वसई: नुकत्याच पार पडलेल्या महापालिका निवडणुकीत बहुजन विकास आघाडीने ७० जागा जिंकल्या आहेत. त्यापैकी ९ नगरसेवक हे ख्रिस्ती समाजातले आहेत. तर बविआच्या पाठिंब्याने काँग्रेसची एक नगरसेविका निवडून आली आहे. तर ख्रिस्तीबहुल भागातून बहुजन विकास आघाडीला सर्वाधिक मतदान झाले आहे. त्यामुळे यावेळी महापौर पदाची माळ ख्रिस्ती उमेदवाराच्या गळ्यात पडणार का? अशा चर्चा ही राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत.
२०२६ मध्ये पार पडलेल्या महापालिका निवडणुकीमुळे स्थानिक राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे. आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीने ७० जागा जिंकत आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. तर भाजपने देखील ४३ जागांवर बाजी मारली आहे. एकीकडे उत्तरभारतीय मतदार आणि नालासोपारा मतदार क्षेत्रातील मतदारांच्या जोरावर भाजपने महापालिका निवडणुकीत यश मिळवले असल्याची चर्चा सुरू असताना.
बहुजन विकास आघाडी पक्षालाही वसई, नायगाव तसेच विरारमधील ख्रिस्ती बहुल भागातील सर्वाधिक मते मिळाले असल्याचे बोलले जात आहे. बहुजन विकास आघाडीने बहुजन विकास आघाडीने जिंकलेल्या ७० जागांपैकी ९ जागांवर ख्रिस्ती मतदार निवडून आहे आहेत. तर बहुजन विकास आघाडीच्या पाठिंब्याने काँग्रेसच्या चिन्हावर निवडणून आलेल्या एकमेव नगरसेविका यासुद्धा ख्रिस्तीच आहेत.
वसई विरारमधील मर्सिस, नंदाखाल, आगाशी, भुईगाव, नायगाव कोळीवाडा, वसई कोळीवाडा आणि पापडी यांसारख्या भागांत ख्रिस्ती समाजाचे मोठे प्राबल्य आहे. हा समाज गेली तीन दशके हितेंद्र ठाकूरांना साथ देत आहे.त्यामुळे यंदा या भागातून निवडून आलेले बविआचे अनेक निष्ठावान आणि अनुभवी ख्रिस्ती नगरसेवक महापौर पदाच्या शर्यतीत आहेत.
२२ जानेवारी रोजी पार पडलेल्या आरक्षण सोडतीत वसई विरार महापालिकेचे महापौर पद ‘खुल्या प्रवर्गासाठी’ आरक्षित करण्यात आले आहे. यापूर्वी हे पद अनुसूचित जमातीसाठी (एसटी) राखीव होते. आता खुल्या प्रवर्गाचे आरक्षण आल्यामुळे पक्षाला सक्षम आणि लोकप्रिय चेहरा निवडण्याची मुभा मिळाली आहे. तर ख्रिस्ती समाजातील सक्षम नेतृत्वाला संधी देऊन आगामी विधानसभा निवडणुकीची गणितेही बविआकडून आखली जाऊ शकतात, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगत आहे.
बविआचे ख्रिस्ती समाजातील नगरसेवक
१२(ड) – डोमनिक रुमाव – १०३९५ –
१३(क) – मार्शल लोपिस – १४६३२
२४(ड) – अँथोनी रॉड्रिग्ज – ९३३२
२६(ड) – लॉरेल डायस – ५७५८
२६(ब) – मार्शलिन चाको – ८८२०
२६(क) – प्रकाश रॉड्रिग्ज – ८८५४
२८(क) – बिना फुट्यार्डो – १२७३८
२९(अ) – अलका गमज्या – ९२०५
२५(क) – अरुणा डाबरे – ८००६
१३(ब) – सॅरल डाबरे( काँग्रेस) – ११८०६

