20 February 2019

News Flash

दुर्गविधानम् : दुर्ग स्थापत्य एक समृद्ध परंपरा

प्राचीन भारताचा जर विचार केला तर सिंधुसंस्कृती जेव्हा जगाच्या पटलावर हालचाल करीत होती

प्रतिनिधिक छायाचित्र

‘प्राचीन भारत’ हे शब्द उच्चारताक्षणी घनदाट अशा अरण्यांचा, विक्राळ अन् उत्तुंग पर्वतराजींचा, फेसाळत फुंफाटत धावणाऱ्या नद्यांचा, अतिप्रगत संस्कृतींचा, वेदांचा, रामायण, महाभारतादी पुराणांचा, स्मृतींचा अन् स्मृतिकारांचा, उपनिषदांचा, गूढगहन तत्त्वज्ञानाचा, असा विलक्षण भूभाग नजरेसमोर उभा ठाकतो.

अनेक सहस्रकांच्या विस्तीर्ण अशा कालपटावर नाना साम्राज्ये निर्माण झाली, नांदली अन् लयाला गेली. त्यांचे अस्तित्व जरी पुसले गेले, तरी इतिहासाच्या पटावरची त्यांची नोंद अक्षय राहिली. ही साम्राज्ये रचण्यासाठी अन् राखण्यासाठी त्यांनी केलेली ती अविश्रांत धडपड, त्यासाठी त्यांनी केलेला, त्यांच्या दृष्टीने योग्य असा विचार, निसर्गाचा अन् मनुष्याच्या शक्तिबुद्धीचा त्यांनी केलेला उपयोग.. हा साराच इतिहास अतिशय रोचक आहे. आजच्या घटकेला त्यांच्या त्या जिद्दीची, धडपडीची, अखंड अशा ध्यासाची नावनिशाणीही काळाच्या ओघात उरली नसली, तरीसुद्धा त्या ध्यासापायी, जिद्दीपायी त्यांनी जे स्थापत्य रचले ते आता हळूहळू पृथ्वीच्या उदरातून बाहेर येते आहे.

सिंधुसंस्कृतीच्या काळापासून भारतातील मानवी वसाहतींचे पुरातत्त्वीय पुरावे उपलब्ध झाले आहेत. सिंधू आणि तिच्या उपनद्यांच्या सुपीक खोऱ्यात वसलेल्या या संस्कृतीने केलेल्या स्थापत्यविषयक प्रगतीचे अचंबित करणारे पुरातत्त्वीय अवशेष आज पुरातत्त्ववेत्त्यांनी उत्खनित करून तुमच्या-आमच्यासमोर ठेवले आहेत. सिंधुसंस्कृतीच्या उदयापासून ते मराठय़ांच्या साम्राज्याच्या लयापर्यंतच्या विस्तीर्ण कालपटावरील दुर्गस्थापत्याच्या प्रगतीचा आढावा घेणे हा या लेखमालेचा उद्देश आहे. कारण भारतातील दुर्गाचा हा इतिहास एवढा देदीप्यमान आहे की, अभिमानाने म्हणावेसे वाटते, जगातल्या इतर भागांतील मानवी जीवन जेव्हा शेळ्यामेंढय़ांभोवती गुरेचराईच्या रानात रुंजी घालत होते, तेव्हा आमच्या पूर्वजांनी अतक्र्य अशी भक्कम बांधकामे रचली होती!  हा केवळ अभिनिवेश नव्हे, तर हे एक ऐतिहासिक सत्य आहे!

प्राचीन भारताचा जर विचार केला तर सिंधुसंस्कृती जेव्हा जगाच्या पटलावर हालचाल करीत होती, किंबहुना या संस्कृतीने आपले हातपाय हलवायला सुरुवात केली होती, तेव्हा भारतीय दुर्गशास्त्र अतिशय प्रगत अशा अवस्थेत होते. जागोजागी झालेल्या पुरातत्त्वीय उत्खननांनी यास दुजोरा मिळाला आहे. सिंधुसंस्कृतीचा कालखंड भारतीय दुर्गशास्त्रांच्या ज्ञात इतिहासाचा प्रारंभ आहे असे खात्रीलायकपणे म्हणता येते, कारण या कालखंडातील दुर्गाचे उत्खननित अवशेष पुराव्यांच्या रूपात समोर ठेवता येतात. ख्रिस्तपूर्व ३५०० ते १८०० या काळात नांदलेली हडप्पा संस्कृती ही जगाच्या प्राचीन इतिहासातली एक सर्वोत्कृष्ट संस्कृती होती असे निर्विवादपणे म्हणता येते. याचे महत्त्व अशासाठी की, हिंदुस्थानातील लष्करी व नागरी अशा दोन्ही प्रकारच्या स्थापत्यशास्त्राची अतिशय प्राचीन अशी सुरुवात या ठिकाणी सापडणाऱ्या अवशेषांच्या रूपात आपल्याला शोधता येते. स्थापत्यशास्त्राच्या काटेकोर निकषांवर उभारलेल्या वास्तूंचे अवशेष, ही संस्कृती जेथे जेथे नांदली तेथे तेथे सापडलेले आहेत.

नंतरच्या कालखंडातील पिढय़ांनी हाच कित्ता पुढे गिरवत, त्यास स्वत:च्या बुद्धिमत्तेची व स्थापत्यकौशल्याची जोड देत अनेक दुर्ग निर्माण केले गेले. या साऱ्या दुर्गाची मूळ संरचना तशीच होती. मात्र स्थानिक व क्षेत्रीय वैशिष्टय़ांचा विचार करून त्यात किरकोळ फेरबदल केले गेले. वैदिक वाड्.मयामध्ये यासंबंधीची अवतरणे जागोजागी सापडतात. शिल्पे, चित्रकला, वास्तुशास्त्र, नाणी, शिलालेख अशा नाना साधनांमधून हा इतिहास उलगडता येतो. रामायण व महाभारतासारख्या पुराणांच्या आधारे तत्कालीन समाजाची मांडणी, लोकजीवन, आदींवर प्रकाश टाकता येतो. लष्करी बांधकामे, त्यामागच्या रूढ कल्पना, त्यांच्याबद्दलची त्या काळातील समज व उपयोग यांचा मागोवाही आपल्याला अतिशय सहजपणे घेता येतो.

बुद्धकाळात सुरू असलेल्या राजकीय कुरबुरींचे व अस्थिरतेचे पर्यवसान संरक्षण व आक्रमणांच्या नवनवीन कल्पनांचा उगम व संवर्धन होण्यात झाले. या काळात पाश्चिमात्य राष्ट्रांशी सुरू झालेल्या व्यापाराच्या अनुषंगाने धनसंपत्तीच्या थैल्यांसोबत सांस्कृतिक, राजकीय व लष्करी कल्पनांचे अन् तत्त्वांचे पेटारेही या भूमीत पावते झाले. दुर्गाच्या स्थापत्यशास्त्रावर साहजिकच याचा कळत-नकळत प्रभाव पडला.

शिल्पशास्त्र या विषयावर आजवर अनेक ग्रंथांची निर्मिती झाली. गुप्त साम्राज्याचा कालखंड हे भारतीय इतिहासातले सुवर्णयुग मानले जाते. या कालखंडात विविध शास्त्रीय विषयांवरील ग्रंथांपासून ते इतिहास, पुराणे वा महाकाव्ये अशा विषयांवरील उत्तमोत्तम ग्रंथांची निर्मिती झाली. तोवर जे मौखिक होते ते बहुधा सारेच या कालखंडात शब्दबद्ध झाले. या साऱ्याच ग्रंथांमध्ये देवतामंदिरे वा प्रासाद, राजप्रासाद, दुर्ग, राहण्याची सर्वसामान्य घरे, देवतामूर्ती, मूर्तीकला, चित्रकला अशांसारख्या विषयांचा शास्त्रीय ऊहापोह केलेला दिसतो. मयमत, शिल्पप्रकाश, विश्वकर्माप्रकाश, काश्यपशिल्प, मानसार, शिल्परत्नाकर, समरांगणसूत्रधार, शिल्परत्न, सूत्रधार मंडनाचे प्रासादमंडन, राजवल्लभ, रूपावतार हे ग्रंथ तसेच विष्णूधर्मोत्तरपुराण यांसारख्या शिल्पशास्त्रावरील ग्रंथांमध्ये या शिल्पशास्त्र अन् कधी कधी चित्रकला या विषयाचे केवळ विषय म्हणून विवरण केलेले नसून, ऐहिक व आध्यात्मिक अशा दोन्ही पातळ्यांवर हा विषय सारख्याच गांभीर्याने हाताळलेला दिसून येतो.

विश्वकर्मा हे या साऱ्याच ग्रंथरचयित्यांचे दैवत. त्याच्या स्तुतीपासूनच या अवघ्या ग्रंथांची सुरुवात होते. शिल्पप्रकाशात म्हटले आहे :

ऐरावतसमारूढम नानामणीविभूषितं

चतु:षष्टीकलाविद्यनिपुणम वदनोज्ज्वलम

पीतवस्त्रपरीधानं केयूरहारमंडितं

चतुर्भुजधरं देवं प्रशांतवदनं महत

भुजद्वये सुगर्भा च अपरे मानधारकं

वन्दे विष्णुं महातेजो विश्वकर्मन नमोस्तु ते

ऐरावतावर आरूढ झालेला, रत्नभूषणांनी मांडीत असलेला, चौसष्ट कला व विद्यांमध्ये पारंगत असलेला, दीप्तिमान मुख असलेलं, पितांबर नेसलेला, केयूर व मालांनी मंडित असलेला, चतुर्भुज, शांतवदन असा तो महान देव, खालील दोन हातात छिन्नी व हातोडी आणि वरील दोन हातांत मोजणीचा गज व दोरी धारण केलेल्या हे महातेजस्वी विष्णूरूप विश्वकम्र्या तुला नमस्कार असो!

शिल्पभेदांविषयी बोलताना ग्रंथकर्ता म्हणतो:

शिल्पविद्या तु महती तन्मध्ये पंचधोत्तमा

दारू पाषाण लौहंच स्वर्णम लेख्या तथैव च

पोतकर्म गृहाधारम व्यावहारिकदारुणी

प्रासादे मंडपे दुर्गे पुरे पाषाणमेव च

प्रासादरक्षणे युद्धे लौहं लांगलकर्मणि

शिल्प ही महत्त्वाची विद्या असून त्याअंतर्गत असलेल्या पाच विद्या सर्वोत्तम आहेत. त्या म्हणजे लाकूडकाम, दगडकाम, लोहारकाम, सुवर्णकारी आणि चित्रकारी. जहाजे बांधणे वा घराच्या आधारासाठी लाकडी सांगाडा उभारणे यासाठी लाकूडकामाशी संबंधित तर प्रासाद, दुर्ग, तटबंदीयुक्त शहरे बांधणे यासाठी दगडाशी संबंधित विद्या उपयोगी पडते. युद्धासाठी व शेतीसाठी नांगर तयार करण्यासाठी लोहारकाम उपयोगी असते. याप्रमाणे हा ग्रंथकर्ता सुवर्णकर्म व चित्रकारी यांचेही उपयोग सांगतो आणि मगच प्रासाद शिल्पांची माहिती सांगणाऱ्या त्याच्या ग्रंथाची सुरुवात करतो.

यज्ञाकरिता निश्चित करायच्या स्थलाकरिता निश्चित निकष असत. यज्ञस्थळ उंचावर हवे. त्याचा आकार चौरस असावा. जागेचा उतार पूर्वेकडे असावा, कारण ती देवांची दिशा आहे. किंवा ती जमीन उत्तरेकडे उतरती असावी, कारण ती मानवाची दिशा आहे. दक्षिणेकडे उतरती नसावी, कारण ती पितरांची दिशा आहे. बहुधा हीच कारणपरंपरा नंतरच्या कालखंडात शास्त्रांनी ग्राह्य़ धरली असावी. भारतीय वास्तुशास्त्रज्ञ एखादे गाव वसविण्यापूर्वी अथवा घर बांधण्यापूर्वी तेथली जमीन योग्य व अयोग्य कशी ते ठरवीत असत. याबद्दलची माहिती शिल्पशास्त्राच्या बहुधा साऱ्याच ग्रंथांमध्ये उपलब्ध आहे. या ग्रंथांमध्ये भूपरीक्षा या नावाचा एखादा अध्याय निश्चितच आढळतो. त्यात बहुधा इतर पद्धतींच्या सोबतीने याही प्रकारचे निर्देश दिलेले आढळतात.

प्रासाद वा दुर्गाच्या बांधकामासाठी जो दगड लागतो त्याविषयी काश्यपशिल्पामध्ये म्हटले आहे की, ‘दगड मुख्यत: दोन जागी मिळतात. डोंगरावर आणि जमिनीत. डोंगरातील खाणीतून काढलेला दगड जमिनीमधून मिळणाऱ्या दगडांपेक्षा उत्तम असतो. जमिनीखालचे दगड बाहेर काढल्यावर त्यांच्यावर ऊन, पाऊस व वारा या नैसर्गिक शक्तींचा परिणाम फार लवकर व जास्त प्रमाणात होतो. तेवढा परिणाम डोंगरातून काढलेल्या दगडांवर होत नाही. काश्यपशिल्पशास्त्राच्या मते, दगडांची ग्राह्यग्राता त्यांच्या रंगांवरून, त्यांच्यात असलेल्या  दोषांवरून, त्यांच्या वयोमानावरून आणि त्याच्या लिंगावरून ठरवतात. बांधकामासाठी वापरण्यात येणारा दगड योग्य की अयोग्य हे पाहण्यासाठीही काही ठोकताळे आणि पद्धती आहेत. कुठले दगड घ्यावेत, कुठले घेऊ  नयेत, कोणत्या रंगाचे घ्यावेत, कोणत्या रंगाचे घेऊ  नयेत, कोणत्या शिळेमधून कोणत्या प्रकारचा आवाज येतो त्यावरून ती शिळा ही बाला आहे, यौवना आहे की वृद्धा आहे हे ठरते व त्यानुसार तिचा उपयोगही ठरतो. जो दगड वापरायचा त्याचा आकार कसा आहे, त्याचा स्पर्श कसा आहे याविषयी या शिल्पशास्त्रांमध्ये सांगोपांग चर्चा केलेली आहे.

बांधकामासाठी मिळणारे लाकूड वृक्षांपासून मिळते व या लाकडाचे गुणधर्म त्या त्या झाडांवर अवलंबून असतात. वृक्षांबद्दलची माहिती भारतीयांना वैदिक व त्याहीअगोदरच्या कालखंडापासून होती. त्या पद्धतीचे उल्लेख वेदांमधून, ब्राह्मणामधून आपल्याला सापडतात. शतपथब्राह्मणात अनेक वृक्षांची नावे दिली आहेत. साऱ्या वृक्षांचे वर्गीकरण त्यांच्या वयानुसार, दोषांनुसार व लिंगानुसार केले जाते. ग्राह्य़ व त्याज्य असेही त्यांचे वर्गीकरण केलेले होते. लाकडाच्या गुणधर्मानुसार त्याचा उपयोग कुठे करायचा ते ठरत असे.

बांधकामासाठी लागणाऱ्या विटा कशा तयार कराव्या किंवा पायासाठी लागणारी माती कशी निवडावी, त्यांचे रंग कोणते, त्यांचा स्पर्श कसा, माती घेण्यासाठी कोणती ठिकाणे त्याज्य आहेत तर कोणत्या ठिकाणांहून ती घ्यावी याविषयीची मानके याविषयी या वास्तुशास्त्रांमध्ये नेटकी चर्चा केलेली आहे. या मातीची परीक्षा कशी करावी, या मातीचे स्थिरीकरण किंवा २३ुं्र’्र२ं३्रल्ल कसे करावे याविषयीची मार्गदर्शक तत्त्वेही या ग्रंथांमध्ये दिलेली आहेत. मातीच्या स्थिरीकरणाविषयीचे उल्लेख तर अगदी वेदसंहितांमध्येही सापडतात. यजुर्वेद संहितेत विटा व मातीची भांडी तयार करण्याची रीत सापडते. शतपथब्राह्मणात मातीच्या मजबुतीसाठी त्यात काय काय मिश्रित करावे यासंबंधी दिग्दर्शन केलेले आढळते. गावांच्या रक्षणासाठी मातीचा तट बांधला जात असे. त्यावेळी या सूचना उपयोगी पडत असाव्यात. हे तट बांधताना मध्ये मातीची भिंत बांधून त्याच्या दोन्ही बाजूंना विटांच्या भिंती बांधल्या जात. अशा तऱ्हेची रचना सिंधुसंस्कृतीतील शहरांमध्ये प्रकर्षांने दिसून येते. हे तट बांधताना लागणारी माती हत्तींच्या पायांखाली तुडवून मळून घेतली जात असे आणि धुम्मसांनी धुमसून मजबूत – ूेस्र्ूं३ – केली जात असे. या मातीचे रासायनिक स्थिरीकरण कसे करावे, त्यासाठी त्यात कोणती द्रव्ये किती प्रमाणात मिसळावीत, ते मिश्रण किती कालपर्यंत स्थिरावू द्यावे यांसारख्या बाबींचा ऊहापोह बहुधा या साऱ्याच ग्रंथामध्ये केलेला आपल्याला दिसून येतो.

इथे हे स्पष्ट करायचे आहे की, शिल्पशास्त्र वा वास्तुशास्त्रांसारखा विषय हा किती तपशिलाने आणि सावधपणे हाताळला जात होता. किती बारकाईने त्यातल्या बारीकसारीक तपशिलावर लक्ष दिले जात होते. हे सारेच अखंड निरीक्षणावर आणि त्यातून येणाऱ्या प्रत्यक्ष अनुभवावर आधारलेले होते. त्यातील चुका सुधारल्या जात होत्या आणि बहुधा नोंदूनही ठेवल्या जात होत्या. त्या तशा करण्यानेच हे ग्रंथ परिपूर्ण होत गेले. आज आपल्यासमोर दिसणारे ग्रंथ हे या अशा मुशीतूनच तावूनसुलाखून आलेले असावेत इतके ते परिपूर्ण आहेत. हे ज्ञान बहुधा वेदपूर्वकाळापासून, त्यात भर पडत पडत चालत आलेले, ते गुप्तकाळात शब्दबद्ध झाले. संस्कृती संपन्न होत गेली. समृद्ध होत गेली.

मात्र केवळ शिल्पशास्त्र व वास्तुशास्त्र यांच्याविषयी येथे बोलायचे नसून, आपल्याला येथे दुर्ग या विषयाशी संबंधित चर्चा करायची आहे. दुर्ग या विषयासंबंधीचे अधिक थेट आणि स्पष्ट उल्लेख आपल्याला मौर्यकाळातील कौटिलीय अर्थशास्त्र नामक ग्रंथात सापडतात. मौर्य साम्राज्याच्या कालखंडात दुर्गशास्त्रात अतिशय मोठय़ा प्रमाणावर उलथापालथ झाली असे या ग्रंथाच्या परिशीलनातून आपल्या दृष्टीस पडते. मनू, बृहस्पती, नारद, विशालाक्ष, उद्धव, इंद्र, कौणपदंत, द्रोण, आंभिय यांच्यासारख्या पूर्वसूरींनी व आचार्यानी दुर्गशास्त्राची जी तत्त्वे व मूलकल्पना त्यांच्या त्यांच्या काळात स्वत:च्या ग्रंथांमधून मांडल्या होत्या, त्या साऱ्यांच्या साऱ्याच अभ्यासयुक्त मतांचा परामर्श घेत व त्यांवर स्वत:चे अचूक मत मांडत मौर्याच्या राजगुरू कौटिल्याने आपला अर्थशास्त्रावरील ग्रंथ- ‘कौटिलीय अर्थशास्त्र’ – सिद्ध केला. राज्यशास्त्र हा जटिल विषय अतिशय नेटकेपणाने उलगडून सांगताना, पंधरा अधिकरणे असलेल्या या ग्रंथातील दोन प्रकरणे त्याने केवळ दुर्ग या विषयाला वाहिली आहेत. यावरून दुर्ग या विषयाचे तत्कालीन महत्त्व सर्वसाधारण वाचकाच्याही ध्यानी यावे.

आधुनिक संशोधन असे सांगते की, इतिहासकाळाच्या उदयाच्याही अगोदरपासून दुर्गबांधणीचे शास्त्र अतिशय प्रगत अवस्थेत होते. दुर्गाच्या जागतिक इतिहासाच्या संबंधांत नमूद केल्याप्रमाणे आशियामायनर, ग्रीस, टायग्रीस, युफ्रेटीस, नाईल या नद्यांच्या खोऱ्यांत आढळणारे अतिप्राचीन दुर्ग याची साक्ष देत आजही उभे आहेत. काळाच्या ओघात या दुर्गशास्त्रालाही अतिशय सफाई प्राप्त झाली, परिपूर्णता आली. वेगवेगळे भूभाग, उपलब्ध साहित्य, संस्कृती व संस्कार यांच्यामुळे त्यांच्या बारूपात जरी काहीसा फरक भासला, तरी त्यांच्या संकल्पनेतली मूलभूत तत्त्वे तशीच राहिली.

इथे एक म्हणावेसे वाटते की, आज उत्खननित अवस्थेत आपल्यासमोर असलेले दुर्गाचे ते अवशेष जर प्रगत म्हणावे अशा स्थितीचे द्योतक आहेत, तर ती प्रगतावस्था प्राप्त होण्यासाठी व काळाच्या कसोटीवर खरी उतरण्यासाठी किती शतके वा किती सहस्रके लागली असतील? याचे उत्तर जमिनीच्या पोटात, कुणा सुदैवी पुरातत्त्ववेत्याची वाट पाहात असेल काय?

डॉ. मिलिंद पराडकर discover.horizon@gmail.com

First Published on January 20, 2018 3:36 am

Web Title: architecture in ancient india