वसई : वसई विरारमधील मातीची गुणवत्ता व शेतीचे क्षेत्र टिकावी म्हणून कृषी विभागाकडून प्रयत्न केले जात आहेत. तर जागतिक मृदा दिनाचे औचित्य साधून शेतकऱ्यांना मातीचे नमुने काढणे, मातीची गुणवत्ता तपासणे अशा विविध बाबींची माहिती दिली जाणार आहे.
गेल्या काही काळात वसई विरार शहरात झालेले नागरीकरण, जागोजागी उभे राहणारे काँक्रीटचे जंगल यामुळे ग्रामीण भागातील शेतीखाली असणारे क्षेत्र कमी होऊ लागले आहे. तर घसरत जाणारी भूजल पातळी मातीची धूप अशा विविध समस्यांमुळे मातीच्या गुणवत्तेत होणाऱ्या घसरणीमुळे शेतकऱ्यांसमोर नवे आव्हान उभे राहिले आहे. त्यामुळे शहरातील उरलेले शेतीखालील क्षेत्र टिकून राहावे आणि मातीची गुणवत्ता टिकून राहावी, यासाठी तालुका कृषी विभागाकडून प्रयत्न केले जात आहेत.
शेतकऱ्यांमधील मृदा साक्षरता वाढविणे आणि मृदा संवर्धनाच्या दृष्टीने वसई तालुका कृषी विभागाकडून जागतिक मृदा दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना मातीचे नमुने काढणे, गुणवत्ता तपासणे अशा विविध बाबींची माहिती दिली जाणार आहे. वसई विरारमधील वाघोली, आगाशी, मालजीपाडा, नारिंगी, भाताणे, आडणे आणि नाळे अशा सात ठिकाणी या कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार आहे. यात तब्बल २०० ते ३०० शेतकरी सहभागी होणार आहेत.
कसदार मातीसाठी प्रयत्न
ऑगस्ट ते ऑक्टोबर या तीन महिन्यांच्या कालावधीत तालुका कृषी विभागाकडून वसई तालुक्यातील विविध शेतजमिनींचे नमुने गोळा करण्यात आले होते. तसेच प्रयोगशाळेत या नमुन्यांची तपासणी करण्यात आली होती. या मातीच्या नमुन्यांच्या आधारे शेतकऱ्यांना मातीत कोणत्या पोषक द्रव्यांची कमतरता आहे? त्यासाठी कोणत्या खतांचा किती प्रमाणात वापर करायचा? याबद्दल माहिती दिली जाणार आहे. तसेच तीन वर्षांच्या पिक लागवडीच्या नियोजनाबद्दल सांगितले जाणार आहे. तर मातीचा नमुना काढण्याचे प्रशिक्षणही दिले जाणार आहे.
मृदा आरोग्य पत्रिकांचे वाटप
जागतिक मृदा दिन विशेष कार्यक्रमात शेतकऱ्यांना तालुका कृषी विभागाकडून ६९६ मृदा आरोग्य पत्रिकांचे वाटप केले जाणार आहे. यात भाताणेत ६०, नारिंगीत १२०, कामणमध्ये ३८, नवळेमध्ये १२०, कोल्हापूरमध्ये १२०, रानगावमध्ये ९२, करंजोनमध्ये १२५, भालीवलीमध्ये ५, तिल्हेरमध्ये १०, मेढे येथे ६ आरोग्य पत्रिकांचे वाटप केले जाणार आहे.
वसई तालुक्यातील मातीची गुणवत्ता घसरत असताना ती टिकवण्यासाठी तसेच शेतकऱ्यांमधील मृदा साक्षरता वाढवण्यासाठी कृषी विभागाकडून प्रयत्न केले जात आहेत. याचाच एक भाग म्हणून या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. – सूरज जाधव, तालुका कृषी अधिकारी, वसई.
