scorecardresearch

नारिंगी उड्डाणपुलाचे काम धिम्या गतीने

विरारजवळील नारिंगी रेल्वे फाटकावर होणाऱ्या वाहतूक कोंडीतून सुटका होण्यासाठी नारिंगी येथे उड्डाणपूल तयार करण्याचे काम  सुरू केले आहे.

आतापर्यंत ५५ टक्के काम पूर्ण;  कामाला गती देण्याची नागरिकांची  मागणी

वसई : विरारजवळील नारिंगी रेल्वे फाटकावर होणाऱ्या वाहतूक कोंडीतून सुटका होण्यासाठी नारिंगी येथे उड्डाणपूल तयार करण्याचे काम  सुरू केले आहे. मात्र या पुलाचे काम धिम्या गतीने सुरू आहे. आतापर्यंत केवळ या पुलाचे ५५ टक्के इतके काम पूर्ण झाले आहे. विरारजवळील भागात नारिंगी परिसर आहे. तसेच विरार पूर्व-पश्चिमेकडील भागात ये-जा करण्यासाठीचा मार्गही याच भागातून गेला आहे. मात्र मध्यभागी पश्चिम रेल्वेची वाहिनी गेल्यामुळे या ठिकाणी फाटक बसविण्यात आले आहे. रेल्वे मार्गातून लोकल, मेमू व इतर लांब पल्ल्याच्या गाडय़ा जात असल्याने अनेकदा फाटक हे बंद ठेवावे लागत आहे. फाटक बंद होत असल्याने या भागात वाहतूक कोंडीची मोठी समस्या निर्माण होत असते. यावर उपाययोजना म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत नारिंगी फाटकावर उड्डाणपूल तयार करण्यात येत आहे. तयार करण्यात येणारा पूल हा ७२५ मीटर लांबीचा असून १४ मीटर रुंद आहे. यासाठी २४ कोटी रुपये इतका खर्च केला जाणार आहे. गेल्या काही वर्षांपासून या पुलाचे काम सुरू आहे. मात्र अजूनही  हे काम पूर्णत्वास गेले नसल्याने नागरिकांना विविध प्रकारच्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.  यासाठी या पुलाच्या कामाला गती देऊन लवकरच पूर्ण करावे अशी मागणी नागरिकांमधून करण्यात येत आहे.

या पुलाचे काम पूर्ण व्हावे या अनुषंगाने सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. अगदी करोनाच्या काळातही सर्व नियमांचे पालन करून या पुलाचे काम सुरू ठेवले होते. आताही या पुलाचे काम चांगल्या रीतीने सुरू आहे. आतापर्यंत या पुलाचे ५५ टक्के काम पूर्ण झाले आहे. लवकरच उर्वरित काम पूर्ण केले जाईल, असे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सांगण्यात आले आहे.

वाहतूक कोंडीतून सुटका कधी?

येथून जाणाऱ्या रेल्वेगाडय़ांची संख्या वाढली आहे. त्यामुळे दिवसातून अनेकदा फाटक बंद करावे लागत आहे. सातत्याने फाटक बंद होत असल्याने वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होऊ लागली आहे. दिवसेंदिवस या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनांची संख्याही वाढली आहे. त्यामुळे अधिक वाहतूक कोंडी होऊ लागली आहे. संध्याकाळच्या सुमारास व शनिवार-रविवारी या मार्गावर कोंडीचे प्रमाण अधिक असल्याने तासनतास वाहनचालकांसह नागरिकांना कोंडीत अडकून राहावे लागत आहे. यासाठी या कोंडीतून सुटका कधी असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.

नारिंगी उड्डाणपुलाच्या कामाला चांगली गती दिली आहे. लवकर हे काम पूर्ण व्हावे यासाठी प्रयत्न सुरू आहेत. आता ज्या काही अडचणी येत आहेत त्या दूर करून काम पूर्णत्वास नेले जाईल. 

– प्रशांत ठाकरे, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग

मराठीतील सर्व वसई विरार ( Vasaivirar ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Work orange flyover slow ysh

ताज्या बातम्या