मीरा रोडमध्ये दोन मतिमंद मुलांसह महिलेची आत्महत्या

पोलिसांना घटनास्थळी झोपेच्या गोळ्यांची रिकामे पाकिटे आढळली आहेत.

प्रतिनिधिक छायाचित्र

वसई : मीरा रोडमध्ये एका महिलेने दोन मतिमंद मुलांसह आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली आहे. दोन्ही मुलांना आधी झोपेच्या गोळ्या देऊन नंतर महिलेने स्वत: गोळ्यांचे सेवन करून आत्महत्या केली असावी, अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

मीरा रोड येथील नरेंद्र पार्क परिसरातील जुही इमारतीमधील सी-२ या फ्लॅटमध्ये नसरीन बानू (४७) ही महिला वृद्ध वडील आणि सदाद नाझ (२१) आणि मोहम्मद अर्ष (१३) या दोन मुलांसह राहात होती. तिची दोन्ही मुले मतिमंद होती. वर्षभरापूर्वी तिचा घटस्फोट झाल्यानंतर ती दोन्ही मतिमंद मुलांसह माहेरी राहायला आली होती. तिच्या वडिलांच्या निवृत्तिवेतनावरच घर चालत असे. मंगळवारी सकाळी नसरीनचे वडील त्यांना उठवायला गेले असता तिघे मृतावस्थेत आढळून आले.

पोलिसांना घटनास्थळी झोपेच्या गोळ्यांची रिकामे पाकिटे आढळली आहेत. तिघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी जे.जे. रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. या प्रकरणी नया नगर पोलीस ठाण्यात अपमृत्यूचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Woman commits suicide with two mentally retarded children in mira road zws

ताज्या बातम्या