वसई: सध्या लग्नसराईचा काळ सुरू आहे. या काळात व्हॉट्सअँप किंवा इतर समाजमाध्यमांवर पत्रिका पाठवली जाणे अत्यंत सामान्य बाब आहे. पण, याच गोष्टीचा फायदा काही सायबर चोरटे घेत आहेत. सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका स्क्रीनशॉटनुसार लोकांना लुबाडण्यासाठी सायबर गुन्हेगार आता व्हॉट्सॲपवर ‘लग्नाची पत्रिका’ पाठवल्याचा बहाणा करून बँक खाती साफ करत आहेत.
डिजिटल युगात आंतरजालामुळे ऑनलाईन व्यवहार जितके सुलभ झाले आहेत. तितकीच चालना ऑनलाईन फसवणुकीला मिळाली आहे. ऑनलाईन कामाचे आमिष, जास्त पैसे कमावण्याचे आमिष, पैसे गुंतवण्याच्या विविध योजना, अशा विविध मार्गांनी सायबर चोरटे सामान्य नागरिकांची फसवणूक करून त्याच्या खात्यातील पैसे, खाजगी माहिती चोरी करत आहेत.
व्हायरल होणारा मेसेज काय?
तर मे महिन्यात सुरू असलेल्या लगीनसराईचा फायदा घेत आता नवीन पद्धतीने सायबर चोर सामान्यांना लुटण्याचा प्रयत्न करत आहेत. सध्या वसई विरारमधील अनेकांच्या मोबाईलवर वेगाने पसरणाऱ्या संदेशानुसार, वापरकर्त्यांना व्हॉट्सॲपवर एका अपरिचित किंवा ओळखीच्या नंबरवरून मेसेज येतो. त्यात हिंदीत लिहिलेले असते की, “Humare ghar pe shadi hai 7th June ko ap sab zaroor aye apne parivar ke sath. maine apko shadi ka card bheja hai ek barr dekh kar bataya kaisa bana hai..” (आमच्या घरी ७ जूनला लग्न आहे, तुम्ही कुटुंबासह नक्की या. मी लग्नाची पत्रिका पाठवली आहे, ती कशी आहे ते एकदा पाहून सांगा).
या मेसेजसोबत इन्व्हिटेशन कार्ड एपिके (Invitation card.apk) नावाची एक फाईल जोडलेली असते, जी दिसायला केवळ ८४१ केबीची असते. नागरिक याला खरी लग्नाची पत्रिका समजून त्यावर क्लिक करतात आणि त्यामुळे गोंधळ होण्याची शक्यता आहे.
फक्त एका क्लिकवर मोबाईल हॅक!
व्हायरल संदेशानुसार, ही कोणतीही इमेज किंवा पीडीएफ फाईल नसून एक एपिके (.APK) आहे. म्हणजेच, हा एक प्रकारचा छुपा व्हायरस किंवा ‘मॅलवेअर’ आहे. यामुळे मोबाईल हॅक होणे, बँक खात्याची माहिती तसेच खाजगी माहिती सायबर चोर लीक करू शकतात. व्हॉट्सॲपवर लग्नाचे कार्ड, फोटो, किंवा व्हिडिओ या नावाने येणाऱ्या कोणत्याही एपिके फाईल्स डाऊनलोड किंवा इन्स्टॉल करू नका, असा इशारा या संदेशात देण्यात आला आहे.
