वसई: वसई-विरार महापालिकेने पावसाळय़ापूर्वी शहरात नालेसफाईची कामे सुरू केली आहेत. परंतु विरार येथील बोळिंज आगाशी परिसरात करण्यात आलेली नालेसफाई तकलादू असल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यामुळे पुन्हा विरार पाण्याखाली जाण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे.
मागील काही वर्षांपासून वसई-विरार शहरात पूरस्थितीची समस्या निर्माण होत आहे. यामुळे शहरातील जनजीवन विस्कळीत होत असते. यावर उपाययोजनेचा भाग म्हणून दरवर्षी नालेसफाई केली जात. याच अनुषंगाने यंदाही पावसाळय़ात पडणाऱ्या पाण्याचा निचरा योग्य प्रकारे व्हावा यासाठी पालिकेकडून नालेसफाई करण्यात येत आहे. यात खाडी पात्र व शहरातील नाल्यांचा गाळ काढण्याचे काम सुरू केले आहे. मात्र काही ठिकाणच्या भागात योग्यरीत्या नालेसफाई केली जात नसल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत. विरार येथील बोळिंज आगाशी परिसरातील नाल्यांची ठेकेदाराने योग्य ती स्वच्छता केली नसल्याने अनेक ठिकाणच्या भागात गाळ हा साचून राहिला आहे असे येथील नागरिकांनी सांगितले आहे. याआधीच आगाशी येथील मुख्य रस्त्यावरील पूर्वीचे अनेक नाले हे बुजून गेले आहेत त्यामुळे पाणी वाहून जाण्यास अडचणी निर्माण होत आहेत. त्यातच आता करोडो रुपये खर्च करून अशा प्रकारची तकलादू नालेसफाई केली जात आहे. त्यामुळे पुन्हा एकदा आगाशीसह आजूबाजूच्या भागातील गावे पाण्याखाली जाण्याची शक्यता असल्याचे महेश भोईर यांनी सांगितले आहे.
याशिवाय नालेसफाईचे काम करण्यासाठी ठेकेदाराने या ठिकाणी असलेला बांधही तोडून ठेवला आहे. हा बांध भरतीच्या वेळी खारे पाणी भात शेतीमध्ये जाऊ नये यासाठी उभारण्यात आला होता. मात्र तोसुद्धा बांध तोडून ठेवला आहे. यामुळे खारे पाणी भातशेतीमध्ये जाऊन शेतीचे नुकसान होण्याची भीती ही भोईर यांनी व्यक्त केली आहे.
पालिकेने बोळिंज आगाशी परिसरातील नाल्यांची सफाई अतिशय तकलादू केली आहे. त्यामुळे पावसाळय़ात पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. यासाठी पालिकेने तात्काळ याकडे लक्ष देऊन योग्य ती नालेसफाई करावी. – महेश भोईर, सामाजिक कार्यकर्ते