21 October 2018

News Flash

नव्या-जुन्याचा संगम अंबर हार्मनी

खेडेगावातले जीवन, त्या लोकांचे राहणीमान याचा अनुभव टॉवरमध्ये राहून घरबसल्या घेता येतो.

कधी कधी शहरी वातावरणाचा कंटाळा येऊन सुट्टीत लोक ‘मामाच्या गावाला’ अर्थात पदरचे पैसे खर्च करून जातात. पण हल्ली नवीन तयार झालेल्या ९० फुटी रोडवर असलेल्या सोसायटय़ा स्वत:च्या घरात राहून याचा अनुभव देतात. ठाकुर्ली स्टेशनकडून कल्याणकडे जाणारा ९० फुटी रोड अलीकडेच झाला आहे. रोड दुपदरी असून सध्या तरी खूपच छान अवस्थेत आहे. खूप रुंद असल्यामुळे सतत वाहता असूनही वाहनांची कोंडी होत नाही. त्यामुळेच हॉर्नच्या आवाजाचे प्रदूषण नाही. रस्त्याचे आणखीन एक वैशिष्टय़ म्हणजे रस्त्याच्या एका बाजूला प्रचंड मोठेमोठे टॉवर तर दुसऱ्या बाजूचा फुटपाथ पूर्ण रिकामा.. कारण त्याच्या बाजूला येते रेल्वेलाइन आणि त्यापुढे खाडी. त्यामुळे त्या फुटपाथच्या बाजूला टॉवर यायची शक्यताच नाही.

खेडेगावातले जीवन, त्या लोकांचे राहणीमान याचा अनुभव टॉवरमध्ये राहून घरबसल्या घेता येतो. रस्त्यावरच्या सोसायटय़ांची नावेही विठ्ठल प्लाझा, सवरेदय मंगल, सवरेदय लीला अशी आहेत. यातीलच एक ११ माळ्यांची आमची सोसायटी ‘अंबर हार्मनी’. नुसते गॅलरीत बसले तरी शहराची धावपळ आणि निसर्ग असा दोन्हींचा अनुभव घेता येतो. कारण या टॉवरच्या  मागच्या बाजूस अनेक छोटी छोटी गावे आहेत. आणि तेथे अनेक छोटीमोठी कामे करून शहरात जाऊन रोजगारावर काम करणारी माणसे राहतात, त्यामुळे त्यांचे जीवनही बघता येते.. अंबर हार्मनी आणि सवरेदय मंगल या दोन्ही सोसायटय़ांमध्ये पावसाळ्यात पाणी साठून असंख्य तळी तयार होतात. त्यात फुलणारी पांढरी-जांभळी कमळे नेत्रांना भुलवितात. नवरात्रात कमळाचे महत्त्व खूप आणि तळ्यात कमळेही असंख्य, जवळजवळ ४०० ते ५०० कमळे रोज लोक देवीसाठी तोडून नेतात. कमळे तोडून ती विकणे हा या लेकांचा धंदा असतो. कमळाच्या मागच्या भागात भातशेती. घराच्या गॅलरीत बसून नांगरीपासून कापणीपर्यंतची कामे घरातल्या खुर्चीत बसून बघायला मिळतात. बिनाखर्चाचे गावातल्या मुलांचे खेळ बघायला मिळतात. पक्ष्यांच्या किलबिलीने दिवस उगवतो. अनेक रंगीबेरंगी पक्षी माणसांप्रमाणेच पोटापाण्यासाठी बाहेर पडतात. दूध काढून म्हशींना चरायला नेले जाते. सूर्यदेव आपल्या आगमनाने उजेड घेऊन आल्याची वर्दी देतो. भाजीवाले टेंपोवरून, सायकलवरून रिक्षातून भाजीपाला घेऊन शहराकडे जातात. दुपारी मुले मासे पकडायला येतात.

एकीकडे असे दृश्य तर दुसरीकडे दुसऱ्या फुटपाथच्या भिंतीवर नवतरुणांचा अड्डा. प्रेमिकांची चौपाटी म्हटले तरी चुकीचे ठरणार नाही. सकाळपासून रात्री अकरा-बारा वाजेपर्यंत तेथे तरुणाईचा वावर असतो. कधी घोळक्याने कधी जोडीने (अर्थात एक मुलगा, एक मुलगी) तरुणाई येत असते. कधी तासन्तास गप्पा, कधी सेल्फी, तर कधी वादविवादसुद्धा! पहाटे चार वाजल्यापासून लोक मॉर्निग वॉकसाठी जात असतात. कोणी एखादा स्केटिंग करतो, कोण टायमर लावून धावण्याची प्रॅक्टिस करतो. कधी एखादा सायकलवाल्यांचा ग्रुप जातो तर कोणी धावण्याची शर्यत लावतो. लहान मुलांच्या आया मुलांना घेऊन स्कूल बसची वाट पाहात असतात. तर दूध विकणारे टेम्पोतून दुधाचे ट्रे काढण्यात मग्न असतात. रेल्वे गाठणारे मात्र पाठीवर डब्याची पिशवी घेऊन पायी जात असतात. कधी उशीर झाला तर रिक्षाची वाट बघतात. नाहीतर आहेच दोन पायांची गाडी, कारण रोज रिक्षा परवडणारी नसते. कधी एखादा बाइकवरून जाणारा पायी जाणाऱ्याला लिफ्ट देतो तेहा माणुसकी शिल्लक असल्याचा प्रत्यय येतो. संध्याकाळी सूर्याचा लाल गोळा निरोप घेऊन अस्ताला जातो. तो सूर्य, ते दृश्यही अप्रतिमच, घरातूनच दिसणारे!

रात्रीचे दृश्य आणखी वेगळे. चारी ट्रॅकवरून लांबच लांब जाणाऱ्या गाडय़ा, डोंबिवली, ठाकुर्लीला विळखा घातलेल्या टॉवरमधले लाइट, खाडीला आलेली भरती, मधले बेट, खाडीतले दिवे हे सारे दृश्य अप्रतिम दिसते. विमानाने उड्डाण केल्याबरोबर जसे दृश्य दिसते तसे पाहात राहावे असे दृश्य. त्यात रात्रीची आकाशातून उडणारी विमाने काजव्यासारखी चमकतात. तर टॉवरच्या  उंचावरून उडणारे शोभेचे दिवे उल्कापाताची आठवण करून देतात. विनागोंगाटाचे, विनागर्दीचे असे हे ठिकाण. येथे जवळ कसल्याही सोयी नाहीत, बँका नाहीत, डॉक्टर नाहीत, मार्केट नाही तरीही लोक गुण्यागोविंदाने राहतात.

एक विचार मनात येतो की या तळ्यांचे सुशोभीकरण झाले किंवा दुसऱ्या बाजूच्या रेल्वेलाइनच्या बाजूने डोंबिवलीसारखी बाग झाली तर एक प्रेक्षणीय ठिकाण होईल.

First Published on December 23, 2017 12:31 am

Web Title: amber harmony kalyan