19 October 2019

News Flash

वस्तू आणि वास्तू : पडून राहणाऱ्या वाद्यांची समृद्ध अडगळ!

हर एक वाद्य घरात कसं ठेवावं, कसं जपावं, याची सुद्धा गरज वेगवेगळी असते. वाद्यानुरूप ती बदलते.

प्राची पाठक prachi333@hotmail.com

‘‘आमच्या मुलाला/मुलीला अमुक वाद्य शिकायचं आहे. कुठे मिळेल चांगलं वाद्य? किती किंमत असेल?’’ अशी विचारणा करणारे पालक पुष्कळ असतात आजूबाजूला. कधी वाद्यांच्या क्लासला जाणारे नवशिके अशी चौकशी करतात. चौकशी जरूर करावी, पण घरात धूळ खात पडून राहणाऱ्या वाद्यांच्या दुनियेत एक फेरफटका देखील मारून यावा.

आज सकाळी वाद्य शिकायला सुरुवात केली आणि आजच दुपारी ‘अरे, आपल्याकडे किनई हे वाद्यच नाही शिकायला,’ अशी खंत वाटली तर ती काही कामाची नाही. अशा इन्स्टंट स्टाईलमुळेच कितीतरी घरांत पेटी, तबला, वेगवेगळे कॅसिओ, गिटार, बासऱ्या, बाजे वगैरे वाद्यं धूळ खात पडलले असतात. ‘‘तुमच्याकडे तर काय पडूनच आहेत वाद्यं, द्या की आम्हाला शिकायला,’’ असाही विचार फारसा कामाचा नाही. कदाचित त्यावेळी त्या व्यक्तीला काही काळ जमत नसेल वाजवायला, पण ते ते वाद्य म्हणजे एक वेगळा बॉण्ड असतो त्या त्या व्यक्तीसाठी. बासरी, शहनाई वाद्यांना विशिष्ट प्रकारे तोंडावर ठेवून/ तोंडात घेऊन वाजवायचं असल्याने हायजीनचे मुद्दे असतात. कोणाची हाताळणी कशी, कोणाची कशी. पडून आहेत वाद्यं तर द्या कोणाला वाजवायला, हे तितके सहज सोपे म्हणूनच नाही. त्यात अनेक मुद्दे असतात. तुमचा दात घासायचा ब्रश जितका वैयक्तिक असतो, तितकाच वैयक्तिक असा हा वाद्य-वादक बॉण्ड असतो. ते समजून घेतलं जात नाही. मग उरतो उपाय तो वाद्य विकत घेऊन टाकायचा. पण आपली आवड काय, आपल्याला हेच का शिकायचं आहे असा कोणताच गृहपाठ न करता वाद्य विकत घेऊन टाकलं तर ते शिकायच्या आतच घरातल्या कोनाडय़ात जाऊन पडू शकतं. कितीतरी घरी तंबोरे, सतारी कोनाडय़ातले शो पिसेस बनून राहिलेल्या असतात. आपण कसे क्लास लोक आहोत, हे दाखवायचा एक मार्गसुद्धा असतो तो. अर्थात, शो पीस म्हणून हे ठेवलंय, अशी स्पष्टता तरी असावी! कपाटांच्या वर, माळ्यावर, कोपऱ्यात कुठेतरी पेटी पडलेली असते कापडात झाकून. असाच एखाद्या कोपऱ्यात तबला पडलेला असतो. साधारणत: वाद्यसंगीत –

शिकण्यासाठी म्हणून वाद्यं घ्यायची असतील तर आधी आपल्याला कोणतं वाद्य शिकायचं आहे, कसा वेळ देऊ शकणार आहोत आपण त्या शिक्षणाला, हे आधी स्वत:ला विचारायचं. तसा क्लास लावायचा. ते वाद्य आपल्या हाताला सूट होतंय का, ते काही काळ तपासायचं.

लगेच वाद्यं विकत घ्यायची घाई करायची नाही. काही काळ क्लासमध्ये जाऊ द्यायचा. कदाचित ते ते वाद्य वाजवायला जी स्नायूंची लवचीकता हवी असते, ती आपल्याकडे नसू शकते. व्हायोलिनसारख्या वाद्याला राळ लावली जाते, बो वर. त्याची कोणाला अ‍ॅलर्जी असू शकते. म्हणजे सगळं जुळून येऊन सुद्धा काहीतरी वेगळाच, पण जेन्यूईन प्रॉब्लेम असू शकतो काही शिकण्यात. हे सर्व किमान सहा महिने करून बघावं. ते वाद्य आपल्याला सूट होतेय का, ते ठरवावं. तेच वाद्य का, इतर कोणतं वाद्य का नाही, हे नीटसं समजून घ्यावं. त्यावर किमान सहा-आठ महिने हात बसला, गोडी वाटली, सातत्य राखू अशी खात्री वाटली, तरच ते विकत घ्यावं. नाहीतर, कोनाडय़ात पडून राहणाऱ्या घरातल्या समृद्ध अडगळीत भरच पडत राहते. त्यात ‘वापरत नाही, फेकवत नाही’ अशी ही अडगळ असते. कालांतराने त्या जुन्या वाद्याला किती किंमत येईल वगैरे विचार करण्यापेक्षा किंवा त्याचे घरात पडून एकेक भाग खिळखिळे होण्यापेक्षा आधीच विचार करणे उत्तम.

हर एक वाद्य घरात कसं ठेवावं, कसं जपावं, याची सुद्धा गरज वेगवेगळी असते. वाद्यानुरूप ती बदलते. एखादा बाजा घरातल्या कपाटाच्या कप्प्यात पडून राहू शकतो तसाच. पण चांगली बासरी अशी कुठेही, कशीही ठेवून चालत नाही. ती जपावी लागते. एखादं व्हायोलिन तर आणखीनच हलक्या हाताने हाताळायचं असतं. एखादी सतार कोनाडय़ात तशीच ठेवता येईल एखाद दिवस, पण व्हायोलिन मात्र वाजवून झाल्यावर मऊ कपडय़ात गुंडाळून त्याच्या केसमध्येच जपून ठेवावं लागतं. ताल वाद्यांच्या चामडय़ाची काळजी वेगळ्या प्रकारे घ्यावी लागते. तंतूवाद्यांच्या तारा ती वाद्य्ो त्यांच्या केसमध्ये ठेवतानासुद्धा जपाव्या लागतात. एखाद् दुसरा काही बिघाड झाला तर ठीक, नाहीतर ते वाद्य म्हणून पुन्हा घरात पडूनच राहतं. ते नीट ठेवणं आणि खराब झालंच तर वेळच्या वेळी दुरुस्त करून आणणं, याच गोष्टींची सवय करावी लागेल. जेणेकरून घरात समृद्ध अडगळ साठत जाणार नाही. त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे, ते ते वाद्य ‘वाजतं’ ठेवणं महत्त्वाचं.

 

First Published on December 29, 2018 2:33 am

Web Title: article about unused musical instruments at home