सामुदायिकपणे ईश्वराची प्रार्थना करण्यासाठी तसेच नमाज पडण्यासाठी मशिदीची निर्मिती झाली. मस्जिद या अरबी शब्दापासून मशीद हा शब्द पुढे रूढ झाला. अरबी भाषेत मस्जिदचा अर्थ सजदाम्हणजे परमेश्वराला शरण जाऊन गुडघे टेकून प्रार्थना करण्याची जागा. शहरी, ग्रामीण भागातील प्रमुख मशिदीला जामी मशीद म्हणतात. जगात मक्केच्या मशिदीला अग्रस्थान आहे, तर मदिना मशिदीच्या उभारणीत पैगंबरसाहेबांचा सहभाग असल्याने त्याला प्रेषिताची मशीद म्हणतात.

Science Day is Not just to celebrate but to practice it
विज्ञान दिन साजरा करण्यासाठी नव्हे, आचरणात आणण्यासाठी…
Crime General Image
ऑनलाइन खेळाचं व्यसन लागलं; आयुर्विम्याचे ५० लाख मिळविण्यासाठी मुलाने केला आईचा खून
Munawar Faruqui
मुनव्वर फारुखीची एक झलक पाहण्यासाठी मुंब्र्यात लोकांची गर्दी, पोलिसांचा लाठीचार्ज, अनेकांचे मोबाईलही चोरीला
satyashodhak kamaltai vichare, satyashodhak kamaltai vichare information in marathi,
स्त्रियांच्या विकासाचा ध्यास घेतलेल्या सत्यशोधक कमलताई विचारे

आपल्या देशात सर्व धर्माच्या लोकांचे वास्तव्य असल्याने प्रत्येक धर्माची प्रार्थना- श्रद्धास्थानं आहेत. त्यात हिंदूंची मंदिरे, ख्रिश्चनांची चर्चेस, बौद्धधर्मीयांची पॅगोडा, विहार, स्तुप, ज्यू लोकांचे सिनेगॉग, पारसी धर्मीयांची अग्यारी तर जैनाच्या कलापूर्ण मंदिरांसह लेण्यांचेही दर्शन घडते. या प्रत्येक प्रार्थनास्थळांवर त्या त्या धर्मीयांचे विचार व तत्त्वप्रणाली आणि संस्कृतीसह खास अशा वास्तुशैलीचे विलोभनीय दर्शन घडते. त्यात विश्वव्यापी प्रभाव टाकला तो मुस्लीम धर्मीयांच्या मशीद या भव्य अशा कलापूर्ण वास्तूंनी..

सामुदायिकपणे ईश्वराची प्रार्थना करण्यासाठी आणि नमाज पडण्यासाठी मशिदीची निर्मिती झाली. ‘मस्जिद’ या अरबी शब्दापासून मशीद हा शब्द रूढ झाला. अरबी भाषेत मस्जिदचा अर्थ ‘सजदा’ म्हणजे परमेश्वराला शरण जाऊन गुडघे जमिनीस टेकवून प्रार्थना करण्याची जागा. शहरे आणि ग्रामीण भागातील प्रमुख मशिदीला ‘जामी मशीद’ म्हणून संबोधले जाते. जगातील मशिदीमध्ये मक्का मशिदीला अग्रस्थान असून या ठिकाणी ईश्वराचे निवासस्थान असलेला काबा यांचा अधिवास आहे अशी श्रद्धा आहे. तर मदिना मशिदीच्या पायाची वीट स्वत: पैगंबरांनी रचली असून या मशिदीला प्रेषिताची मशीद म्हणतात. मदिनेनजीक कुबा या स्थानी पैगंबरानी पहिली मशीद बांधली.

मशीद वास्तुरचना- मशिदीची वास्तुरचना चौरस किंवा आयताकृती असते. मशिदीमधील मोकळ्या जागेला हसन म्हणतात. मक्का मशिदीच्या दिशेकडील िभतीला ‘किब्ला’ म्हणतात. त्यावरील कोनाडय़ावर नक्षीकाम असते. तर त्याच्या उजवीकडील बाजूस मुल्ला-मौलवीना प्रवचनासाठी जो चबुतरा बांधलेला असतो त्याला ‘मिंबर’ म्हणतात. यावरही कलाकुसर असतेच. मशिदीमधील मंडपसदृश सभागृहावर इस्लामी कलाकृतीचा आविष्कार असतो. प्रारंभीच्या काही मशीद वास्तुभोवती भलेभक्कम तटबंदी होती. कालांतराने त्यावर कमानी उभारल्या गेल्या. मशिदीची उभारणी उंच चौथऱ्यावर करून त्याला तीन दिशेला तीन प्रवेशद्वारे असतात. भाविकांच्या आगमन-निर्गमनासाठी दगडी पायऱ्यांचे जिने असतात आणि प्रार्थना नमाज पडण्याची वेळ सभोवताली करून देण्यासाठी मशिदीवर उंच मिनाराची उभारणी झाली.

इस्लाममध्ये मूíतपूजा निषिद्ध मानल्याने मशीद वास्तूत छायाचित्रे, मूर्ती नाहीत. मात्र जागोजागी कुराणातील आज्ञा व वचने भिंतीवर चितारण्यात आलेली आहेत. मशिदीतील प्रशस्त चौकाची कल्पना अरबी गृहरचनेच्या संकल्पनेवरून आली असावी असे जाणकारांचे मत आहे.. सत्तापिपासू राज्यकर्त्यांचा नवनवीन प्रदेशावर आक्रमण करताना धर्मप्रसार हा उद्देशही होताच. त्यामुळे नवीन प्रदेशातील मशिदीच्या बांधकामावर स्थानिक कलाकृतीचे प्रतिबिंब त्यावर आढळते.

भारतातील मशिदींचा उगम व विस्तार- भारतात ख्रिस्ती धर्मीयांप्रमाणे इस्लामचा प्रवेशही केरळातून झाला. व्यापारासाठी या दोन्ही धर्मीयांचे दर्यावर्दी व्यापारी सागरीमार्गे केरळ भूमीवर उतरले. परिणामी चर्चबरोबर मशिदींची प्रथम निर्मिती केरळमध्ये होणे स्वाभाविक आहे. भारतातील पहिली मशीद केरळमध्ये उभी राहिली ती म्हणजे चेरामन जामा मशीद. कोचीनजवळील ‘कोहून गाळूर’ या बंदरगावी इ.स. ६२७ मध्ये ही मशीद बांधली गेली. त्यावेळी इस्लामधर्माच्या तत्त्वप्रणालीवर प्रभावित होऊन त्यावेळचा राजा चेरामन याने ही मशीद बांधायला परवानगी दिली. म्हणून त्याच्या नावाने ही मशीद ओळखली जाते.

आज आपण देश-विदेशातील मिनार-घुमटधारी प्रचंड मशिदी पाहतो तशी भव्यता आणि कलात्मकता चेरामन मशिदीवर नाही. एखाद्या पुरातन बाजाची ही एक मजली वास्तू म्हणजे कोकण-कर्नाटकातील उतरत्या छपराच्या घरासारखी दिसते. याचे कारण केरळातील तुफान पर्जन्यवृष्टीमुळे पाण्याचा त्वरित निचरा होण्यासाठी केलेली योजना. तेव्हा चर्च वास्तूंचीही अशीच रचना होती. केरळ भूमीवरील मशिदीत प्रार्थनागृहात पूर्वेकडे मोठय़ा कोनाडय़ात ब्राँझचा दिवा टांगलेला असतो.

इराण (पर्शिया)- अरबस्थानातील आक्रमकांनी स्थानिकांचा विरोध-प्रतिकार न जुमानता आपल्या संस्कृतीशी सुसंगत मिनार घुमटधारी मशिदीची निर्मिती केली. या आक्रमकांना आपले अस्तित्व दाखविण्यासाठी कल्पनेसह कलात्मक वास्तू उभारण्याचा कल होता.

आपल्याकडे मशीद बांधकामात नमाज पडताना भाविकांचे तोंड पश्चिमेकडे म्हणजे मक्केकडे असेल अशी रचना केली गेली. भारतात पुरातन मशिदी सुल्तानशाही व मोगल काळात बांधल्या गेल्या. जौनपूरची अटाल (१३७७- १४०८) पं. बंगालमधील पडुआ येथील अदीना (१३६९) अहमदाबची जामी मशीद (१४२४) दिल्लीची सय्यद मशीद (१५७२-७३) या सर्व मशीद वास्तूंवर त्या त्या प्रांताच्या वास्तुशैलीचे प्रतिबिंब आहे. काही मशिदींसाठी विटा तर काहींसाठी पत्थराचा उपयोग करण्यात आलाय. आग्रा येथील प्रख्यात मोती मशीद (१६४८-५५) म्हणजे मोघल वास्तुशैलीचे अनोखे दर्शन घडते. यावर पर्शियन वास्तुकलेचा प्रभावही आहे. श्रीरंगपट्टण येथील टीपू सुल्तानने बांधलेल्या मशिदीवर अष्टकोनी मिनार, खांब व भक्कम तुळया आहेत.

जामा मस्जिद- दिल्ली- मोगल बादशहा शहाजहान यांनी १६४४-५६ या काळात ही टोलेजंग मशीद बांधली. या भव्य कलापूर्ण मशिदीला साजेसे, शोभून दिसणारे तीन प्रचंड दरवाजे आहेत. या मशिदीच्या चौफेरचे उंच-उत्तुंग असे चार मिनार त्यांच्या बांधकाम वैभवात भर टाकणारे आहेत. मशिदीवर तीन प्रचंड घुमट असून, त्यातील मधला घुमट आकाराने थोडा मोठा आहे. तर मशिदीच्या प्रवेशद्वाराची अंतर्गत भागातील कलाकुसर चित्ताकर्षक आहे.

या मशिदीच्या बांधकामासाठी वाळुयुक्त लाल पत्थर आणि सफेद मार्बलचा प्रामुख्याने उपयोग केला गेला आहे. एकाच वेळी सुमारे २५,००० भाविकांना प्रार्थना-नमाजासाठी सामावून घेण्याची क्षमता या मशिदीच्या प्रांगणात आहे. मशिदीची लांबी ४० मीटर (१३० फूट) तर रुंदी २७ मीटर (८९ फूट) इतकी आहे. यावरून तिच्या बांधकामाच्या व्याप्तीची कल्पना येते. लाहोरच्या बादशाही मशिदीचे बांधकाम या मशिदीशी साधम्र्य दर्शवते. या दोन्ही मशिदीवर इस्लामिक वास्तुशैलीचा प्रभाव  आहे. दिल्ली शहर पर्यटनस्थळ दर्शनामध्ये या वारसावास्तू स्थळांचा समावेश आहेच.

हैदराबादची मक्का मशीद- नबाबाचा रुबाब असलेल्या हैदराबाद या प्राचीन नगरीच्या वैभवात भर घालण्यात जी मक्का मस्जिद आहे त्यालाही इतिहास आहे. ही हैदराबादसह दख्खन प्रदेशातील सर्वात जुनी मशीद असून, तिचे परिक्षेत्र आणि वास्तुआकार भव्य आहे. तसेच युनेस्कोच्या वारसा वास्तूमध्ये तिचा समावेशही आहे. कुतुबशाही साम्राज्याचा ५ वा सम्राट महमद कुली कुतुब शहा यांनी मक्का या पवित्र स्थानाहून आणलेल्या विटेचा अंतर्भाव या मशिदीच्या मध्यवर्ती कमानीमध्ये केलाय. म्हणूनच या मशिदीला मक्का मशीद हे नाव आहे. यातील दर्शनी बांधकामात तीन कमानींसाठी अखंड ग्रेनाईटचा वापर करून सुबकता साधली आहे. या मशिदीच्या संपूर्ण बांधकामासाठी सुमारे ८००० कामगार काम करीत होते. सुल्तान कुली कुतुबशहा याच्या हस्ते या मशिदीचा पायाचा दगड बसवला गेला, तर अखेरचा मुघर सम्राट औरंगजेब याच्या कारकीर्दीत या भव्य वास्तूचे बांधकाम इ.स. १६९४ मध्ये पूर्णत्वास गेले.

एकाच वेळी सुमारे १० हजार भाविकांना नमाज पडण्यासाठी या मशिदीची क्षमता आहे. या मशिदीसाठीही कायमस्वरूपी टिकाऊ असा ग्रेनाइटचा वापर केला आहे. या भव्य वास्तूची लांबी ६७ मीटर तर रुंदी ५४ मीटर असून उंची २३ मीटर आहे. दिल्लीच्या जामा मशिदीप्रमाणेच या मशिदीचा पर्यटकांच्या स्थळदर्शनात समावेश आहेच.

vasturang@expressindia.com