वसई- विरारचा पाणीप्रश्न लवकरच सुटणार

वसई: वसई-विरार शहरातील पाणी समस्या सुटावी यासाठी पालिकेने अमृत योजनेच्या कामाला गती दिली आहे. आतापर्यंत शहरातील ८० टक्के पाणी योजनेचे काम पूर्ण झाले असून मार्चअखेपर्यंत उर्वरित काम पूर्ण करण्यात येणार आहे. वसई-विरार शहराची लोकसंख्या ही झपाटय़ाने वाढू लागली आहे. या वाढत्या नागरिकीकरणामुळे शहरात पाण्याची मोठी समस्या निर्माण होऊ लागली आहे. सध्या स्थितीत पालिकेकडे उपलब्ध असलेला पाणीसाठाही अपुरा पडू लागला आहे. त्यामुळे नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.

शहरातील नागरिकांना पुरेशा प्रमाणात पाणी उपलब्ध व्हावे यासाठी वसई-विरार महानगरपालिकेने सन २०१६ मध्ये १३९ कोटीं रुपयांची अमृत योजना मंजूर करून कामाची सुरुवात केली होती. परंतु मध्यंतरी ठेकेदाराने केलेल्या हलगर्जीपणामुळे हे काम रखडले होते. त्यामुळे महानगरपालिकेने नवीन ठेकेदार नेमून या योजनेच्या कामाला गती दिली आहे. या अमृत योजनेंतर्गत शहरात २८४ किलोमीटर इतक्या जलवाहिन्या अंथरण्यात येणार असून यात १८ जलकुंभ ही उभारण्यात येणार आहेत. सद्यस्थितीत या योजनेतून सव्वा दोनशेहून अधिक किलोमीटपर्यंत जलवाहिन्या टाकण्याचे काम पूर्ण झाले आहेत तर आठ जलकुंभ बांधून तयार आहेत. 

इतर जलकुंभ उभारणी करण्याची कामेही प्रगतिपथावर असल्याची माहिती महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून देण्यात आली आहे. तसेच ज्या काही उर्वरित जलवाहिन्या अंथरण्याची कामे आहेत तीसुद्धा मार्चअखेपर्यंत पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती महानगरपालिकेचे शहर अभियंता एम. जी गिरगांवकर यांनी दिली आहे.

पाणी अपुरेच..

वसई-विरार शहराला दररोज २३० दश लक्ष लिटर पाण्याचा पुरवठा केला जात आहे. यात सूर्यामधून २०० , उसगाव धरणातून २० व पेल्हार धरणातून १० अशा स्वरूपात पाणी उपलब्ध होत आहे. असे जरी असले शहराच्या वाढत्या लोकसंख्येच्या मानाने अपुरे आहे.

शहराच्या लोकसंख्ये नुसार ३७० दशलक्ष लिटर पाण्याची गरज आहे.परंतु सध्या केवळ २३० दशलक्ष लिटर पाणी उपलब्ध आहे. १४० दशलक्ष लिटर पाण्याची तूट आहे. तसेच एमएमआरडीए कडून सूर्या धरणातून ४०० दशलक्ष लिटर पाणी उपलब्ध होण्यासाठी प्रकल्पाचे काम सुरू आहे. त्यातून वसई विरारला १८५ दशलक्ष लिटर पाणी मिळणार आहे. त्या अनुषंगाने शहरातील अंतर्गत वितरण व्यवस्था तयार करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती पाणी पुरवठा विभागाकडून देण्यात आली आहे.

वसई-विरार शहरातील पाण्याची समस्या लक्षात घेता अमृत योजनेचे कामही गतीने सुरू  आहे. आतापर्यंत अमृत योजनेचे जवळपास ८० टक्के पूर्ण झाले आहे. लवकरच उर्वरित काम पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

एम. जी गिरगांवकर, शहर अभियंता, पाणीपुरवठा विभाग