ३० मिनिटे