21 April 2019

News Flash

घर सजवताना : रंग आणि घराची एकरूपता

पाण्यात कालवून लावायच्या रंगांप्रमाणेच लस्टर, ऑइल पेंट हे प्रकार देखील लोकप्रिय आहेत.

गौरी प्रधान

प्रत्येक कुटुंबात एक निर्णयक्षम व्यक्ती असते. नेहमीच निरनिराळ्या घरांचे इंटिरियर करताना मला या गोष्टीचा प्रत्यय आलेला आहे. बहुतेक डिझाइन्सवर ती व्यक्ती शिक्कामोर्तब करते आणि बाकीचे कुटुंबातील सदस्य त्याला माना डोलावतात. पण एक वेळ मात्र अशी येते, जेव्हा प्रत्येक सदस्याला स्वत:चे मत हिरिरीने मांडायचे असते. ती वेळ म्हणजे घरासाठी रंग पसंत करण्याची. इतर वेळी फार मते व्यक्त न करणारे सदस्यदेखील या प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवतात.

रंग असतातच असे, कधी मन प्रसन्न करणारे तर कधी उदास मनाला अलगद फुंकर घालून औदासीन्यातून अलगद बाहेर काढणारे. प्रत्येक व्यक्तीचा स्वत:चा असा एक रंग असतो. कोणाला निळाशार समुद्रासारखा शांत गंभीर रंग आवडतो तर कोणाला अवखळ प्रेमाचा गुलाबी. थोडक्यात, हे रंग आपल्या व्यक्तिमत्त्वाचंच प्रतिनिधित्व करत असतात.

असे हे रंग जेव्हा घराच्या भिंतींना सजवतात तेव्हा ते आपलं घर आणि आपल्याला खऱ्या अर्थाने एकरूप करतात. पण हे सगळे तेव्हाच घडते जेव्हा रंग लावण्याची तांत्रिक बाजू अचूक असते.

आले ना मी बरोबर मुद्दय़ावर! आता कल्पना आलीच असेल तुम्हाला, आजच्या आपल्या विषयाची. माझ्या मते शॉर्टकट इंटिरियर म्हणजे घराचा रंग बदलणे. यात घरातील फर्निचर किंवा इतर कोणतीही वस्तू न बदलता घरात नवेपणाची अनुभूती येते. रंग बदलल्याने घरात प्रसन्नता तर येतेच पण त्या सोबतच घराची स्वछता होते आणि रंगात असणाऱ्या रसायनांमुळे घरातील किडा मुंगीदेखील नाहीशी होते. रंगांचे मुख्यत्वे दोन भाग पडतात. पाण्यात कालवून लावायचे रंग आणि दुसरे तलरंग. यात कालवण्यासाठी पाण्याऐवजी टर्पेटाइनचा वापर होतो. रंगांच्या प्रकारांमध्ये डिस्टम्पर, अ‍ॅक्रिलिक इमल्शन (प्लास्टिक पेंट), लस्टर, ऑइल पेंट प्रकार बाजारात प्रसिद्ध आहेत.

यातील डिस्टम्पर हा प्रकार फारच हलक्या दर्जाचा. थोडक्यात सांगायचे तर, आपण ज्याला व्हाइट वॉश म्हणतो तो हा. चुन्यापासून बनलेल्या या पदार्थात रंगांचे काही थेंब टाकले की झाला डिस्टम्पर तयार.

सध्या बाजारात उपलब्ध असणाऱ्या रंगांपैकी लोकांच्या सर्वात जास्त पसंतीला उतरणारा रंग म्हणजे प्लास्टिक पेंट. याची काही वैशिष्टय़े अशी की,हा पाण्यात कालवून लावता येतो. पटकन सुकत असल्याने दुसरा हातदेखील लवकर मारता येतो, जेणे करून काम लवकर आटोपते. पाण्यात कालवून लावला जात असल्याने रसायनांचा वापर कमी म्हणजेच आरोग्याला अपाय नाही. याचा सर्वात महत्त्वाचा गुणधर्म म्हणजे काही डाग पडल्यास पटकन ओल्या कपडय़ाने पुसता येतो, अर्थात स्वच्छ ठेवणे सोपे. अनेकविध रंगांमध्ये उपलब्ध असणारे हे रंग भिंतींना एकप्रकारची मऊ, मुलायम आणि सुखद चमक देतात. अनेक नामांकित कंपन्यांचे निरनिराळ्या नावांनी उत्तमोत्तम दर्जाचे प्लास्टिक पेंट बाजारात उपलब्ध आहेत. बठकीची खोली, बेडरूम इ. ठिकाणी प्लास्टिक पेंट योग्य ठरतात.

पाण्यात कालवून लावायच्या रंगांप्रमाणेच लस्टर, ऑइल पेंट हे प्रकार देखील लोकप्रिय आहेत. ज्यांना भिंतींना थोडी अधिक चमक आवडते अशांसाठी लस्टर एक चांगला पर्याय. या ऑइल बेस रंगांना इनॅमल पेंट असेही म्हटले जाते. या रंगांची वैशिष्टय़े म्हणजे हे रंग टिकाऊ असतात, भिंतींवर एक प्रकारे टणक आवरण तयार करतात. प्लास्टिक पेंटशी याची तुलना केली असता आपल्या लक्षात येते की हे रंग सुकण्यासाठी बराच वेळ घेतात, यामुळे एक हात मारून झाल्यावर किमान ८ ते १० तास दुसरा हात लावण्यासाठी थांबावे लागते. याचमुळे रंग लावण्याचा कालावधी वाढतो. रसायनांचे प्रमाण अधिक असल्याने बराच काळ वास दरवळत राहतो. काही वेळा हा वास विषारीही असू शकतो. रसायनांच्या वापरामुळेच हे रंग अग्निपोषकदेखील असतात. हे रंग लावत असताना घेण्याची महत्त्वाची काळजी म्हणजे भिंतींना कुठेही ओल नसावी. ओल असणाऱ्या भिंतींवर हे रंग नीट लागू शकत नाहीत. आताशा काही नामांकित कंपन्यांचे पाण्यात कालवून लावता येतील असे देखील लस्टर पेंट मिळतात त्यामुळे घाबरून जाण्याचे कारण नाही.

ही तर झाली रंग आणि त्यातील घटकांची माहिती. परंतु रंग लावण्याची देखील एक विशिष्ट पद्धत असते. त्याबाबतही आपल्याला थोडी माहिती असलेली बरी. भिंतीवर रंग लावण्यास सुरुवात करण्यापूर्वी भिंत सॅण्ड पेपरने घासून स्वछ करून घ्यावी. त्यावर धूलिकण नसावेत. त्यावर ज्या कंपनीचा पेंट लावायचा आहे त्यांनी सुचवल्या प्रमाणे प्रायमर किंवा बेस कोट लावून घ्यावा. त्यावर पुट्टी भरून घ्यावी म्हणजे भिंतीवर कुठे लहानसहन खड्डे, भोके अथवा भेगा असल्यास त्या भरल्या जातात व भिंतीचा पृष्ठभाग गुळगुळीत एकसंध होतो. हे सर्व काम हाताने होत असल्याने यातही कुठे चढउतार, वरखाली होऊ शकते, म्हणूनच मग ती पुट्टी एकसमान पातळीत आणण्यासाठी पुन्हा एकदा सॅण्ड पेपरने घासून मग त्यावर पुन्हा एक हात प्रायमर किंवा बेस कोट लावून घ्यावा. या प्रायमर किंवा बेस कोट मुळे रंग भिंतीवर चिटकायला मदत मिळते म्हणून तो फार महत्त्वाचा. आता वेळ येते प्रत्यक्ष रंग लावण्याची. मग शेड कार्ड मध्ये दिलेल्या रंगांपैकी आपल्या आवडीची छटा निवडून योग्य अंतराने तिचे दोन किंवा तीन थर भिंतींवर लावून घ्यावे.

जसे इंटेरिअरचे इतर काम करून घेताना उत्तम कारागिरांना पर्याय नाही तसेच रंगकाम करून घेतानाही कारागीर महत्त्वाचे. रंग लावताना ब्रश तसेच रोलरचा वापर केला जातो. हल्ली बरेचदा थेट रोलरनेदेखील रंग लावला जातो. थोडं आधुनिक पद्धतीत जायचं तर या क्षेत्रातील काही कंपन्या हल्ली मशिन्सचा वापर करूनही अगदी झटपट रंगकाम करून देतात. एक नवा अनुभव घेण्याच्या दृष्टिकोनातून याही पर्यायाचा विचार करायला हरकत नाही.

(इंटिरियर डिझायनर)

ginteriors01@gmail.com

First Published on October 6, 2018 12:30 am

Web Title: analysis of color homogeneity