दिवसेंदिवस मुंबईची गर्दी वाढत आहे. अशा वेळी शांत, निसर्गाच्या सान्निध्यातील मुंबईतले घर हे कल्पनेतच साकारू शकते, असे वाटत असतानाच सरकारी योजनांच्या पुढाकारामुळे अशी घरे मुंबईपासून हाकेच्या अंतरावर निर्माण होऊ लागली आहेत. नेरळ-कर्जत पट्टा  हे त्याचे उत्तम उदाहरण.

‘प्रधानमंत्री आवास योजना’ आणि २०२२ पर्यंत सर्वासाठी स्वत:चे घर या सरकारी योजनांच्या पुढाकारामुळे परवडण्याजोग्या किमतीत घरे  ही संकल्पना मोठय़ा प्रमाणावर पुढे येत आहे. त्यातच रिअल इस्टेट रेग्युलेटरी अ‍ॅक्टमुळे घर खरेदी-विक्री करण्याची प्रक्रिया अधिक पारदर्शी होणार आहे. या दोन्ही गोष्टींच्या एकत्रित येण्यामुळे लवकरच रिअल इस्टेट बाजारात तेजी पाहायला मिळेल यात शंकाच नाही.

चलन निश्चलीकरणामुळे गृह व्याजाचे दर एकदमच खाली घसरले. गेल्या सहा वर्षांचा आढावा पाहिल्यास हे दर चांगलेच खाली आलेले जाणवतात. अलीकडेच, केंद्र सरकारने नऊ ते बारा लाखापर्यंतच्या गृहकर्जाच्या व्याजावर तीन ते चार टक्क्यांपर्यंत सरकारी अनुदान देण्याचे जाहीर केले आहे. सरकारच्या या निर्णयामुळे सर्वाना परवडण्याजोग्या किमतीत घरे उपलब्ध, हे निव्वळ स्वप्न न राहता खऱ्या अर्थाने वास्तवात येईल आणि खरोखरीच २०२२ पर्यंत सर्वासाठी स्वत:चे घर ही संकल्पना प्रत्यक्षात आलेली दिसेल.

दिवसेंदिवस मुंबईची गर्दी वाढत चालल्यामुळे मनमोकळेपणाने श्वास घेत जगणे आता अधिकाधिक कठीण होऊ लागले आहे. परिणामी, ताज्या आणि मोकळ्या हवेत, निसर्गाच्या सान्निध्यात राहण्यासाठी किंवा गुंतवणूक म्हणून घर घेताना देखील लोक  मुंबई सोडून इतरत्र पर्यायांचा विचार करू लागले आहेत. यात असे दिसून आले आहे की, दादर, परळ, एल्फिस्टन रोड, ठाणे, डोंबिवली, भांडुप याचबरोबर मुंबई आणि नवी मुंबई परिसरातील बरीच मंडळी प्रशस्त आणि परवडण्याजोग्या घरासाठी नेरळ -कर्जतच्या पर्यायाचा विचार करू लागले आहेत.

नेरळ म्हटले की ,लोकांना माथेरानकडे जाण्यासाठीचे टॉय ट्रेनचे जंक्शन ठिकाण इतकीच माहिती असते. परंतु आज नेरळ-कर्जत पट्य़ाचा निरनिराळ्या मार्गाने विकास होऊ लागला आहे. विकास योजना, सरकारी कार्यालये, दळणवळणाच्या पायाभूत सोयीसुविधा यामुळे रिअल इस्टेट बाजारपेठेतील अनेक नामवंत मंडळी गृहसंकुलांसाठी तसेच व्यावसायिक प्रकल्पांसाठी नेरळ-कर्जत पट्य़ांची निवड करू लागले आहे. गेल्या दहा वर्षांत वसई-विरार प?य़ांचा ज्या गतीने विकास झाला, तसाच किंबहुना त्यापेक्षा थोडय़ा अधिक वेगाने नेरळ-कर्जत पट्टा  विकसित होऊ पाहात आहे. याशिवाय उत्तम पर्याय, प्रशस्त जागा त्याचबरोबर आरामदायी सेवासुविधा आणि ते देखील परवडण्याजोग्या किमतीत या सर्व गोष्टींमुळे इथे घरे घेण्यासाठी लोक उत्सुक आहेत.

याअगोदर येथील भौगोलिक घटकांचा योग्य तऱ्हेने विकास न झाल्यामुळे रेल्वे हाच मुंबईशी जोडले जाण्याचा एकमेव पर्याय उपलब्ध होता. कर्जतवरून मुंबईला जाण्यासाठी थेट रेल्वे उपलब्ध असली, तरीही ऐन गर्दीच्यावेळी या सर्व गाडय़ा तुडुंब गर्दीने भरलेल्या असतात.

परंतु आता मात्र दळणवळणाच्या योग्य साधनांमुळे ही शहरे रेल्वे आणि रस्त्यामाग्रे देखील थेट मुंबईशी जोडली गेली आहेत. त्यातच अलीकडे केंद्र सरकारने मुंबई -मेट्रो फेज – ३ पनवेल – कर्जत प्रकल्पाला मान्यता दिल्यामुळे मुंबईहून पनवेलमाग्रे नेरळ-कर्जत प्रवासाचे अंतर कमी वेळात पार पाडता येणार आहे. तसेच राष्ट्रीय आणि राज्य महामार्गाव्दारे देखील ही शहरे जोडली गेली आहेत. जसे मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे या शहरांच्या जवळ असल्यामुळे मुंबई आणि राज्यातील इतर ठिकाणी जाण्यासाठी देखील थेट बससेवा इथे सहजपणे उपलब्ध असतात.

लवकरच येथे नेरळ-दस्तुरी नाका-माथेरान रोड, चार पदरी बदलापूर-नेरळ-कर्जत रोड या प्रकल्पांची कामे सुरू करण्यात येणार आहेत. सरकारच्या या प्रयत्नांमुळे अनेक नामवंत कंपन्या आपले दळणवळणाचे प्रकल्प येथे सुरू करण्यासाठी पुढे येत आहेत. त्याशिवाय विरार-मुरबाड-कर्जत-खोपोली-अलिबाग या रिंग रोड प्रकल्पाचा भाग म्हणून कर्जत-मुरबाड रस्त्याच्या विकासाचे काम सुरू आहे. तसेच पनवेलपासून माथेरान -नेरळपर्यंत भीमाशंकर डोंगरामाग्रे चाकणपर्यंतच्या रस्त्याचे काम देखील प्रगतिपथावर आहे. यामुळे पनवेलपासून ते नेरळ-कर्जतपर्यंत प्रवासाचा टप्पा कमी वेळात पार करता येणार आहे. एकूणच या सर्व गोष्टींचा विचार करता, लवकरच नेरळ-कर्जत ही घर खरेदीसाठी एक महत्त्वाची बाजारपेठ म्हणून विकसित होईल, यात शंकाच नाही.

दळणवळणाच्या उत्तमोत्तम सुविधांमुळे मुंबई, नवी मुंबई किंवा पनवेलपासून नेरळ-कर्जतपर्यंत पोहोचण्यास अर्धा ते एक तासापर्यंत सहजपणे पोहोचता येणार आहे. त्याचबरोबर या प?य़ात सात एमआयडीसी, आयटी कंपन्या देखील आहेत. त्यामुळे मुंबईप्रमाणेच कॉस्मोपॉलिटीन वातावरण येथे निर्माण होत आहे.

तसेच आधुनिक सुविधांनी सुसज्ज अशा शाळा, इंजिनीअिरग-मेडिकल-फार्मा महाविद्यालये, उच्च शिक्षण देणाऱ्या विविध संस्था, रिटेल दुकाने, आधुनिक सेवा-सुविधांनी सुसज्ज असलेली रुग्णालये येथे विकसित होत आहेत. थोडक्यात काय तर, मुंबईचे राहाणीमान जगण्यासाठी ज्या ज्या सुविधांची आवश्यकता असते, त्या इथे सहजपणे उपलब्ध होत आहेत. त्यामुळेच मुंबइचे राहाणीमान, तेही शांत आणि आल्हाददायक वातावरणात नि आरामदायी सोयींसह यामुळे नेरळ-कर्जत प?य़ात घरे घेण्यासाठी लोकांच्या उडय़ा पडत आहेत.

येथे विस्तीर्ण परिसरात बहुतांश टाउनशिप विकसित होत असल्यामुळे लोकांना मोकळ्या आणि खुल्या वातावरणातील घरे सहजपणे उपलब्ध होत आहे. त्याचबरोबर या टाउनशिपमध्ये नोकरदार मंडळींच्या गरजांबरोबरच लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिक यांच्या वेळेच्या गरजांचा देखील विचार करण्यात आला आहे. त्यामुळे वेळ घालविण्यासाठी त्यांच्यासाठीदेखील करमणुकीची साधने तिथेच निर्माण केलेली आहेत.

शिवाय, विश्वसनीय विकासक, पर्यावरणस्नेही अशा इमारतींची रचना त्याचबरोबर परवडण्याजोग्या किमतीतली घरे यामुळे अनेक मंडळी राहण्यासाठी किंवा गुंतवणुकीसाठी योग्य पर्याय म्हणून नेरळ-कर्जत पर्यायाचा विचार गांभीर्याने करू लागले आहेत.

एकूणच विकासक आणि ग्राहक या दोहोंच्या दृष्टीने नेरळ-कर्जत पर्याय हा किफायतशीर असा पर्याय ठरू पाहात आहे. त्यामुळेच ग्राहकांबरोबर अनेक विकासकदेखील नवनवीन प्रकल्प घेऊन येथे येत आहेत. रिअल इस्टेट बाजारपेठेच्या दृष्टीने निश्चितच सकारात्मक अशी ही बाब आहे.