वसई : एका महिन्यापूर्वी नायगावमधून बेपत्ता झालेल्या २९ वर्षीय तरुणीची तिच्या प्रियकराने हत्या केल्याचे उघड झाले आहे. आरोपीने पत्नीच्या मदतीने सुटकेसमध्ये मृतदेह भरून तो दुचाकीवरून गुजरातच्या वलसाड येथे नेऊन खाडीकिनारी टाकला. नायगाव पोलिसांनी आरोपी पती-पत्नीला अटक केली आहे.
सिनेसृष्टीत केशभूषाकाराचे काम करणारी तरुणी नायगाव पूर्वेतील एका इमारतीतील सदनिकेत एकटी राहात होती. १२ ऑगस्टपासून ती बेपत्ता होती. याबाबत तिच्या बहिणीने मनोहर शुक्ला (३४) याच्यावर संशय व्यक्त केला होता. ९ ऑगस्ट रोजी मनोहर शुक्ला हा संबंधित इमारतीतून पत्नीबरोबर सुटकेस घेऊन बाहेर पडताना ‘सीसीटीव्ही’मध्ये आढळला आला होता. पोलिसांच्या अधिक चौकशीत त्याने हत्येची कबुली दिली.
हेही वाचा >>> वर्सोवा येथे महिलेवर चाकूने हल्ला करणारा पती अटकेत
संबंधित तरुणी आणि मनोहर यांचे प्रेमसंबंध होते. मात्र, मनोहरने तिला फसवून दुसरे लग्न केले. यामुळे तिने वालीव पोलीस ठाण्यात मनोहर शुक्लाविरोधात बलात्काराची तक्रार दिली होती. ही तक्रार मागे घेण्यासाठी मनोहर दबाव आणत होता. त्यावरून त्यांच्यात वाद व्हायचे. या वादातून त्याने ९ ऑगस्ट रोजी हत्या केली, अशी माहिती पोलीस निरीक्षक मंगेश अंधारे (गुन्हे) यांनी दिली.
हेही वाचा >>> मुंबई: भांडण सोडवायला गेलेल्या पोलिसांना मारहाण, दोन महिलांसह पाच जणांना अटक
मनोहर शुक्ला याने मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी पत्नीची मदत घेतली. मृतदेह सुटकेसमध्ये भरून हे दोघे दुचाकीवरून गुजरातच्या वलसाडला गेले. यावेळी दुचाकीवर त्यांची दोन वर्षांची मुलगीही होती. त्यांनी खाडीकिनारी मृतदेह फेकला. १३ ऑगस्ट रोजी कुजलेल्या अवस्थेत तरुणीचा मृतदेह वलसाड पोलिसांना मिळाला होता, अशी माहिती वसईच्या साहाय्यक पोलीस आयुक्त पद्मजा बडे यांनी दिली. त्यावेळी ओळख न पटल्याने वलसाड पोलिसांनी डीएनए नमुने जतन करून मृतदेहावर अंत्यसंस्कार केले होते.