vastu4

  • माझ्या वडिलांची गिरगावमध्ये ५० वर्षांपूर्वीची खानावळ होती, ती जागा बिल्डरने रिडेव्हलपमेंटसाठी घेतली. २०१३ च्या ऑक्टोबरमध्ये आम्हाला ‘पझेशन लेटर आणि अ‍ॅलॉटमेंट लेटर’ दिले. बिल्डिंग ३० मजल्यांची आहे आणि आता ९/१० मजले बांधून झाले आहेत. आम्ही बिल्डरकडे ‘पार्ट ऑक्युपेशन सर्टिफिकेट’ची मागणी केली, पण ते मिळाले नाही. सदर खानावळ सुरू करण्यासाठी म्युनिसिपालटीचे ‘इटिंग हाऊस लायसन्स’ मिळविणे आवश्यक आहे व ते मिळविण्यासाठी ‘पार्ट ओ. सी.’ देणे गरजेचे आहे. हे पार्ट ओ. सी. मिळवून कायदेशीर पद्धतीने खानावळ सुरू करण्यासाठी आपले मार्गदर्शन मिळावे.

-शमा नरवणकर, मुंबई.

*आपल्याला जर ‘पार्ट ओ. सी.’च आवश्यक असेल, तर ते आपल्याला आपल्या विकासकाकडूनच मिळविणे आवश्यक आहे. त्यासाठी आपण विकासकाकडेच संपर्क साधावा. त्याने जर याबाबतीत चालढकल केली तर त्याला ‘पार्ट ओ. सी.’ का मिळत नाही, याबाबत महानगरपालिकेच्या संबंधित वॉर्ड ऑफिसशी संपर्क साधावा. आमच्या मते, आता हॉटेल लायसन्ससंबंधीचे नियम शिथिल केलेले आहेत. त्यामुळे आपले पूर्वी या ठिकाणी खानावळवजा हॉटेल होते, याचा पुरावा घेऊन संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा. आवश्यक तर ‘पार्ट ओ. सी.’ मिळाल्यावर लगेच आपणाकडे सादर करीन अशा आशयाचे हमीपत्र सादर करण्याची तयारी दर्शवावी व मला व्यवसाय सुरू करण्याची परवानगी मागावी. आमच्या मते आपले हे काम होण्यास हरकत नाही.

 

  • आमचा सोसायटीमधील फ्लॅट माझे वडील व मी असा संयुक्त नावे आहे. पहिले नाव वडिलांचे आहे. माझ्या वडिलांचा मृत्यू झाला त्यानंतर आईचेसुद्धा निधन झाले आहे. मला एक भाऊ व एक विवाहित बहीण आहे, सदर फ्लॅट वडिलांचे नाव काढून माझ्या नावे नोंद कसा करावा, या संदर्भात मार्गदर्शन मिळावे. याप्रकरणी माझा भाऊ व बहीण यांची काही हरकत नाही. तरी याबाबत सल्ला मिळावा.

– राजेंद्र दळवी

*आपल्या प्रश्नाच्या अनुषंगाने आम्ही आपणास कळवू इच्छितो की, आपण संस्थेकडे सदर सदनिका व त्या अनुषंगाने दिलेले भाग (शेअर्स) आपल्या नावे हस्तांतरित करण्यासाठी अर्ज करावा. या अर्जासोबत आपल्या आई-वडिलांचे मृत्यू दाखले, आपल्या बहीण-भावाचे, ‘ना-हरकत’ दर्शविणारी ‘नोटरी’ समक्ष स्वाक्षांकित केलेली प्रतिज्ञापत्रे व हस्तांतरणासाठी आवश्यक असलेले विविध नमुन्यांतील फॉर्म भरू यावेत, तसेच हस्तांतरणासाठी मूळ भाग प्रमाणपत्र (शेअर सर्टिफिकेट) देखील संस्थेकडे सादर करावे. आमच्या मते या कागदपत्रांवर सदर भाग प्रमाणपत्र आपल्या नावावर होण्यास काही अडचण येईल असे वाटत नाही. मात्र गृहनिर्माण संस्थेने आपल्या बहीण आणि भाऊ यांचे नोंदणीकृत हक्क सोडपत्र सादर करण्याचा आग्रह धरला तर मात्र आपणाला तशा प्रकारचे ‘हक्क सोडपत्र’ सादर करावे लागेल.

ghaisas2009@gmail.com