वसई: जागतिक कांदळवन दिनानिमित्त भाईंदरमधील जैसल पार्क खाडी परिसरात रविवारी कांदळवन स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या उपक्रमात १०० हून अधिक स्वयंसेवकांनी सहभागी होत ७५० किलोपेक्षा अधिक कचरा कांदळवनातून बाहेर काढला.
दरवर्षी २६ जुलै हा दिवस जागतिक कांदळवन दिन म्हणून साजरा केला जातो. युनेस्कोने २०१५ मध्ये या दिनाची घोषणा केली असून कांदळवनांचे (खारफुटीचे) महत्त्व, त्यांचे संरक्षण आणि संवर्धन करण्याबाबत जनजागृती करणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे. याच पार्श्वभूमीवर फॉर फ्यूचर इंडिया, मँग्रोव्ह फाउंडेशन आणि महाराष्ट्र वन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने भाईंदर पूर्वेतील जैसल पार्क खाडी परिसरात भव्य कांदळवन स्वच्छता अभियान आयोजित करण्यात आले.
या अभियानामध्ये १०० हून अधिक स्वयंसेवकांनी उत्स्फूर्त सहभाग घेत सुमारे ७५० किलोहून अधिक कचरा कांदळवनातून बाहेर काढला. या उपक्रमात पाटकर कॉलेज एनएसएस युनिट, एलआरएमसी कॉलेज एनएसएस युनिट, रॉयल कॉलेज एनएसएस युनिट, तसेच शहरातील अनेक विद्यार्थी, पर्यावरणप्रेमी, युवक, सामाजिक संस्था आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या स्वच्छता विभागानेही या अभियानात सहकार्य केले.
यावेळी सहभागी स्वयंसेवकांना कांदळवनांचे पर्यावरणीय, जैवविविधता, हवामान बदल नियंत्रण तसेच किनारपट्टी संरक्षणातील राष्ट्रीय व जागतिक महत्त्व याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. तसेच संपूर्ण परिसर स्वच्छ करून कांदळवन संवर्धनाचा संदेश देण्यात आला.
तसेच मिरा-भाईंदर परिसरातील कांदळवन नाश प्रकरणांमध्ये दाखल झालेल्या तक्रारी व आरोपपत्रांमधील कथित प्रक्रियात्मक त्रुटी, तपासातील विसंगतींबाबत नाराजी व्यक्त केली. तर, सन २००५ ते २०२५ या कालावधीत पर्यावरण (संरक्षण) अधिनियम, १९८६ अंतर्गत मिरा-भाईंदर पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात दाखल झालेल्या २०० हून अधिक प्रकरणांचे स्वतंत्र विशेष ऑडिट व विशेष चौकशी करण्यात यावी, अशीही मागणीही यावेळी करण्यात आली.
याबाबत बोलताना फॉर फ्यूचर इंडिया संस्थेचे अध्यक्ष व संस्थापक हर्षद ढगे म्हणाले की, “आमची मागणी कोणत्याही व्यक्तीविरोधात नाही; ती कायद्याच्या समान अंमलबजावणीसाठी आहे. पर्यावरणीय गुन्ह्यांमध्ये दोषी कोणताही असो, त्याच्यावर निष्पक्ष तपास आणि कायद्यानुसार कारवाई झाली पाहिजे. हाच पर्यावरण न्यायाचा पाया आहे.”
