गावाकडून मोठय़ा प्रमाणावर शहरांमध्ये लोक येतात, ते तिथे नोकरीच्या संधी अधिक असतात म्हणून. लहान-लहान ऑफिसांपासून आपल्या व्यावसायिक कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्याचं स्वप्न असतं ते, मोठय़ा कॉर्पोरेट कंपन्यांमधल्या उच्चपदस्थ आणि म्हणून गलेलठ्ठ पगाराच्या नोकऱ्या मिळवण्याचं! काहीजण दुसऱ्याकडे नोकरी करण्याऐवजी स्वत:चं ऑफिस थाटून इतरांना आपल्याकडे नोकरीला ठेवायचं स्वप्न बघतात. छोटय़ा ऑफिसपासून सुरू झालेला व्यवसाय वाढून मोठय़ा कंपनीत त्याचं रूपांतर व्हावं, हे त्यांचंही स्वप्न असतंच. थोडक्यात काय, तर प्रगतीचा महामार्ग गाठून यशाची क्षितिजं गाठायची, हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. मग ते नोकरी करत असोत, की स्वत:चा व्यवसाय. काम करत असलेलं कार्यालय स्वत:चं असो, की दुसऱ्याचं.. पण जिथे आपण दिवसाचे आठ तास आणि आजच्या दिवसात तर कधी कधी अगदी दहा-बारा तासही घालवतो. अशा कार्यालयांच्या बंदिस्त खोल्यांमध्ये वावरत असताना मन प्रसन्न असेल तर काम करायला हुरूप वाटतो आणि असं उत्साहाने काम केलं तरच प्रगती होऊ शकते. त्यासाठी ऑफिसमधली माणसं, कामाचं स्वरूप, बॉसचा स्वभाव वगरे गोष्टी जितक्या महत्त्वाच्या आहेत, तितकंच ऑफिसमधलं वातावरण तयार करण्यात तिथल्या रंगसंगतीचाही वाटा असल्याचं संशोधनाअंती दिसून आलंय. त्याचविषयी आपण आजच्या भागात जाणून घेणार आहोत.

विशिष्ट रंग आणि माणसांचे मूड किंवा रंग आणि कार्यक्षमता यांचा थेट संबंध आहे. मात्र, मूड आणि कार्यक्षमता यांचा थेट संबंध आहे, असं अलीकडे झालेल्या संशोधनातून आढळून आलं आहे. याचं एक उदाहरण द्यायचं झालं, तर १९७९ साली अमेरिकेतल्या वॉिशग्टन इथं केलेल्या पिंक प्रिझन अर्थात गुलाबी तुरुंग या प्रयोगाचं उदाहरण देता येईल. वॉिशग्टनच्या सिएटल भागात असलेल्या एका तुरुंगाच्या सर्व भिंती गुलाबी रंगात रंगवल्या. त्यामुळे तिथल्या कैद्यांमधली आक्रमकता कमी झाल्याचं आढळून आलं. त्यामुळे नंतर दोनच वर्षांत कॅनडातल्या टोरांटो इथल्या यॉर्क विद्यापीठात अशाच प्रकारचं संशोधन हाती घेतलं गेलं आणि तिथल्या तुरुंगातल्या भिंतीही गुलाबी रंगात रंगवल्या गेल्या. मात्र, तिथल्या कैद्यांमध्ये आक्रमकता कमी झाल्याचं आढळून आलं नाही. हा अनुभव लक्षात घेऊन अमेरिकेत पुन्हा एकदा सखोल संशोधन हाती घेतलं गेलं. त्यात तब्बल १५ र्वष प्रयोग केल्यानंतर असं आढळून आलं की, काही व्यक्ती या रंग बदलताना मानसिकदृष्टय़ा अधिक चांगलेपणाने सामावून घेतात, तर काहींना अशा प्रकारे जुळवून घेणं कठीण जातं. त्यामुळे रंगांचे वेगवेगळ्या व्यक्तींच्या मनावर होणारे परिणाम हे वेगवेगळे असतात. माणसांचे मूड रंगांनुरूप बदलतात, पण मूड चांगला असला, की कार्यक्षमतेत वाढ होईलच असं सांगता येत नाही. कार्यक्षमता सुधारण्याकरता कामाचं स्वरूप काय आहे ते लक्षात घेऊन मग रंगांची निवड करणं गरजेचं आहे. केवळ मूड चांगला राखला म्हणजे कार्यक्षमता सुधारत नाही. कधी कधी चांगला मूड असूनही आनंदाच्या भरात माणसांचं लक्ष त्यांच्या कामावरून हटून इतरत्र स्थिरावल्यामुळे कार्यक्षमता कमी होते. पण विशिष्ट रंगांच्या वापरामुळे जर कामावर लक्ष केंद्रित व्हायला मदत झाली, एकाग्रता वाढायला मदत झाली किंवा वातावरण कामाच्या स्वरूपाला पोषक व्हायला मदत झाली, तर मात्र कार्यक्षमतेत वाढ होऊ शकते. अशा वेळी मन आनंदी नसेल, पण शांत असेल किंवा एकाग्र असेल, तरीही कार्यक्षमता वाढू शकते. सर्वसाधारणपणे ऑफिसमध्ये कोणते रंग वापरावेत किंवा टाळावेत आणि त्यांचा कशा प्रकारे मनावर परिणाम होतो, हे आपण आता जाणून घेऊया.

पांढरा रंग : हा रंग शुद्धता, स्वच्छता आणि सुरक्षितता यांचं प्रतीक असला, तरीही सर्वसाधारणपणे ऑफिसेससाठी हा रंग टाळावा. सर्वसाधारणपणे रुग्णालयाच्या भिंती रंगवण्यासाठी वापरला जाणारा हा रंग ऑफिसच्या भिंतींसाठी वापरला, (छायाचित्र १) तर रुग्णालयात असल्याची भावना मनात निर्माण करतात आणि मनावर एक कसलंसं अनामिक दडपण जाणवतं. एखाद्याला अशा प्रकारचं दडपण जाणवणार नाही, पण आजूबाजूला असलेला पांढरा रंग निरस वाटायला लावू शकतो आणि त्यामुळेच कंटाळवाणं वाटायला लागतं, निरुत्साह जाणवतो. दडपण असो वा निरुत्साह, या सगळ्याचा परिणाम अर्थातच कार्यक्षमतेवर होणारच, हे वेगळं सांगायची गरज नाही.

काळा रंग : अधिकार आणि नियंत्रण यांचं प्रतीक असलेला काळा रंग ऑफिसमध्ये वापरला, तर स्वत:चं ऑफिस असलेल्या लोकांचं चांगलं नियंत्रण त्यांच्या कर्मचाऱ्यांवर राहू शकतं. कारण काळ्या रंगात एक बंदिस्तपणाची चौकट आहे. काळ्या रंगाच्या अनंत पसरलेल्या अवकाशातून आपण रात्रीच्या वेळी विमान प्रवास करत असताना विश्वाचं ते अफाट अनंत रूप पाहून परमेश्वरासमोर लीन असतो. कारण आपल्याला त्या वेळी त्या काळोखात मनाला हव्या असलेल्या आधारामुळे आपण ज्याच्यावर अवलंबून असतो, त्याला शरण जातो. तशीच काहीशी भावना बॉसबद्दलही मनात निर्माण होऊ शकते. मात्र, काळा रंग हा प्रकाश शोषून घेत असल्यामुळे त्याचा वापर मर्यादितपणे आणि सावधपणे केला पाहिजे, नाहीतर त्यामुळे मनावर सावट आल्यासारखं वाटून त्याचा उलट परिणाम होऊ शकतो. म्हणूनच काळ्या रंगाचा वापर शक्यतो पांढऱ्याबरोबर आणि इतर रंगांच्या सान्निध्यात केला तर चांगला. पिवळ्याबरोबर असलेला काळा रंग एक श्रीमंती बाजही देतो. (छायचित्र २ पाहा) वकील, इंटिरिअर डिझाइनर, आíकटेक्ट अशा सल्लागारीचा व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांच्या ऑफिसमध्ये किंवा बिल्डरच्याही ऑफिसमध्ये अशा प्रकारची रंगसंगती वापरावी.

निळा रंग : ज्या ऑफिसमध्ये कामाचं स्वरूप किचकट असल्यामुळे जास्त एकाग्रतेची गरज आहे अशा ठिकाणी मन शांत ठेवून एकाग्रतेला पोषक ठरणारा निळा रंग योग्य ठरू शकतो. उदाहरणार्थ, चार्टर्ड अकाउंटण्टच्या ऑफिसमध्ये कॉम्प्युटरवर आíथक व्यवहारांबाबतची क्लिष्ट कामं करायची असतील, तर अशा ठिकाणी मनाची एकाग्रता आवश्यक असल्यामुळे निळ्या रंगाचा वापर अधिक प्रभावी ठरतो. (छायाचित्र ३) एकाग्रतेत वाढ झाल्यामुळे कार्यक्षमतेत वाढ व्हायला नक्कीच मदत होते. याबरोबरच जिथे अधिक माणसं टीमवर्कमध्ये काम करतात, अशा ठिकाणीही निळ्या रंगाचा वापर जास्त उपयोगी ठरू शकतो.

हिरवा रंग : या रंगाचा परिणाम कसा होईल, ते या रंगाच्या कोणत्या छटा वापरल्या जातात, त्यावर अवलंबून असतं. संपूर्णपणे हिरव्या रंगातल्या ऑफिसमध्ये वावरताना फार काळ इथे राहू नये, असंच मनाला वाटतं (छायाचित्र ४(अ)). गडद हिरव्या रंगात भिंती रंगवलेल्या असताना त्या आपल्या दिशेने अंगावर येत असल्यासारखं वाटतं. (छायाचित्र ४(ब)). पण फिक्कट पिस्ता रंगातल्या ऑफिसमध्ये मात्र मनाला टवटीतपणा जाणवतो. मनाला आरामदायी वाटतं. (छायाचित्र ४(क)). नसíगक उत्पादनं, आयुर्वेदिक किंवा इतर औषध कंपन्यांची ऑफिसेस, हर्बल उत्पादनांची ऑफिसेस अशा ठिकाणी  हा रंग वापरायला हरकत नाही.

पिवळा किंवा पिवळसर नारिंगी रंग : हा रंग नवनिर्मितीचं प्रतीक आहे. त्यामुळे जाहिरात कंपन्यांची ऑफिसेस, वर्तमानपत्रांची किंवा इतर प्रसारमाध्यमांची ऑफिसेस, जिथे कामात सर्जनशीलता लागते, अशा ठिकाणी या रंगाचा वापर केला तर मन अधिक चतन्यदायी राहू शकतं, त्याचा प्रतिभाशक्तीवर चांगला परिणाम होऊ शकतो. असंच एक जाहिरात कंपनीचं ऑफिस छायाचित्र ५ मध्ये दिसत आहे.

थोडक्यात, रंगांची निवड करताना मनाच्या मूडचा म्हणजेच भावविश्वाचा विचार करण्यापेक्षा तिथे कोणत्या स्वरूपाचं काम चालणार आहे, याचा विचार करून रंगसंगती निवडली, तर ऑफिसमधलं काम हे समाधान देण्याबरोबरच कर्मचाऱ्यांची क्षमता वाढायलाही कारणीभूत ठरू शकतं. याचा जसा ऑफिसच्या मालकाला किंवा व्यवस्थापनाला उपयोग होतो, तसाच आपलं काम अधिक चांगल्या कार्यक्षमतेने केल्यामुळे करिअरमध्ये योग्य ती प्रगती साधून स्वप्नातलं यश वेगाने संपादन करण्यासाठी कर्मचाऱ्यांनाही ते साहाय्यभूत ठरू शकतं.

(लेखक इंटिरियर डिझायनर आहेत.)

anaokarm@yahoo.co.in