13 December 2018

News Flash

घर असावे घरासारखे..

घरातील कर्ता पुरुष आणि गृहस्वामिनी यांच्यावर घराचं सुख व संपन्नता अवलंबून असते. व

प्रतिनिधिक छायाचित्र

घर म्हणजे एक अत्यावश्यक गरज. घर म्हणजे असे ठिकाण, जिथे रक्ताचं नातं असलेली एकत्र राहणारी माणसं शांततेत आणि सुखात राहतात. हे घर मग मातीचं असो, कुडाचं असो की सिमेंटचं. किंवा लहान असो की मोठं..

कंपाऊंडपासून किंवा दगडविटांच्या भिंतींपासून हे घर बाहेरच्या जगापासून वेगळं असतं. घराच्या उंबरठय़ापासून आत घरातील काही नियम असतात, ते त्या घरातील माणसांनी पाळायचे असतात. घरातील माणसं एकमेकांना प्रेमानं बांधून ठेवतात, ते खरं यशस्वी घर. घरातील प्रश्न ते एकमेकांच्या विचारानं सोडवतात. ‘मी घरी जातो’, असं एखाद्या माणसानं म्हटलं, की तो माणूस स्वत:च्या हक्काच्या, आरामाच्या, प्रेमाच्या ठिकाणी जातो आहे, हे अर्थातच समजून येतं.

घरातील कर्ता पुरुष आणि गृहस्वामिनी यांच्यावर घराचं सुख व संपन्नता अवलंबून असते. वडीलधाऱ्यांकडून मिळणारी चांगली शिकवण ही घराची देणगी असते. शरीरानं सुदृढ व मनाची श्रीमंती येथेच विकसित होऊ  शकते. घर माणसांना लहानपणापासून आपली संस्कृती शिकवते. त्या घरातील भाषा, सण सगळ्यांचे सारखे असतात. घरासाठी त्या घरातील माणसं कष्ट करतात. नोकरी करून घरातील व्यक्तींचे पोट भरण्यासाठी, त्यांच्या सुखसोयींसाठी धडपडतात, आटापिटा करतात. तसंच बाहेरील संकटांपासून रक्षण करतात. ऊन, वारा, पाऊस यांपासून घराचं रक्षण करतात. बाहेरून येणाऱ्या नातलगांना येथे एकदम स्वयंपाकघरापर्यंत प्रवेश असतो.

घरातील माणसांप्रमाणेच घरातील वस्तूही आपुलकीनं जपून सांभाळल्या जातात, त्यांच्याकडेही पुरेसे लक्ष दिलं जातं. घराच्या भिंतींना आवडता रंग दिला जातो. दाराला, खिडक्यांना सुंदर रंगांचे व नक्षीदार पडदे लावले जातात. झुंबरे, भिंतींवरील पेंटिंग्ज, मूर्ती जशी आवड असेल, आणि मुख्य म्हणजे जसे शक्य होईल त्याप्रमाणे घराचं सौंदर्य वृद्धिंगत केलं जातं. या घरात देवघरासाठी जागा असते, जिथे भक्तीचा ओघ वाहत असतो. आपल्या घराबरोबरच त्याला अंगण असेल तर तेथे किंवा नसेल तर बाल्कनी असल्यास फुलझाडे लावून आपली आवड जोपासून घराला आणखी शोभाही आणली जाते व आपल्या स्वप्नातील घर साकारण्याचा प्रयत्न केला जातो.

घर ही दोन अक्षरे, पण आपल्या प्रत्येकाच्याच जीवनात त्याला अत्यंत महत्त्वाचं स्थान असतं. आपलं हसणं, खेळणं, बागडणं, रुसवे, फुगवे, एकमेकांना माफ करणं, काळजी घेणं या लाडक्या घरातच होतं. घर एकमेकांना धरून ठेवतं, त्यामुळे नोकरीसाठी किंवा इतर कामांसाठी परदेशी जाताना घरातील व्यक्तींना हुरहुर लागते व बाहेर गेल्यावर हेच घर परत येण्यासाठी खुणावत असतं. घराबद्दल एक अनामिक ओढच असते. विश्रांतीगृह, हॉलीडे होम, वसतिगृह यांना घराची सर कधीच येत नाही.

केवळ चार भिंती आणि छप्पर म्हणजे घर नव्हे. तिथे राहणारी माणसं, तिथले वातावरण, त्यातून निर्माण होणारे प्रेम, सुख, आनंद म्हणजे घर.. असं सुंदर घर असावं असं प्रत्येकालाच वाटतं. हे घरच नात्यांची वीण घट्ट करतं.

माणसांप्रमाणेच पक्षीही आपलं घरटं बांधून आपल्या पिल्लांसह त्यात जिव्हाळ्यानं राहतात. आपल्या पिल्लांचं रक्षण करतात. पिल्लांना चोचीनं घास भरविण्यासाठी त्यांची धडपड चालू असते. खरंच, कवयित्री विमल लिमये यांनी त्यांच्या कवितेत घराचं हृदयापासून व अर्थपूर्ण वर्णन केलं आहे.

घर असावे घरासारखे नकोत नुसत्या भिंती

इथे असावा प्रेम-जिव्हाळा नकोत नुसती नाती

माधुरी साठे madhurisathe1@yahoo.com

First Published on January 6, 2018 5:48 am

Web Title: article about beautiful homes