सुहास बिऱ्हाडे
वसई : २००३ मध्ये झालेल्या अमेरिकन मॉडेलच्या हत्या प्रकरणाचा नव्याने तपास करण्यात आहे. पोलिसांचे एक पथक आरोपीला पकडण्यासाठी युरोपला रवाना होत आहे. परदेशातील आरोपीला ताब्यात घेण्यासाठी स्थानिक पोलिसांनी परदेशात जाण्याची ही पहिलीच वेळ आहे. विशेष म्हणजे या प्रकरणातील दोन्ही आरोपी निर्दोष सुटल्यानंतर पोलिसांनी या निकालाला आव्हान दिले असून १९ वर्षांनी हा खटला पुन्हा उभा राहणार आहे.
लिओन स्विडेस्की (३३) या अमेरिकन मॉडेलची ८ फेब्रुवारी २००३ रोजी मुंबई विमानतळावरून अपहरण करून हत्या करण्यात आली होती. तिचा मृतदेह काशिमीरा येथील एका महामार्गालगत आढळला होता. अमेरिकन सरकारने लिओनाच्या हत्येची गंभीर दखल घेऊन आपले तपास पथक मीरा रोडला पाठवले होते. या प्रकरणी पोलिसांनी लिओनचा प्रियकर अनिवासी भारतीय प्रग्नेश देसाई आणि विपुल पटेल या दोघांना अटक केली होती तर दोन आरोपी फरार होते. एका वर्षांत या खटल्याचा निकाल लागला आणि दोन्ही आरोपी निर्दोष सुटले होते. त्याचे तीव्र पडसाद अमेरिकेत उमटले होते.
१९ वर्षांनी नव्याने शोध
अमेरिकन सरकाने गंभीर दखल घेतल्याने पोलिसांनी या निकालाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले. न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी असताना दोन्ही आरोपी गैरहजर रहात होते. त्यामुळे खटल्यात प्रगती होत नव्हती. पोलीस आयुक्त सदानंद दाते यांनी या प्रकरणात लक्ष घालून दोन्ही आरोपींना शोधून हजर करण्याचे निर्देश दिले होते. या प्रकरणातील मुख्य आरोपी प्रग्नेश देसाई हा बडोद्यामध्ये असल्याचे समजल्यानंतर त्याला न्यायालयामध्ये हजर करण्यात आले होते. मात्र विपुल पटेल हा इंग्लंडमध्ये स्थायिक झाल्याचे समजले. आयुक्त दाते यांनी याप्रकरणी इंटरपोटलची मदत घेतली आणि विपुल पटेलचा शोध सुरू झाला. दरम्यान चेक रिपब्लिक येथील प्राग शहरातील विमानतळावर इंटरपोलच्या मदतीने विपुल पटेल याला ताब्यात घेतले गेले. त्याच्या हस्तांतरणाची प्रक्रिया मागील ४ महिन्यांपासून सुरू होती. ती पूर्ण झाली असून त्याला ताब्यात घेण्यासाठी एक विशेष पथक शनिवारी प्राग शहरात जाणार आहे. या पथकात परिमंडळ १ चे पोलीस उपायुक्त अमित काळे, नवघर पोलीस ठाण्याचे साहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश काळे, गुन्हे शाखा ३ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद बडाख आणि काशिमिरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय हजारे यांचा समावेश आहे.
लिओन हत्या प्रकरण काय होते ?
लिओन ही अमेरिकेतील मॉडेल होती. आरोपी प्रग्नेश देसाई हा अमेरिकन अनिवासी नागरिक होता. दोघांचे प्रेमसंबंध होते आणि लग्न करणार होते. मात्र प्रग्नेश विवाहित असल्याचे लिओनला समजले. त्यांचा त्यावरुन वाद झाला. दरम्यान लिओन प्रग्नेशच्या पत्नीची हत्या करणार असल्याची माहिती प्रग्नेशला मिळाली. तिची हत्या करून तिच्या विम्याचे १ दशलक्ष डॉलर्स हडपण्यासाठी प्रग्नेशने त्याचा मित्र विपुल पटेल आणि अन्य दोन आरोपींबरोबर तिला मारण्याचा कट केला. त्यानुसार तिला ८ फेब्रुवारी २००३ रोजी तिला भारतात बोलावले. तिला वाहनात बसवल्यावर चौघांनी तिची गळा दाबून हत्या केली आणि तिचा मृतदेह फेकून दिला होता. युरोपातून विपुलला आणल्यानंतर अन्य दोन फरार आरोपींवर नव्याने आरोपपत्र दाखल करून हा खटला चालवला जाणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Year reinvestigation american model murder kashmir police europe arrest accused amy
First published on: 20-05-2022 at 00:16 IST