वसई : वसई विरार महापालिका क्षेत्रात येत असलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळा व आरोग्य केंद्र विनामूल्य हस्तांतरण करण्यासाठी निर्णय घेण्यात आला आहे. मात्र शासन स्तराववरुन हस्तांतरणाच्या संदर्भात अजूनही परिपत्रक जाहीर न झाल्याने हस्तांतरणासाठी प्रतिक्षा करावी लागत आहे.
शाळा हे महापालिकांचे मूलूभत कर्तव्य असले तरी वसई विरार महापालिकेच्या मालकीची एकही शाळा नाही. तर दुसरीकडे जी जिल्हा परिषदेची आरोग्य केंद्र आहेत त्यांचीही दयनीय अवस्था झाली आहे. पालिकेच्या कार्यक्षेत्रात जिल्हा परिषदेच्या ११७शाळा आणि ३ प्राथमिक आरोग्य केंद्र, १२ उपकेंद्र येत आहेत. शैक्षणिक व आरोग्याच्या दृष्टीने त्याचे बळकटीकरण व्हावे यासाठी शाळा, आरोग्य केंद्रांच्या सर्व आस्थापना मालमत्तांसह महापालिकेकडे हस्तांतरण करण्याची मागणी अनेक वर्षापासून करण्यात येत आहे. मात्र शासन स्तरावरून याबाबत ठोस निर्णय घेतला जात नव्हता. याबाबत वसई विरार मधील लोकप्रतिनिधींनी याबाबत पाठपुरावा सुरू केला होता.
पावसाळी अधिवेशन सुरू असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नगरविकास राज्यमंत्री, वसई विरार शहरातील लोकप्रतिनिधी, विविध विभागाचे अधिकारी यांची बैठक पार पडली होती. यात पालिकेच्या कार्यक्षेत्रात येत असलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळा व आरोग्य केंद्र विनामूल्य हस्तांतरण करण्याचे निर्देश देण्यात आले होते.त्यानुसार जिल्हा नियोजन समितीमध्ये पालिका क्षेत्रातील आरोग्य केंद्र व उपकेंद्र पालिकेला हस्तांतरित करणे आणि त्यानंतर तेथील मनुष्यबळ घेऊन पालघर जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या ग्रामीण भागात तितकेच प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र स्थलांतरित करण्यास समितीची मंजुरी घेण्यात आली आहे. तर जिल्हा परिषदेच्या ११७ शाळा वसई विरार महापालिकेला हस्तांतरित करण्यासाठी यापूर्वीच जिल्हा नियोजन समितीची मंजुरी घेतली होती. या हस्तांतरण करण्याची प्रक्रिया जिल्हा स्तरावरून सुरू करण्यात आली असून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांनी ग्रामविकास विभागाच्या प्रधान सचिवांना या संदर्भातील प्रस्ताव मान्यतेसाठी सादर केला आहे. प्रस्तावाला मान्यता मिळाल्यानंतर नियमानुसार पुढील प्रक्रिया पार पाडली जाईल असे रानडे यांनी सांगितले आहे.
प्रस्तावाला मान्यतेची प्रतिक्षा
जिल्हा परिषदेच्या नियोजन समितीच्या बैठकीत ही शाळा व आरोग्य केंद्र हस्तांतरणाचा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. विनामूल्य हस्तांतरण करण्याची घोषणा जरी झाली असली तरी त्याबाबत मान्यतेचे परिपत्रक अजून जारी करण्यात आले नाही. त्यामुळे प्रस्तावाला अजूनही मान्यतेची प्रतीक्षा करावी लागत आहे.
१५० कोटींच्या मालमत्तांचे विनामूल्य हस्तांतरण
ग्रामविकास विभागाच्या २० जुलै १९९९ च्या शासन परिपत्रकानुसार जिल्हा परिषद मालकीच्या जमीन किंवा इमारती नगर परिषद ,नगरपालिका किंवा महापालिकेला हस्तांतरित करायचे असल्यास त्या मालमत्तांचे मूल्य ठरवून ते संबंधित यंत्रणेकडून वसूल करावे असा नियम आहे. त्यानुसार जिल्हा परिषदेने शाळांचे व आरोग्य केंद्राचे मूल्यांकन १५० कोटी केले होते. मात्र आता या मालमत्ता विनामूल्य देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिल्यानंतर या मालमत्ता विनामूल्य हस्तांतरण होणार आहेत.
हस्तांतरण झाल्यानंतर विकासावर भर
शाळा व आरोग्य केंद्र ही पालिकेकडे वर्ग झाल्यानंतर त्यांचा विकास व त्याबाबतची पुढील प्रक्रिया राबविण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. जी आरोग्य केंद्र मोडकळीस आली आहेत. त्यांचेही नूतनीकरण करणे व सोयीसुविधांयुक्त सुसज्ज बनविणे अशी कामे मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले जातील असे महापालिकेने सांगितले आहे.
