वसई : विरार पूर्वेतील गास कोपरी येथील डोंगराला आग लागली आहे. आगीमुळे मोठी खळबळ उडाली असून वन्य जीवांना धोका निर्माण झाला आहे.
विरार पूर्वेला गास कोपरी येथे डोंगर आहे. गुरुवारी, २९ जानेवारी रोजी संध्याकाळी ७ वाजता डोंगराला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. अचानक लागलेल्या या आगीमुळे परिसरात मोठी खळबळ माजली आहे. डोंगरावर उगवणारे गवत, झाडे झुडपे तसेच मोठ्या वृक्षांच्या फांद्या, अशाप्रकारची वनसंपदा मोठ्या प्रमाणात जळून खाक झाली आहे. तर डोंगरावर लागलेली आग वेगाने पसरत असल्यामुळे डोंगरावरील प्राणी आणि पक्ष्यांच्या जीवास धोका निर्माण झाला आहे.
याबाबत नागरिकांनी वन विभागाला माहिती कळवली आहे. मात्र, अजून कोणीही आग विझविण्यासाठी आले नाही. नेमकी आग लागली की लावण्यात आली याबाबत संशय व्यक्त केला जात आहे.
शिकारीसाठी आगी लावल्या जात असल्याचा संशय
वसईच्या विविध ठिकाणच्या जंगलपरिसरात आगी लागण्याचे प्रकार समोर येत असतात. पूर्वी घनदाट जंगल असल्याने झाडांच्या घर्षणाने ठिणग्या बाहेर पडून वणवे पेटत होते. परंतु आता लागणारे वणवे हे मानवनिर्मित असून वन्य प्राण्यांची शिकार करण्यासाठी डोंगर माथ्याच्या सभोवताली वणवे पेटविले जात असल्याचा संशय पर्यावरण प्रेमींकडून व्यक्त होत आहे. अशा व्यक्तींवर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे
जीवदानी डोंगरावर लागली होती आग
यापूर्वी विरार पूर्वेच्या जीवदानी डोंगरावर भीषण आग लागल्याची घटना घडली होती. ही आगीची घटनाही सायंकाळी सातच्या सुमारास घडली होती. या आगीत डोंगरावरील वनसंपदा मोठ्या प्रमाणात जळून खाक झाली होती. जीवदानी येथील कर्मचाऱ्यांनी या आगीवर नियंत्रण मिळवले होते.

