वसई : वडिलांशी असलेल्या वादामुळे त्यांच्या निधनानंतर त्यांच्या दोन्ही मुलींनी मृतदेहावर अंत्यसंस्कार न करता मृतदेह चार दिवस घरातच ठेवला होता. यानंतर त्यांनी सामूहिक आत्महत्येचा निर्णय घेतला. तो फसल्याने मंगळवारी मोठ्या बहिणीने समुद्रात उडी घेऊन आत्महत्या केली आणि बुधवारी लहान बहिणीनेही समुद्रात उडी मारण्याचा प्रयत्न केला. परंतु स्थानिकांच्या सतर्कतेमुळे तिला वाचविण्यात यश आले. विरारमध्ये बुधवारी हा प्रकार समोर आला.

विरार पश्चिमेच्या अग्रवाल सिटी येथील गोकुल कॉम्प्लेक्स परिसरातील ब्रोकलीन इमारतीत हरिदास सहारकर (७२) हे पत्नी तसेच विद्या (४०) आणि स्वप्नाली (३६) या दोन मुलींसह काही दिवसांपूर्वी राहायला आले होते. सहारकर हे शिधावाटप विभागातून निवृत्त झाले होते. आई मानसिक रुग्ण आहे. रविवार, १ ऑगस्ट रोजी हरिदास यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचा मृत्यू झाला. वडिलांवर असलेल्या रागामुळे त्यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करायचाच नाही आणि कुणाला कळवायचेही नाही असे त्यांनी ठरवले.

त्यानुसार त्यांनी वडिलांचा मृतदेह शयनकक्षात ठेवला आणि मृतदेहाला दुर्गंधी येऊ  नये यासाठी कापूर, धूप तसेच अगरबत्ती लावून ठेवत होते. मात्र नंतर त्यांनी  आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला.  मोठी बहीण विद्या हिने अर्नाळाजवळील नवापूर समुद्रकिनाऱ्यावर जाऊन आत्महत्या केली.  बुधवारी सकाळी स्वप्नाली ही सुद्धा आत्महत्या करण्यासाठी नवापूर समुद्रात गेली होती. मात्र नागरिकांच्या सतर्कतेमुळे हा तिला वाचविण्यात आले.  दोन्ही बहिणींचे वडिलांशी सतत वाद व्हायचे. त्या विक्षिप्त झाल्या होत्या असे पोलीस उपायुक्त प्रशांत वाघुंडे यांनी सांगितले