वाहतूक विभागाला तक्रारी देऊनही दुर्लक्ष

भाईंदर : मीरा-भाईंदर शहरात बेशिस्त रिक्षा चालकांच्या वाढत्या अरेरावीपणामुळे महिला रिक्षा चालक त्रस्त झाले आहे. यामुळे महिलांना व्यावसाय करणे कठीण झाले असून या संदर्भात वाहतूक विभागाला वारंवार तक्रारी देऊन देखील कारवाई होत नसल्याची खंत महिलांनी व्यक्त केली आहे.

मीरा-भाईंदर शहरात प्रत्येक क्षेत्रात महिला अग्रेसर असाव्या याकरिता पालिकेकडून अबोली रिक्षा  उपक्रम राबवण्यात आला. या अंतर्गत शहरात पुरुष रिक्षा चालकासह  महिला चालक देखील रस्त्यावर रिक्षा चालवून व्यावसाय करू लागल्या.मात्र शहरातील वाढत्या बेशिस्त रिक्षा चालकांमुळे व अनियोजित कारभारामुळे महिला पुन्हा या योजनेकडे पाठ फिरवत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे कधीकाळी पन्नासच्या वर गेलेली महिला रिक्षाचालक संख्या आता २० ते २५ च्या घरात येऊन थांबली आहे. तर सध्या व्यावसाय करत असलेल्या महिलांना देखील अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

यात भाईंदर पश्विम रेल्वे स्थानकावर लावण्यात येणाऱ्या रिक्षा रांगेत बेशिस्त रिक्षा चालक शिस्त न पाळत प्रवाशी बसवत आहेत. तर वाढत्या अनधिकृत रिक्षा चालकांमुळे व्यवसायावर  देखील परिणाम होत असल्याची तक्रार महिला चालकांनी वाहतूक विभागाला केली आहे. मात्र महिलांच्या या तक्रारी कडे वाहतूक विभाग गांभीर्याने लक्ष देत नसल्याने महिलांनी थेट शहराच्या महापौर ज्योस्त्ना हसनाळे यांस कडे मदतीची मागणी केली आहे.या संदर्भात महिला चालकांनी गेल्या आठवडय़ात महापौरांची भेट घेऊन वाहतूक विभागाचा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी केली तसेच महापौरांकडून आयोजित करण्यात आलेल्या वाहतूक बैठकीत आपला एक प्रतिनिधी घेण्यात यावा अन्यथा येणाऱ्या काळात महिला रिक्षा चालक संपुष्टात येथील अशी लेखी खंत व्यक्त केली आहे.

महिला रिक्षा चालकांच्या समस्या अधिक गंभीर आहेत. त्यामुळे यावर उपाय काढण्याकरिता २५ नोव्हेंबर रोजी वाहतूक विभागासह रिक्षा युनियमच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावण्यात आली आहे.

आम्ही प्रामाणिक पणे रिक्षा चालवून व्यावसाय करतो. मात्र काही बेशिस्त रिक्षा चालक रांगेची शिस्त व वाहतूक नियम पाळत नाही.तसेच त्यांना काही म्हटल्यास ते दमदाटीपणा करतात.या संदर्भात आम्ही वाहतूक पोलिसांना वारंवार तक्रार देत असतो. मात्र कोणतीही कारवाई होत नाही. अशा परिस्थितीत रोज वाद घालण्यापेक्षा व्यवसाय बंद करणे हाच पर्याय आमच्या कडे राहिला आहे असे वाटते.

प्रतीक्षा शिंदे, महिला रिक्षाचालक