26 November 2020

News Flash

एकटय़ादुकटय़ा वृद्धांची सुरक्षा

एकाकी वृद्धांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष करणे योग्य ठरणार नाही. ती जबाबदारी कोणाला तरी पार पाडावीच लागेल.

प्रतिनिधिक छायाचित्र

मोहन गद्रे

एकाकी वृद्धांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष करणे योग्य ठरणार नाही. ती जबाबदारी कोणाला तरी पार पाडावीच लागेल. समाजाची जबाबदारी आहेच, पण मूळ जबाबदारी त्यांच्या कुटुंबीयांचीच आहे. कायद्याला देखील तेच अभिप्रेत आहे. हाच मुद्दा लक्षात घेऊन को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या बायलॉजमध्ये सोसायटीत राहणाऱ्या वृद्ध व्यक्तींच्या संरक्षणाची जबाबदारी निश्चित करणारे कलम आणणे शक्य आहे का?

घरात एकटय़ा दुकटय़ा राहणाऱ्या वृद्ध व्यक्तीवर प्राणघातक हल्ले झाल्याच्या बातम्या प्रसार माध्यमाद्वारे समोर येत असतात. त्या गुन्ह्यत कुटुंबातीलच कोणी नातेवाईक किंवा घरातील नोकर कोणीही सामील असू शकते. यथावकाश पोलीस कारवाईत त्याचा छडा लागतोदेखील. पण माणूस गमावलेला असतो किंवा जायबंदी तरी झालेला असतो. एकाकी वृद्धांच्या सुरक्षेसाठी जे काही प्रयत्न सरकार आणि पोलीस यंत्रणेमार्फत केले जात आहेत ते तोकडे पडताना दिसत आहेत. त्याला बरीच कारणे आहेत. उतार वयात तोपर्यंत जीवनात आलेल्या चित्रविचित्र अनुभवामुळे व्यक्ती दैववादी होण्याचे प्रमाण अधिक असते.  काहींची मुले दूर देशी किंवा इतरत्र वास्तव्यास असतात. आमची जागा आम्ही सोडणार नाही, किंवा विकणार नाही. मुलांनी कुठे राहावे ते त्यांचे त्यांनी ठरवावे, मोडकळीस आलेली इमारत असो की अगदी लहान आकाराची राहती जागा असो, आई-वडील ती सोडून मुलाकडे किंवा मुलीकडे राहायला जायला सहसा तयार नसतात. ज्या कुटुंबाचे आम्ही एकेकाळी प्रमुख म्हणून वावरलो, त्याच कुटुंबात दुसरीकडे म्हणजेच मुलाकडे किंवा मुलीकडे आम्ही त्यांचे एक प्रकारचे आश्रित म्हणून का राहावे? वेळ पडलीच तर आम्ही वृद्धाश्रमात जाऊ, पण अशी वेळ खरोखरच पुढे आली तरी फारच कमी वृद्ध वृद्धाश्रमाचा पर्याय स्वीकारताना दिसतात. कारण आजही हा पर्याय समाजाने आदर्श नव्हेच, पण योग्य पर्याय म्हणूनही मनापासून स्वीकारलेला नाही. शिवाय बरेच वृद्धाश्रम वृद्ध बेड रिडन अवस्थेत असेल तर प्रवेश देत नाहीत किंवा दाखल झालेला वृद्ध बेड रिडन अवस्थेत गेला की त्याच्या जवळच्या नातेवाईंकाकडे त्याला सोपवितात. हे भविष्य बऱ्याच वृद्धाना वृद्धाश्रमात जाण्यापासून परावृत्त करत असावे. आणि या सर्वाचा परिपाक म्हणून त्यांच्या नशिबी वृद्धापकाळात एकाकीपण येते. नवरा-बायको दोघेही असतात तोपर्यंत एकमेकांच्या साथीने दिवस जातात, पण दोघांपैकी एकटे राहण्याची वेळ कधी ना कधी तरी भविष्यात येतेच येते. हे एकाकीपण सर्व दृष्टीने फार विचित्र असते. एकाकी वृद्धांची दिवस-रात्र काळजी घेणारे सशुल्क सेवेकरी काही संस्थांमार्फत मिळू शकतात. तशी सोय आता उपलब्ध आहे. असे सेवक नेमणे केव्हाही श्रेयस्कर. कारण त्यांची सर्व प्रकारच्या माहितीची नोंद संस्थेच्या कार्यालयात केलेली असते. पण आर्थिकदृष्टय़ा ते सर्वाना शक्य होईल असे नाही.

विश्वास नावाची चीज सर्व जीवनातूनच हद्दपार होण्याच्या मार्गावर आहे. ‘विश्वास पानिपतमध्ये मेला’ असे अगदी सहजपणे आणि कोरडेपणे म्हणायलाही आता कोणाला काहीही वाटेनासे झाले आहे.

एकाकी वृद्धांची विचारपूस करण्याची कामगिरी स्थानिक पोलिसावर सोपविलेली आहे, त्यांच्यापरीने पोलीस आपली ती जबाबदारी चांगल्या प्रकारे पार पाडत असतात. पण अशा सर्व प्रयत्नांच्या मर्यादादेखील समाजाने समजून घेतल्या पाहिजेत.

लहानशा सोसायटीत अशा वृद्धांची विचारपूस आणि काळजी बऱ्यापैकी घेतली जाते. पण सर्वच मोठय़ा शहरांत आता ज्या प्रकारची अवाढव्य आकाराची संकुले उभी राहत आहेत, म्हणजे अनेक मजल्यांच्या अनेक इमारती.. अशा ठिकाणी वेगवेगळ्या जाती, धर्माची, विविध भाषक हजारो कुटुंबं नव्याने वास्तव्याला येतात. अशा महाप्रकल्पात एकाकी राहणाऱ्या वृद्धांच्या समस्या तर अगदीच वेगळ्या आहेत. अशा वृद्ध व्यक्ती म्हणायला कुटुंबात असतात, पण घरातील तरुण नोकरी धंद्यासाठी बाहेर पडून गेले की दहा-बारा तास एकाकीच जीवन जगत असतात. ते भाडेकरू म्हणून राहत असतील तर मग त्यांच्या अडचणी अजून वाढू शकतात. भाषेच्या अडचणीमुळे त्याना इतरांशी साधा संवाद साधणेही शक्य होत नाही. अनोळखी शहरात ती उतारवयातील माणसे अधिकच गोंधळून जगत असतात. कोणाशी विश्वास ठेवून बोलावे हा त्यांच्या पुढचा यक्ष प्रश्न असतो. एका ठिकाणी थोडे स्थिरस्थावर होईपर्यंत घर अन्यत्र हलविण्याची वेळ येते.

कारण आणि परिस्थिती कशीही आणि कोणत्याही प्रकारची असो, एकाकी वृद्धांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष करणे योग्य ठरणार नाही. ती जबाबदारी कोणाला तरी पार पाडावीच लागेल. समाजाची जबाबदारी आहेच, पण मूळ जबाबदारी त्यांच्या कुटुंबीयांचीच आहे. कायद्याला देखील तेच अभिप्रेत आहे. हाच मुद्दा लक्षात घेऊन को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या बायलॉजमध्ये सोसायटीत राहणाऱ्या वृद्ध व्यक्तींच्या संरक्षणाची जबाबदारी निश्चित करणारे कलम आणणे शक्य आहे का? याचा विचार करावा. ज्याप्रमाणे नवीन इमारतींमध्ये वाहनांच्या पाìकगची व्यवस्था करणे कायद्याने बंधनकारक केले आहे, त्याच प्रमाणे इमारतीत राहणाऱ्या एकाकी वृद्धांची सोय होईल असा काही पर्याय तयार करता येणे शक्य आहे का? या दृष्टीनेही विचार व्हावा.

वृद्धांनी थोडा जरी विचार केला तरी काही समस्या हलक्या होऊ शकतात. नोकरीत असताना नोकरीच्या ठिकाणी तुमचा सहकारी आणि घरी तुमचा शेजारी मग तो कोणत्याही जाती, धर्माचा आणि भाषेचा असो, अडीअडचणीत सर्वात प्रथम तुमच्या मदतीला धावून येतो, नंतर तुमचा नातेवाईक, हा अनुभव लक्षात घेऊन शेजारी आपले संबंध सलोख्याचे राहतील याची काळजी घेतली पाहिजे. पसा कितीही असला तरी त्याची घमेंड म्हातारपणी अजिबात दाखवू नये. एकेकाळी तुम्ही कितीही मोठय़ा पदावर किंवा हुद्दय़ावर असलात तरी आता तो सगळा इतिहास झाला आहे. उगीच आपली शेखी मिरविण्यात अर्थ नसतो. यामुळे लोक तुमच्यापासून दूर जातात.

घरात आपण एकटे असताना दरवाजाला आतून कडी लावून घेणे काही वेळा अडचणीचे ठरू शकते, त्यापेक्षा दरवाजा थोडाच उघडेल अशी आतून साखळीची व्यवस्था असणे अधिक उपयुक्त ठरू शकते. कारण काही कारणाने, तुमच्या ओळखीच्या किंवा विश्वासू व्यक्तीला तुमच्या घरात प्रवेश करणे भाग पडणार असेल तर अशा वेळी आतली लावून घेतलेली कडी एक मोठी अडचण ठरते. सर्व अडथळे दूर करत घरात प्रवेश करून तुमच्यापर्यंत मदत पोचविण्यात बराच वेळ जाऊ शकतो.

वृद्धापकाळात सोने-नाणे घरात किंवा बॅंकेत तरी ठेवावे का? त्याचा उपयोग किती आणि त्याच्या सुरक्षेची काळजी किती? गरज असेल तेव्हा लॉकरमधून काढून आणणे हल्लीच्या जमान्यात कितपत सुरक्षित आहे?  त्याऐवजी रोख रक्कम बॅंकेत ठेवणे श्रेयस्कर ठरू शकते का? याचा विचार ज्याचा त्याने व्यवहारी दृष्टीने करावा.

पोलीस खात्याने आदेश दिल्याप्रमाणे सर्व लहान-मोठय़ा सोसायटीने सी. सी. टी.व्ही अवश्य बसवून घ्यायला हवा. तो खर्च अनाठायी ठरवता येणार नाही. सी. सी. टी.व्ही असेल त्या ठिकाणी वावरणाऱ्या सर्वानाच त्याचा एक प्रकारचा धाक वाटत असतो. आणि काही विपरीत घडल्यास तपासात त्याचा चांगला उपयोग होत असतो, असा अनुभव आहे.

पण हे सर्व झाले मोठय़ा शहरातील एकाकी वृद्धांच्या समस्येबद्दल. गाव पातळीवर देखील हा प्रश्न आता नव्याने पुढे येऊ लागला आहे. आता पूर्वीसारखी एकत्र कुटुंबे ग्रामीण भागातही अगदी नावापुरतीच राहिली आहेत. जात-पात, अंधश्रद्धा हे विषय पूर्वीसारखे कठोर, कडवे नसले तरी पूर्णपणे संपलेत असे नाही. आयुष्य गावात काढलेल्या व्यक्तीला शहरी वातावरण अजिबात पसंत पडत नाही. तो गावाकडच्या घरी एकटा राहणे पसंत करतो. वस्ती दूर दूर, त्याच्या बरोबरची माणसेही गावात हाताच्या बोटावर मोजण्या इतकीच शिल्लक असतात. घरे इतकी मोठी, की घरात माणूस आहे की नाही हे देखील संपूर्ण घर शोधल्याशिवाय कळणार नाही. बाहेरून अंदाज बांधणे कठीणच. तिथल्या आणि त्याच्या शहरातून राहणाऱ्या कुटुंबीयांच्या पुढे असणाऱ्या अडचणी वेगळ्याच स्वरूपाच्या आहेत. पण गावाकडच्या एकाकी वृद्धांपुढे आणि त्यांच्या दूर राहणाऱ्या कुटुंबीयांपुढे समस्याच नाहीत असे मात्र नाही. सर्वच ठिकाणी होणारे आणि होऊ घातलेले सामाजिक बदल लक्षात घेतले तर त्या विषयावर आज ना उद्या विचार करावाच लागणार आहे.

मोडकळीस आलेली इमारत असो की अगदी लहान आकाराची राहती जागा असो, आई-वडील ती सोडून मुलाकडे किंवा मुलीकडे राहायला जायला सहसा तयार नसतात. ज्या कुटुंबाचे आम्ही एकेकाळी प्रमुख म्हणून वावरलो, त्याच कुटुंबात दुसरीकडे म्हणजेच मुलाकडे किंवा मुलीकडे आम्ही त्यांचे एक प्रकारचे आश्रित म्हणून का राहावे? वेळ पडलीच तर आम्ही वृद्धाश्रमात जाऊ, पण अशी वेळ खरोखरच पुढे आली तरी फारच कमी वृद्ध वृद्धाश्रमाचा पर्याय स्वीकारताना दिसतात.

gadrekaka@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 25, 2018 1:03 am

Web Title: article about protecting older people
Next Stories
1 दुर्गविधानम् : ..ते हे राज्य!
2 घर बदलत्या काळाचे : घरचा भाजीपाला..
3 मानीव अभिहस्तांतरण : स्वागतार्ह सुधारणा
Just Now!
X