21 October 2018

News Flash

वीट वीट रचताना.. : निवाऱ्याची गोष्ट!

इमारत बांधकामाविषयीची नव्याने ओळख करून देणारं सदर..

प्रतिनिधिक छायाचित्र

इमारत बांधकामाविषयीची नव्याने ओळख करून देणारं सदर..
राजकारण आणि क्रिकेट हे आपले सर्वाचे अत्यंत जिव्हाळ्याचे विषय. त्यावर चर्चा करण्यात, वाद घालण्यात आपला कितीही वेळ जाऊ  शकतो. त्यानंतर बहुतेक नंबर येतो स्थापत्य बांधकामाचा. जीर्ण झालेले पूल, धोकादायक इमारती, आधीच अरुंद रस्ते, त्यात खड्डे (आणि हो, फेरीवाले), फुटलेल्या जलवाहिन्या, गळणाऱ्या पाण्याच्या टाक्या, सांडपाणी व्यवस्थेचा कायमचा बोजवारा, धरणांच्या पाटातून वाहणारा भ्रष्टाचार, बांधकामासाठी लागणाऱ्या वाळूचा अनिर्बंध आणि बेकायदेशीर उपसा हे व असे कितीतरी मुद्दे! बिल्डर, ठेकेदार (काही ठिकाणी यांना गुत्तेदार असेही म्हणतात) आणि एकूणच स्थापत्य अभियंत्याविषयी बोलताना अनेकांच्या जिभेला वेगळीच धार येते. छोटय़ा गावापासून ते महानगरापर्यंत स्थापत्यशास्त्रात अनेक स्वयंभू तज्ज्ञ असतात. आपल्या दररोजच्या जीवनाला पदोपदी स्पर्श करणाऱ्या या स्थापत्य बांधकामाकडे तटस्थतेने पाहणे हा या लेखमालेचा प्रयत्न.

स्थापत्य बांधकामात पैशापासून भूकंपापर्यंत आणि पायापासून पुनर्वसनापर्यंत अनेक पैलू विचारात घेतले जातात.

बांधकामाचा विचार करताना ज्ञात असलेल्या रोमन, ग्रीक, इजिप्त, चीन, सिंधू संस्कृतीच्याही मागे जायचे ठरविले तर आपण येऊन पोहोचतो अश्मयुगाच्या आधी अंदाजे ख्रिस्तपूर्व १२००० च्या आसपास. अन्न आणि वस्त्र या मानवाच्या अगदीच मूलभूत गरजा. त्या पूर्ण होईपर्यंत कुठलाच विचार मनात व डोक्यातही येऊच शकत नाही. त्यानंतर सुरू होतो मात्र निवाऱ्याचा शोध. भाजून काढणारे ऊन, सोसाटय़ाचा वारा, हाडे गोठवणारी थंडी, मुसळधार आणि न थांबणारा पाऊस यापासून स्वत:चे रक्षण करण्यासाठी माणसाला आसरा आवश्यक वाटला. अगदी प्राचीन काळात माणूस अथात गुहेत राहत होता. हा शोध योगायोगानेच लागला असेल. आधी झाडाखाली थांबला. मग आत काय आहे पाहूया या कुतूहलाने गुहेत शिरला असेल. एका परीने ते माणूस पृथ्वीवर अवतरण्यापूर्वी असलेल्या, चतुष्पाद व सरपटणाऱ्या प्राण्याच्या अधिवासावर केलेले अतिक्रमणच होते. नैसर्गिकरीत्या तयार झालेल्या गुहा या वाढत्या लोकसंख्येच्या मानवाला कमी पडू लागल्यावर निवाऱ्याचे दुसरे पर्याय गरजेचे झाले. पक्षी किंवा प्राण्याप्रमाणे झाडावर राहणे, दाट झाडीत मधोमध थोडी जागा साफ करून तिथे वस्ती करणे असे प्रकार सहज प्रेरणेने मानवाने केले असतील. त्याचा अर्थात कुठलाही पुरावा नाही.

युरोपमध्ये काही ठिकाणी पुरातत्त्व शास्त्रज्ञांना संशोधनात ख्रिस्तपूर्व १२००० कालीन दगडांची गोल आकारात केलेली मांडणी आढळली आहे. लाकडांचे खांब किंवा प्राण्यांची कातडी वापरून अत्यंत ओबडधोबड स्वरूपात केलेल्या झोपडीचा हा अवशेष असावा असा तर्क त्यातून निघतो. आजच्या अत्यंत आधुनिक आणि पुढारलेल्या बांधकामाचा हा मूळ पुरुष म्हणता येईल. माणूस शिकारीसाठी रानोरानी भटकत असताना ही झोपडी बांधत असावा. मध्यभागी खांब आणि कडेला ताणून बांधलेला पडदा ही तंबूची संकल्पना ज्याने १४००० वर्षांपूर्वी शोधली तो उजेडात न आलेला अत्यंत मोठा वैज्ञानिक असणार इतकी ती मूलभूत कल्पना आहे. आजही सर्कस, तमाशा, सहलीपासून थेट सैनिकांसाठीचे तंबू याच कल्पनेवर उभारले जातात. वर्तमानकाळातील अत्याधुनिक बांधकामातील संरचनेचे गुंतागुंतीचे प्रश्न तंबूच्या भार वाहण्याच्या पद्धतीने (लोड ट्रान्स्फर मेकॅनिझम) सुटण्यास मदत झाली आहे.

शेती करण्याची कला (की क्रांती) माणसाला ख्रि.पू. १०००० पासून अवगत झाली असं समजतात. मध्य पूर्वेत जवळपास गाव म्हणता येईल एवढे गोल आकाराचे बांधकामाचे अनेक सांगाडे (थोलोई) सापडले आहेत. या सांगाडय़ाच्या भिंती पक्क्या मातीच्या आहेत. काही ठिकाणी त्यात झाडांच्या वेलींचा वापर केलेला आढळतो. आज ज्या गजासहित (रिएन्फोस्र्ड) काँक्रीटशिवाय अभियंत्याचे पान हलणार नाही त्याची ही आद्य सुरुवात. या निवाऱ्याचे छत अर्थात काळाच्या ओघात टिकलेले नाही. पण वाळलेले गवत आणि वेलींचा वापर छतासाठी झाला असावा असा अंदाज करता येतो. याही घरांची संरचना तंबू संकल्पनेची होती.

ख्रि.पू. ९००० ते ख्रि.पू. ५००० ज्या काळाला नवीन अश्मयुग संबोधलं जाते त्या काळात माणसाने दगडांची घरे बांधण्यास सुरुवात केली असावी असं मानण्यास जागा आहे. लाकडाचा बऱ्यापैकी वापर या काळात सुरू झाला. अर्थात त्या वेळी उपलब्ध असलेली हत्यारे दगड, प्राण्यांची हाडे, वेलीपासून बनविलेली होती. या हत्यारांचा वापर करून जास्त लांबीचे, एकसमान रुंदीचे ओंडके कापणे, त्यांना हवा तसा आकार देणे याला स्वाभाविक मर्यादा होत्या. त्यामुळे मुबलक झाडे असूनही त्यांचा वापर बांधकामाचे लाकूड म्हणून करण्यास आकारमान व गुणवत्तेच्या निकषावर अनेक अडचणी होत्या. झाडाखाली थांबल्यास ऊन, पाऊस लागत नाही हे लक्षात आल्याने छत म्हणून गवत आणि वेलींचा वापर सुरू झाला. गवताचे छत क्षितिजसमांतर (हॉरिझॉन्टल) ठेवल्यास गवतात पाणी मुरून ते खाली गळते हे माणसाला लवकर लक्षात आले, पण छत किती अंशात तिरपे केल्यास पाणी गवतात मुरण्यापूर्वी वाहून जाते हा नक्कीच महत्त्वाचा शोध होता. बाहेरचं पाणी आत येऊ  नये व सरपटणाऱ्या जीवजंतूपासून सुरक्षा म्हणून बांधकामाला जोत्याची (प्लिंथ) सुरुवात याच काळात झाली. इंडोनेशियात याचे पुरावे सापडले आहेत.

ज्या आकाराचा आणि वजनाचा दगड स्थानिक परिसरात आढळेल तो वापरून कडेच्या भिंती बांधल्या जात. मिळतील तशा वेडय़ावाकडय़ा आकाराच्या दगडांमुळे भिंतींना हवा तसा आकार येत नसे. मग ओबडधोबड दगडाऐवजी एकाच मापाच्या विटा तयार  करून वापरण्यास याच काळात सुरुवात झाली. मातीच्या विटा करून त्या सूर्यप्रकाशात वाळविल्या जात. माती आकुंचन पावल्याने विटांना तडे जाऊ  लागले.(श्रीन्केज क्रॅक) मग त्या मातीत गवत कालवले तर तडे जात नाहीत हे लक्षात आले. विटा भाजण्यास अजून वेळ होता. दगड एकमेकांवर फक्त रचले किंवा बसविले जात. ते एकदुसऱ्यात अडकून पक्के राहतील असे तासून काही ठिकाणी बसविलेले सापडले आहेत. विटा मात्र चिखलाच्या मालमसाल्यात (मॉर्टर) मध्ये बसविल्या जात.

तंबूपासून जवळपास सर्व निवाऱ्यांचे आकार वर्तुळाकार गोल होते. हा आकार आपल्याला निसर्गाने दिलेला. निसर्गातील बहुतेक गोष्टी आकारात गोल किंवा त्रिकोणाशी  जवळ जाणाऱ्या. पण गोल आकारातील जागेचा काटेकोर वापर होऊ  शकत नाही हे माणसाला लक्षात आले. त्यातून शोध लागला चौकोन किंवा आयताचा. त्या आकारात घरे बांधली जाऊ  लागली. इजिप्त आणि सिंधू संस्कृतीत याचे पुरावे आढळतात.

स्थापत्य अभियांत्रिकीतला एक महत्त्वाचा शोध म्हणजे भिंतीत भगदाड पाडणे. दगड किंवा विटांच्या उंच भिंती उभारणे हे म्हटले तर सोपे. त्यात माणसांना आत जायला दरवाजा काढणे किंवा वारा, प्रकाश आत यायला खिडकीसाठी मोकळी जागा ठेवणे कर्मकठीण. समुद्र किनारी वाळूचे किल्ले अथवा गावाकडे दिवाळीत मातीचे किल्ले ज्यांनी बनविले, त्यांना आठवत असेल किल्ल्याला आरपार बोगदा किंवा आत जाता येईल असा दरवाजा करायला किती आटापिटा करावा लागतो. खिंडाराच्या वरील भागातील वाळू, माती सारखी ढासळत राहते. बहुतेक वेळी लाकडाची फळी टाकून त्यावर वरची माती थापावी लागते. ताण (टेन्शन) सहन करू शकेल, अशा साहित्याचा एक थर मधे दिला तर न ढासळता खिंडाराच्या वर बांधता येते हा शोध लागला तो स्थापत्यशास्त्रासाठी ‘युरेका युरेका’चा क्षण होता.

ताण सहन करणे व भार वाहणे (कॉम्प्रेशन) या दोन्हीसाठी माणसाकडे एकच एक दगड होता. एकसंध दगडाचा तुकडा बीम किंवा लिन्टेलसारखा वापरून दरवाजे, खिडक्या ठेवण्यास सुरुवात झाली. भार वाहण्याची (कॉम्प्रेसिव्ह) दगडाची क्षमता जास्त असली तरी त्याच्या ताण सहन करण्यास लांबीची (स्पॅन) मर्यादा होती. दगडाचा वापर ५ ते ६ मी.पर्यंत बीमसारखा केल्याचे आढळले आहे. काही काळाने माणसाला वाटलं, अशाच पद्धतीने वरचा मजला करता आला तर? फक्त तळमजला बांधता येणे ही तंबू व तिरप्या गवत, वेलींच्या छताची मर्यादा होती. दगडाचा कमी रुंदी व उंचीचा, पण जास्त लांबीचा तुकडा (बीम) तोडून हव्या त्या जागेवर उभारणे सोपे होते. पण दगडाचा चौकोनी तुकडा (स्लॅब), मोठय़ा खडकातून कापणे आणि नंतर हव्या त्या जागेवर बसविणे अशक्यप्राय गोष्ट होती. अशी सुरुवात झाली मोठय़ा खडकातून कोरून काढण्याला. टेकडीचा वरचा व खालचा काही भाग कोरून काढला आणि मधला तसाच ठेवला तर दोन वा जास्त मजले करता येतात हा शोध लागला. वेरुळ येथील जगप्रसिद्ध कैलास लेणे याच पद्धतीने तयार करण्यात आले आहे. अर्थात त्याचा बांधकामाचा काळ तुलनेने नवा म्हणजे  इ. स. ७०० च्या आसपास समजला जातो.

भट्टीत भाजलेल्या विटा ख्रि.पू. ३००० च्या आसपास मेसोपोटेमिया (आजचा इराक व कुवेत) वापरात आल्या. इंधन आणि मजुरी या दोन्ही गोष्टी मातीच्या विटांपेक्षा जास्त असल्याने या विटा बऱ्यापैकी महाग होत्या. अर्थात त्यांचा वापर सुरुवातीला जिथे भार जास्त येईल व झीजही मोठय़ा प्रमाणात असेल अशाच बांधकामातील घटकापुरता मर्यादित होता. ख्रि.पू. ५७५ मध्ये बॅबिलॉन येथील (आजच्या बगदादजवळ) राजवाडय़ासाठी  बांधलेल्या ईस्टर गेटच्या कमानीसाठी भाजलेल्या विटा वापरल्या होत्या. या कमानीचे अवशेष आजही शिल्लक आहेत.

मधल्या काळातही बांधकामात पुष्कळ बदल घडणार होते. ते बघूया पुढच्या लेखांत.

डॉ. अभय खानदेशे khandeshe.abhay@gmail.com

First Published on January 13, 2018 5:34 am

Web Title: article about building construction