संपदा वागळे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

देशपांडेकाकांच्या बेडरूम कम् अभ्यासिकेत बसल्यावर तर पुस्तकांच्या गुहेत बसल्यासारखं वाटतं. पलंगासमोरच्या खिडकीच्या कट्टय़ावर काकांच्या आई-वडिलांचे स्वतंत्र फोटो आहेत, जेणेकरून डोळे उघडताच त्यांचं दर्शन घडावं. लिहिण्याच्या टेबलावर टी.व्ही आहे, पण तो बहुधा शोभेचाच. त्या खालचं टेबल मात्र अनेक ग्रंथांच्या जन्मोत्सवाचं साक्षी आहे. पहाटे तीन वाजल्यापासून इथे सरस्वतीची वीणा झंकारू लागते.

आम्हा घरी धन। शब्दांचीच रत्ने

शब्दांचीच शस्त्रे। यत्नै करू॥

शब्दचि आमुच्या। जीवीचे जीवन।

शब्दे वाटू धन। जनलोकां॥

संत तुकारामांचा हा अभंग ज्या घरी दृष्य स्वरूपात अवतरलाय असं एक घर नव्हे, तर ज्ञानमंदिर बघण्याचं; किंबहुना अनुभवण्याचं भाग्य मला अलीकडेच लाभलं. डोंबिवलीमधील मानपाडा रोडवरील अयोध्यानगरीतील हे निवासस्थान आहे ज्येष्ठ लेखक, कवी, व्यंगचित्रकार, संत साहित्याचे गाढे अभ्यासक आणि प्रवचनकार वामनराव देशपांडे यांचं. प्रियदर्शनी सोसायटीतील तळ मजल्यावरील साडेपाचशे स्क्वे. फुटांच्या या लहानशा जागेच्या नशिबात २००४ पासून भाग्योदय लिहिला असणार. कारण आधी भटक्या कुत्र्यांचं आश्रयस्थान बनलेलं हे ओसाड घर या देशपांडेंमुळे स्वानंद मठ नावाने ओळखलं जाऊ लागलंय.

या वास्तूचं स्वानंद मठ हे नामकरण देशपांडेकाकांनीच केलं. ते यासाठीच, की त्यांचे सद्गुरू राघवेंद्र स्वामी (आंध्र प्रदेशातील मंत्रालयम्चे) हे इथे अदृष्य स्वरूपात वास करून आहेत अशी त्यांची दृढ श्रद्धा आहे. स्वानंद मठाच्या दारातून आत पाऊल टाकताच डोळ्यांत (आणि मनात) भरते ती समोरच्या भिंतीवरील राघवेंद्र स्वामींची भव्य-दिव्य अशी प्रतिमा. (आपली) अवस्था.. कारण ज्ञानेश्वर माऊली, स्वामी समर्थ आणि तुकाराम हमाराज या त्रयींनी तिथे जमवलेली बैठक! दीड फूट उंचीच्या एका टेबलावर शेजारी शेजारी विराजमान झालेले हे संत पाहाणाऱ्यावर आपल्या डोळ्यांतून मायेचा वर्षांव करताहेत असं वाटतं. तिन्ही पुतळे भेट मिळालेले, परंतु यापैकी स्वामी समर्थ इथे कसे आले याची कहाणी ऐकण्यासारखी. त्याचं असं झालं.. रिझव्‍‌र्ह बँकेत ४१ वर्ष नोकरी करून निवृत्त झाल्यावर २००४ मध्ये काकांनी ही जागा घेतली आणि एका सुताराला जुजबी काम करायला सांगितलं. काकांचं सामान बघून (म्हणजे पुस्तकांनी भरलेल्या गोण्या, संत देवादिकांच्या प्रतिमा) त्याला काय वाटलं कोण जाणे! काकांना म्हणाला, ‘‘माझ्या घरी स्वामींचा एक अर्धपुतळा आहे. त्याची खरी जागा इथेच आहे. तो फक्त बोलून थांबला नाही तर त्याने एक छोटंसं काचेचं घर बनवलं. आणि त्यासह स्वामींना इथे आणून स्थानापन्न केलं. सभोवती संतांचा मेळा बघून स्वामीही सुखावले असणार!

स्वानंद मठाला ‘पुस्तकांचं घर’ असंही नाव शोभून दिसेल. कारण इथल्या तिन्ही खोल्यांत.. अगदी स्वयंपाकघरातदेखील जिथे नजर टाकाल तिथे तुम्हाला पुस्तकंच पुस्तकं दिसतील. स्वयंपाकखोलीतील स्वच्छ, नीटनेटक्या अशा लाकडी कपाटात डाळ, तांदूळ, तिखट, मीठ, मसाला यांच्या हातात हात घालून स्थित झालेले ज्ञानेश्वरी, भगवद्गीता, दासबोध असे ग्रंथ पाहून माझी अवाक्  नजर सहज वर गेली तर माळा गोणी आणि खोक्यांनी गच्च भरलेला. विचारल्यावर कळलं की, निर्मोहीकाकांनी यांमध्ये आत्तापर्यंत मिळालेली अनेक सन्मानचिन्हं आणि मानपत्रं अभिमानाचा वृथा स्पर्श नको म्हणून नजरेआड करून ठेवलीत.

राघवेंद्र स्वामी स्वयंपाकघरातदेखील एका लहान सुबक देव्हाऱ्यात विराजमान झालेत. त्यांच्यापुढे दोन पितळेचे नंदादीप तेवत होते. काका म्हणाले, ‘‘यातील एक दिवा आधीपासून होता. हा दुसरा कसा आला त्याची कथा सांगतो.. ‘‘एकदा प्रवचनानंतर एका श्रोत्याने शंभर रुपयांची नोट माझ्या हातात सरकवली. खरं तर माझी वाणी मी कधी विकत नाही. पण तेव्हा गडबडीत असल्याने नकळत मनाने ती नोट खिशात ठेवली गेली. थोडय़ा वेळाने वस्तुस्थिती लक्षात आल्यावर मी अपराधी मनाने त्या सद्गृहस्थांचा शोध घेतला, पण पैसे परत घ्यायला ते तयार होईनात. शेवटी त्या पैशांतून स्वामींसाठी उपयोगी वस्तू घेण्यावर समझोता झाला आणि हा दुसरा नंदादीप इथे येऊन बसला..’’

देशपांडेकाकांच्या बेडरूम कम् अभ्यासिकेत बसल्यावर तर पुस्तकांच्या गुहेत बसल्यासारखं वाटतं. पलंगासमोरच्या खिडकीच्या कट्टय़ावर काकांच्या आई-वडिलांचे स्वतंत्र फोटो आहेत, जेणेकरून डोळे उघडताच त्यांचं दर्शन घडावं. लिहिण्याच्या टेबलावर टी.व्ही आहे, पण तो बहुधा शोभेचाच. त्या खालचं टेबल मात्र अनेक ग्रंथांच्या जन्मोत्सवाचं साक्षी आहे. पहाटे तीन वाजल्यापासून इथे सरस्वतीची वीणा झंकारू लागते. सार्थ भगवद्गीता, सार्थ ज्ञानेश्वरी, सार्थ दासबोध, अमृतानुभव, नवनाथ भक्तीसागर, गुरुचरित्र, गाथा सप्तशती, दैनंदिन प्रवचनांमध्ये नामस्मरण, गाभारा, श्रीगणेश दर्शन, स्वामीदर्शन.. इ. १० खंड, शिवाय संतचरित्रे, कथा, कादंबऱ्या, कविता, समीक्षा विविध पुस्तकांना प्रस्तावना, कवी / लेखक यांची चरित्रे.. अशी विपुल साहित्यसंपदा त्यांच्या लेखणीने आजवर प्रसवली आहे.

लेखन टेबलाच्या दोन्ही बाजूला उभे रॅक्स आहेत. त्यात म्हणाल ते संदर्भ ग्रंथ, कवितांची पुस्तकं (म्हणजे समग्र शांताबाई, ए टू झेड सुरेश भट.. असं), मराठी आणि इंग्रजी शब्दकोश, गाण्यांची पुस्तकं.. असा अनमोल खजिना आहे. एखाद्याने सगळं वाचायचं ठरवलं तर मला वाटतं, दोन / चार जन्म तरी सहज लागावेत. ते भांडार पाहून माझ्या तोंडून प्रश्न निसटला.. ‘तुम्ही वाचलीयत का हो ही सर्व पुस्तकं?’ यावर काकांचं शांत उत्तर.. संदर्भग्रंथाखेरीज मी फारसं वाचत नाही. हृदयातून जे उमटतं ते बोटांद्वारे कागदांवर उतरतं.

जुलै २००५ च्या पावसाच्या प्रलयाचा तडाखा या घराला बसला. सखल भाग आणि तळ मजला यामुळे बघता बघता घरात कंबरभर पाणी साठलं. फ्रीज वॉशिंग मशीन अशा जड वस्तूही तरंगू लागल्या, तिथे पुस्तकांची काय कथा? अनेक पुस्तकं, हस्तलिखितं यांचा अक्षरश: लगदा झाला. मात्र, त्याही परिस्थितीत काकांनी सार्थ दासबोध, ज्ञानेश्वरी, भागवत हे ग्रंथ वाचवले. जे गेलं त्याचं दु:ख करण्यापेक्षा जे वाचलं त्यासाठी आभार मानण्याची वृत्ती.. सार्थ दासबोध या ग्रंथाचं पंधराशे पानांचं हस्तलिखित आदल्या दिवशीच मनोरमा प्रकाशनाकडे नेऊन देण्याची बुद्धी झाली याबद्दल कृतज्ञता.

स्वानंद मठात काका एकटेच राहतात. एकटे कशाला म्हणायचं? स्वामींची आणि पुस्तकांची सोबत (त्यांच्या भाषेत ऊब) असतेच की! शिवाय त्यांचा एक छोटासा परिवार आहे.

ऐकताना तोंडाचा आ वासेल असं या वास्तुसंदर्भातलं एक वास्तव म्हणजे, या घराला आत्तापर्यंत एकदाही कुलूप लागलेलं नाही. काका आठ-आठ दिवस प्रवचनासाठी बाहेर गावी गेले तरी मठाचं दार सदैव उघडं. यापाठचं त्यांचं स्पष्टीकरण- इथे स्वामी बसलेत. मग आसुरी शक्ती आत येईलच कशी? शिवाय चोरण्यासारखं इथे आहेच काय? मी म्हटलं, अगदी खरं!

डोंबिवलीत येण्यापूर्वी काका मुंबईत तीन-चार ठिकाणी राहिलेत. पहिलं घर आंग्रेवाडीतील (गिरगाव) आठ बाय आठचं. घरात ३६ विश्वं दारिद्रय़, पण शुचिसंपन्नता २०० टक्के. दहावीला असताना याच घरात लिहिलेली त्यांची पहिलीवहिली गोष्ट ‘कथा सांगतो कृष्णाची’ कोकण वैभव या साप्ताहिकात प्रसिद्ध झाली. पुढे आंग्रेवाडीतीलच थोडय़ा मोठय़ा म्हणजे दीडशे स्के. फुटांच्या घरात त्यांची पहिली कादंबरी ‘आम्ही यातनांचे स्वामी (संभाजीच्या जीवनावरील) जन्माला आली. त्यानंतर मुंबई सेंट्रल येथील रिझव्‍‌र्ह बँकेच्या क्वार्टरमध्ये राहायला गेल्यावर तर त्यांच्या लेखणीला असंख्य घुमारे फुटले. या घरातून त्यांनी इतर लेखनाबरोबर तीन दर्जेदार वृत्तपत्रांतून एकाच वेळी आध्यात्मिक विषयांवर वर्षभर दैनंदिन सदरं लिहिली.

लेखन, वाचन, मनन याबरोबर मुंबई सेंट्रलच्या वास्तूत अनेक मैफिली रंगल्या. त्या आठवणी सांगत असताना मधेच थांबून या घरात बाहेरच्या खोलीत ठेवलेल्या पलंगाकडे बोट दाखवत काका म्हणाले, ‘या कॉटने त्या घरात (मुंबई सेंट्रलच्या) जे अनुभवलंय ते कल्पनातीत आहे.. दुर्गाबाई यावर शंभर वेळा तरी बसल्या असतील.. शांताबाईंनी इथेच बसून चार वेळा कवी संमेलन भरवलं..  सुरेश भटांनी अख्खी रात्र या बैठकीवर गझलमय केलीय. राम पटवर्धन, शंकर वैद्य असे रथी – महारथीच नव्हे तर यशवंतराव चव्हाणांचा (परराष्ट्रमंत्री असताना) स्पर्शही या गादीला लाभला आहे. म्हणूनच या ऐतिहासिक पलंगावर आता काकांनी रामरायाला बसवलंय; जेणेकरून तिथे कोणी बसू नये आणि त्या बैठकीला लगडलेल्या आठवणी तशाच अबाधित राहाव्यात.

या ज्ञानमंदिरात गीता, ज्ञानेश्वरी, भागवत, दासबोध या विषयांवर काकांची नेहमी प्रवचनं होतात. चैत्रात रामकथा ऐकायला मिळते तर नवरात्रीत गाथा सप्तशती उलगडते. अनेक पुस्तकांची प्रकाशनं इथे होतात. हे ऐकून वाटलं, इथल्या भिंतीना जर वाचा फुटली तर माऊलीनी वरदहस्त ठेवलेल्या त्या रेडय़ासारख्या याही ऐकलेला सर्व वेदांत धडाधडा म्हणून दाखवतील.

भारल्या मनाने घराचा निरोप घेतला. परतताना अटलजींच्या दोन ओळी मनात घुमत होत्या..

यह वंदन की भूमि है। अभिनंदन की भूमि है।

यह तर्पण की भूमि है। यह अर्पण की भूमि है।

लेखन टेबलाच्या दोन्ही बाजूला उभे रॅक्स आहेत. त्यात म्हणाल ते संदर्भ ग्रंथ, कवितांची पुस्तकं (म्हणजे समग्र शांताबाई, ए टू झेड सुरेश भट.. असं), मराठी आणि इंग्रजी शब्दकोश, गाण्यांची पुस्तकं.. असा अनमोल खजिना आहे. एखाद्याने सगळं वाचायचं ठरवलं तर मला वाटतं, दोन / चार जन्म तरी सहज लागावेत.

waglesampada@gmail.com

मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Article about vamanrao deshpande home
First published on: 15-09-2018 at 01:02 IST