इतिहासातल्या कोणत्याही कालखंडाचा राजकीय वा सामाजिक वा लष्करी दृष्टिकोनातून विचार करताना एक गोष्ट प्रकर्षांने जाणवत राहते, ती म्हणजे त्या त्या कालखंडात असणारे तटबंदीयुक्त शहरांचे वा दुर्गाचे महत्त्व. राज्य निर्मिणे, आहे ते राखणे, राखलेले सांभाळणे अन् वाढवणे या अवघ्या प्रक्रियेमध्ये तटबंदीयुक्त शहरांची अन् दुर्गाची भूमिका अतिशय महत्त्वाची अन् मध्यवर्ती ठरत होती. वेदवाङ्मयापासून तो सतराव्या शतकातल्या रामचंद्रपंत अमात्यांच्या आज्ञापत्रापर्यंत दुर्ग या संकल्पनेच्या या स्वरूपाविषयी असंख्य उल्लेख सापडतात.

मूळ भारतीय वंशाच्या लोकांनी आपल्या अतिशय प्रगत अशा बुद्धिसामर्थ्यांने रचलेल्या तटबंदीयुक्त शहरांच्या जोरावर आपल्या शत्रूंना अनेक शतके झुंजवले. दुर्गबांधणीची तत्त्वे अन् कला आत्मसात झाल्यावरच त्याचे उल्लेख वेदवाङ्मयामध्ये बहुधा उमटले असावेत. इतिहासकारांच्या मतानुसार ख्रिस्तपूर्व २००० ते १५००च्या दरम्यान गंगा-यमुनेच्या दुआबाच्या प्रदेशात सरकतानाच्या या कालखंडात आर्यानी एकछत्रीकरणाची प्रक्रिया अवलंबिली. याचे कारण सांगता येते की, लष्करी बांधकामांची अन् त्या अनुषंगाने येणाऱ्या वेगळ्या अन् वैशिष्ट्यपूर्ण अशा राजकीय सामर्थ्यांची अन् दृष्टिकोनांची तत्त्वे आर्यानी हा काळपावेतो पूर्णतया आत्मसात केली होती. त्यांच्या या विस्तारलेल्या दृष्टिकोनाच्या फलस्वरूप त्यांच्या राजकीय आकांक्षांची क्षितिजेही विस्तारत गेली. कुरू,चेदी अन् पांचालांसारखी बलशाली राज्ये दुआबात उभी राहिली, तर कोसल, विदेह अन् मगधांसारखी गणराज्ये त्याही पूर्वेकडल्या प्रदेशात बळिवंत ठरली. किलग, अश्मकांसारख्या गणराज्यांनी दक्षिणापथात हातपाय पसरून आपली मुळे घट्ट केली. हे सारे होत असताना असंख्य लढाया लढल्या गेल्या. आक्रमणांची अन् प्रतिकारांची देवघेव झाली. दुर्गाना वेढे पडले अन् त्यांचे विध्वंसही झाले. नवीन स्थळे निवडून तिथे नवनवीन दुर्गाची निर्मितीही झाली. विद्वेषांच्या अन् तहांच्या, नवीन व जुन्यांच्या संघर्षांच्या व संक्रमणाच्या या काळात दुर्ग या विषयाची मूलभूत कल्पना अखंड व अडीग अशीच आपल्या दृष्टोत्पत्तीस पडते. सृजनशक्तीचा दिमाख तिथे ठायी ठायी आढळतो. चक्रवर्ती नृपती आले अन् गेले. भली बळिवंत साम्राज्ये आली अन् अस्तावली. सरस्वतीच्या पुत्रांनी आपल्या वाग्विलासाने गगनास गवसणी घालू पाहिली, संस्कृतीच्या वटवृक्षास नवनवे धुमारे फुटले. सुखसंपन्नतेच्या परिसीमांच्या व्याख्या कालौघात बदलल्या. मात्र काळाच्या या सुंदोपसुंदीतून दुर्गस्थापत्यशास्त्राचा एक समान धागा या साऱ्यांमधून सलग धावता राहिला.

‘अंगुत्तरनिकाय’ या बौद्ध धर्मग्रंथात आर्य काळातल्या सोळा जनपदांचा वा स्वायत्त गणराज्यांचा उल्लेख आढळतो. त्यात अंग, मगध, काशी, कोसल, विज्ज, मल्ल, चेदी, विदेह, कुरू, पांचाल, मत्स्य, शूरसेन, अश्मक, अवंती, गांधार अन् कांबोज ही सोळा गणराज्ये अंतर्भूत आहेत. यांतल्या काही जनपदांचे उल्लेख रामायणात आहेत, तर सर्वाचेच उल्लेख महाभारतात आहेत. बौद्ध जातककथांमध्येही ही जनपदे ठायी ठायी उल्लेखिली गेली आहेत. ही सारीच महाजनपदे स्वतंत्र होती, युद्धसज्ज होती अन् महत्त्वाचे म्हणजे अतिशय भक्कम अशा दुर्गानी संरक्षिलेली होती.

अंगदेशाची राजधानी चंपानगर वा मालिनीनगर. हे शहर हा अतिशय भक्कम अशा तटबंदीने युक्त असा दुर्ग होता. मगधांची प्राचीन राजधानी गिरिव्रज वा राजगृह हा पाच डोंगरांनी वेढलेला, अभेद्य असा गिरिदुर्ग होता. नाना प्राचीन ग्रंथांमध्ये याचा वसुमती, बृहद्रथपुरी, मगधपूर, वराहवृषभ, ऋषिगिरी, चत्यक, िबबिसारपुरी अशा निरनिराळ्या नावांनी उल्लेख सापडतो. काशी राज्याची बनारस ही राजधानी हा बारा योजन घेराचा बलशाली दुर्ग होता. कोसलांची कपिलवस्तू व साकेत या दोन्ही राजधान्या दुर्गरूप होत्या. लिच्छवींची वैशाली ही राजधानी तटबंदीच्या तीन स्तरांनी बंदिस्त होती. निरनिराळ्या ठिकाणी बुरूज होते. बुरुजांनी बंदिस्त कमानी होत्या. उंच उंच स्तंभांनी नटलेले प्रासाद होते. मोठमोठी सभागारे होती. महावास्तू जातकानुसार इंद्राच्या अमरावतीसही लाजवेल अशी ही नगरी होती. मल्लदेशाची कुशीनगर ही राजधानीही दुर्गरूप होती. चेदीराजांची गंडकीच्या तीरावरची शुक्तिमतीपूर ही राजधानीही तटबंदीने वेढलेली होती. साहजती व त्रिपुरी ही त्यांच्या राज्यातील दोन शहरेही भक्कम अशा तटबंदीने युक्त होती.  हस्तिनापूर व इंद्रप्रस्थ या कुरूच्या दोन राजधान्या. त्यांच्या दुर्गमतेचे व तटबंदींचे हवे तेवढे उल्लेख महाभारतात सापडतात. दृषद्वती नदीच्या तीरावरची पांचालांची राजधानी कांपिल्यनगरी अन् मत्स्यांची विराटनगरी या दोन्ही राजधान्या अतिबलाढय़ म्हणून गणल्या जात होत्या. शूरसेनांची मथुरा ही राजधानी, मालवांची उज्जन, अश्मकांची महिष्मती या साऱ्याच प्राचीन राजधान्या दुर्गरूप होत्या. गांधार, मद्र, सौवीर ही सारीच जनपदे बलिष्ठ होती. गांधारांची तक्षशिला, मद्रांची शाकल व सौवीरांची रौरुका या साऱ्याच राजधान्या भक्कम दुर्गरूप ल्यायलेल्या होत्या. उत्तर पांचालांची अहिच्छत्र ही राजधानी तिच्या दरुलघ्य अशा तटबंदीसाठी प्रसिद्ध होती. उत्खननात सापडलेल्या तेथील पांडुदुर्ग या दुर्गात ३६ बुरूज सापडले आहेत. कोसलांची अयोध्या ही राजधानी हा एक प्रगत असा दुर्ग होता. चिनाब नदीच्या खोऱ्यातला अंबष्ठदेश तेथील दुर्गासाठी प्रसिद्ध होता. या गांधारदेशापासून पसरलेल्या पंचनद्यांच्या प्रदेशात वसलेल्या दुर्गम अशा गिरिदुर्गानीच अलेक्झांडरच्या धावत्या पावलांना खीळ घातली. किंबहुना त्याची जग जिंकायची युद्धपिपासू महत्त्वाकांक्षा या भागातल्या दुर्गानी व या दुर्गाच्या आसऱ्याने लढणाऱ्या चिवट व स्वाभिमानी एतद्देशीयांनी पार धुळीस मिळवली.

पाटलीपुत्र ही मौर्य साम्राज्याची विख्यात राजधानी. तिच्या दुर्गरूपाची समकालीन परकीय प्रवाशांनी केलेली वर्णने ही तत्कालीन दुर्गशास्त्राचे प्रगत स्वरूप स्पष्ट करतात. पाटलीपुत्राचे झालेले उत्खनन व कौटिल्याचे अर्थशास्त्रात असलेले दुर्गातील नगराचे वर्णन यांत कमालीचे साम्य आढळते. मेगॅस्थिनीसने म्हटल्याप्रमाणे हे शहर साडेनऊ मल लांब अन् दीड मल रुंद होते. सभोवताली सहाशे फूट रुंदीचा व तीस हात खोल असा पाण्याने भरलेला खंदक होता. चोवीस फूट रुंदीच्या त्याच्या तटात चौसष्ट वेशी अन् पाचशे सत्तर बुरूज होते. शहरातल्या चार दिशांना चार महाद्वारे होती. फाहियान व ह्य़ूएन त्संग हे चिनी प्रवासीसुद्धा या वर्णनास दुजोराच देतात.

शुंग व काण्वायनांच्या काळात या दुर्गवैभवात फारशी भर पडली नाही. किलगराज खारवेलाच्या हाथीगुंफेच्या शिलालेखात त्याने काही मोडकळीस आलेल्या दुर्गाची डागडुजी केल्याचे उल्लेख आढळतात. हर्षवर्धनाच्या काळात बंगाल व दक्षिण भारतात बलाढय़ राज्ये नांदत होती अन् त्यांच्या राजधान्याही मजबूत तटबंदीने वेढलेल्या होत्या. वाकाटक, नाग, गुप्त, वर्धन यांची आपापली अवाढव्य साम्राज्ये होती. आणि जरी त्यांचे उल्लेख आढळत नसले, तरी ही सारीच साम्राज्ये बलाढय़ अन् दुर्जेय अशा दुर्गानी युक्त होती. काही प्राचीन राजधान्यांची नावे राजमान्य झाली आहेत. शासनाच्या कृपाकटाक्षामुळे तिथे किरकोळ अशा स्वरूपाची उत्खननेही झालेली आहेत. त्यांमधून जे काही चित्र उमटले आहे ते या प्रमेयावर प्रकाशझोत टाकण्याएवढं नक्कीच आहे. यांतील सर्वच ठिकाणच्या उत्खननात तटबंदींचे अवशेष सापडले आहेत. ही सर्वच शहरे िहदुस्थानच्या प्राचीन इतिहासाशी संबंधित आहेत अन् आजच्या घडीस इथे जुन्या अवशेषांवर नवीन शहरे वसलेली आहेत. ज्यामुळे उत्खनन करणे दुष्कर झाले आहे. त्यामुळे प्राचीन काळी उपरोक्त शहरांच्या तटबंद्यांच्या क्षेत्रफळाचा आकार आज उत्खनित झालेल्या आकारापेक्षा जास्त असावा असे गृहीतक मांडले तर ते धाडसाचे ठरू नये.

सिंधुसंस्कृती पूर्व कालखंडापासून ते अगदी शिवकालाच्या उत्तरार्धापर्यंत दुर्ग हा कुणाही राज्यसंस्कृतीचा अविभाज्य अन् अनिवार्य असा घटक होता. यांच्या स्वाधीन असण्यावर वा नसण्यावर साम्राज्यांच्या समृद्धीची वा विनाशाची बीजे रोवली जात होती. इतिहासाचे नवनवे अध्याय लिहिले जात होते; साम्राज्यांचे, राज्यांचे, समाजांचे, संस्कृतींचे अन् सर्वसामान्यांच्या सामान्य आयुष्यांचेदेखील!

मध्ययुगात लिहिल्या गेलेल्या नीतिशास्त्रावरील वा शिल्पशास्त्रावरील ग्रंथांमध्ये याचे प्रतििबब उमटलेले आढळते :

‘भागेनकेन चावश्यं कार्य: कोशस्य संचय:।

कोशात्सुखमवाप्नोति कोशहीनस्तु सीदति॥

विषहीनो यथा नागो मदहीनो यथा गज:।

सर्वेषां वश्यतां याति दुर्गहीनस्तस्था नृप:॥’

अर्थ असा की, कोशसंचयामुळे अवघीच काय्रे सुलभ होतात. कोशामुळे सुख लाभते, तर कोशहीन दु:खी ठरतो. जसा विषहीन नाग वा मदहीन हत्ती अगदी तशीच अवस्था सारे काही असलेल्या मात्र दुर्गहीन अशा राजाची असते. या ओळी कोश अन् दुर्ग यांना मध्ययुगात जे महत्त्व होतं, त्याची नोंद नेमक्या शब्दांत करतात. ‘शिवतत्त्वरत्नाकर’ या ग्रंथाची रचना सतराव्या शतकाच्या अखेरीस झाली. गोव्याच्या दक्षिणेपासून कन्ननोपर्यंत पसरलेल्या इक्केरीच्या राज्याचा राजा बसवभूपाल याने हा ग्रंथ रचला.

‘शुक्रनीती’ मध्ये परीखदुर्ग, परीघदुर्ग, वनदुर्ग, धान्वदुर्ग, जलदुर्ग, गिरिदुर्ग, सन्यदुर्ग व साहाय्यदुर्ग असे दुर्गाचे आठ प्रकार दिलेले आहेत. परीखदुर्ग म्हणजे असमतल प्रदेशाने वेढलेला दुर्ग. परीघदुर्ग म्हणजे ज्याचा परीघ विटा, दगड वा माती यांच्या तटांनी वेढलेला आहे, असा दुर्ग. वनदुर्ग म्हणजे गर्द अरण्याच्या मध्यभागी वसलेला दुर्ग. धान्वदुर्ग म्हणजे मरूभूमीत- वाळवंटात वसलेला दुर्ग. गिरिदुर्ग म्हणजे शब्दातून प्रतीत होणारा – पर्वतमाथ्यावर वसलेला दुर्ग. शुक्रनीतीतला पुढचा प्रकार म्हणजे सन्यदुर्ग. हा बहुधा मनूने वर्णन केलेला नृदुर्ग असावा. बहुधा सन्याचे विविध आकारांत रचलेले व्यूह हा अर्थ या शास्त्रकाराला अभिप्रेत असावा. शेवटचा साहाय्यदुर्ग म्हणजे मित्रराष्ट्रांच्या वा मित्रांच्या आधिपत्याखाली असलेले दुर्ग. यांमध्ये परीखदुर्ग व साहाय्यदुर्ग हे दोन नवीन प्रकार शुक्रनीतीमध्ये आढळतात. मात्र शुक्राचार्याच्या मते सन्यदुर्ग व सहाय्यदुर्ग हे दुर्गप्रकार सर्वोत्तम. इतर भाष्यामध्ये ते मनुस्मृतीचीच री ओढतात.

विख्यात चालुक्य राजा तिसऱ्या सोमेश्वराने इ.स. ११५१ मध्ये रचलेल्या ‘मानसोल्लास’ किंवा ‘अभिलषितार्थचिंतामणि’ या ग्रंथात नऊ प्रकारच्या दुर्गाचे वर्णन आहे. त्यांतील सहा प्रकार मनुस्मृती, इत्यादी ग्रंथांमध्ये उल्लेख असलेले आहेत. तीन नावे नवीन आहेत. एक अश्मदुर्ग, म्हणजे बहुधा दगडांनी रचलेला वा दगडातून कोरून काढलेला दुर्ग असावा. दुसरा इष्टिकादुर्ग म्हणजे विटांनी रचलेला दुर्ग व दरूदुर्ग म्हणजे मातीच्या िभतीत बांबूंची व लाकडाच्या भुशाची जोड देऊन तटबंदी बांधलेला दुर्ग. यांपकी दुसऱ्या व तिसऱ्या प्रकारांत बांधलेल्या दुर्गाची बांधकामसामग्री लक्षात घेता, काळाच्या ओघात ती टिकून राहणे कठीण वाटते. मात्र कौशांबी महाजनपदाच्या तटबंदीचा काही भाग भाजलेल्या विटांनी बनविलेला आहे. हा नक्कीच इष्टिकादुर्गाचा प्रकार म्हणता येईल. विजयनगरचे साम्राज्य ज्या काळात ऐन भरात होते, त्या काळात लक्ष्मीधराने ‘दैवज्ञविलास’ व ‘आकाशभरवकल्प’ या दोन ग्रंथांची रचना केली. दैवज्ञविलासात तो म्हणतो :

‘प्रथमं गिरिदरुग च वनदरुग द्वितीयकम्।

तृतीयं गव्हरं दरुग जलदरुग चतुर्थकम्॥

पंचमं कर्दमं दरुग, षष्ठं स्यान्मिश्रकं तथा।

सप्तमं ग्रामदरुग स्यात् कोष्ठदरुग यथाष्टकम्।’

त्याने गिरिदुर्ग, वनदुर्ग, गव्हरदुर्ग (गव्हरांमध्ये – दऱ्यांमध्ये असलेला दुर्ग?), जलदुर्ग, कर्दमदुर्ग  (चिखलाने बांधलेला दुर्ग), मिश्रदुर्ग, ग्रामदुर्ग (बहुधा भूदुर्ग वा गढी) अन् कोष्ठदुर्ग (कोट?) अशी आठ दुर्गाची यादी त्यांच्या योग्यतेच्या क्रमवारीनुसार दिली आहे.

‘आकाशभरवकल्पा’मध्ये तर केवळ गिरिदुर्गाचेच आठ प्रकार सांगितलेले आहेत. यात ‘भद्रदुर्ग’ – उंच पर्वताच्या सपाट माथ्यावर, भरपूर नसíगक पाण्याचे स्रोत असलेला अन् हत्तीवर बसलेला राजासुद्धा निशाणासहित, विनासायास दुर्गावर प्रवेश करू शकावा असे मार्ग असलेला दुर्ग. ‘अतिभद्रदुर्ग’ – ज्या पर्वतावर हा दुर्ग वसला असेल, त्या पर्वताचा माथा सपाट व चौरस वा आयताकृती असावा. ‘चंद्रदुर्ग’ – चंद्राकृती कडय़ाच्या माथ्यावर रचला गेलेला दुर्ग, जो चढून जाण्यास दुर्गम असावा. ‘अर्धचंद्रदुर्ग’ – याचे नावच सूचित करते की, ज्या पर्वतावर हा दुर्ग रचला गेला, त्या पर्वताचा आकार चंद्रकोरीगत असावा. विस्ताराने तो अगदीच लहान नसावा व त्यावर पाण्याचा मुबलक पुरवठा असावा. ‘नाभदुर्ग’- ज्यावर हा दुर्ग उभारला गेला, त्या पर्वताचा पायथा निरुंद तर माथा रूंद असावा. ‘सुनाभदुर्ग’- हा दुर्ग नाभदुर्गाच्या नेमका उलटा, म्हणजे विस्तृत पायथा व निमुळता माथा अशा पर्वतावर रचलेला असावा. ‘रूचिरदुर्ग’- हा दुर्ग पायऱ्यांची वाट असलेल्या व मुबलक पाणी असणाऱ्या पर्वतशिखरावर रचलेला असावा. ‘वर्धमानदुर्ग’- लंबवर्तुळाकार पर्वतमाथ्यावर रचलेला तो म्हणायचा वर्धमानदुर्ग.

ही आहेत काही ठळक अशी अवतरणे. याशिवाय चौदाव्या शतकातलं चांडेश्वराचं ‘राजनीतिरत्नाकर’ व सतराव्या शतकातील अनंतदेवाचं ‘राजधर्मकौस्तुभ’, रघुनाथपंत हणमंत्यांचा ‘राजव्यवहारकोश’, रामचंद्रपंत अमात्यांचं ‘आज्ञापत्र’, श्रीशंभुछत्रपतींनी रचलेलं ‘बुधभूषणम्’ या साऱ्याच मध्ययुगीन साहित्यामध्ये दुर्ग या विषयासंबंधीचा ऊहापोह मोठय़ा सजगतेनं केलेला दिसतो. याशिवाय मानसोल्लास, युक्तिकल्पतरू, समरांगणसूत्रधार, अपराजितपृच्छा, जयपृच्छा, वास्तुराजवल्लभ, वास्तुमंडन, वास्तुमंजिरी या सर्वच वास्तुशास्त्र वा शिल्पशास्त्रविषयक ग्रंथांमध्ये दुर्ग या विषयाच्या विविध पलूंवर प्रकरणे लिहिली गेली.

नारदशिल्पशास्त्रामध्ये दुर्गाचे वनदुर्ग, गिरिदुर्ग, जलदुर्ग, वाहिनीदुर्ग व युद्धदुर्ग असे पाच प्रकार नमूद केले आहेत. मानसारशिल्पशास्त्रामध्ये गिरिदुर्ग, वनदुर्ग, रथदुर्ग, देवदुर्ग, पंकदुर्ग, जलदुर्ग अन् मिश्रदुर्ग असे सात प्रमुख प्रकार नमूद केलेले आहेत. त्यातून त्यांच्या उपयोगानुसार- शिबिर, वाहिनीमुख, स्थानीय, द्रोणक, वर्धक, कोलकनिगम अन् स्कंधावार असे आठ विभाग केलेले आहेत. मयमतामध्ये गिरिदुर्ग, वनदुर्ग, जलदुर्ग, पंकदुर्ग, इरिणदुर्ग, दैवतदुर्ग, मिश्रदुर्ग अशा सात प्रकारच्या दुर्गाचा उल्लेख आहे. मय म्हणतो :

‘गिरिवनजलपंकेरिणदैवतमिश्राणि सप्त दुर्गाणि’

विश्वकर्मा वास्तुशास्त्र बारा प्रकारच्या दुर्गाचे वर्णन करते- गिरिदुर्ग, वनदुर्ग, सलिलदुर्ग, इरिणदुर्ग, दैवतदुर्ग, एकमुखदुर्ग, द्विमुखदुर्ग, चतुर्मुखदुर्ग, कूर्मदुर्ग, पारावतदुर्ग, युद्धदुर्ग व प्रभुदुर्ग असे हे बारा प्रकार.

मुक्तिकल्पतरू दुर्गाचे, अकृत्रिम व कृत्रिम अशा दोन भागांत वर्गीकरण करते व पुढे नदीदुर्ग, जलदुर्ग, गिरिदुर्ग, वनदुर्ग अन् मिश्रदुर्ग असे दुर्गाचे पाच प्रकार नमूद करतो.

शिल्पशास्त्राच्या नियमांप्रमाणे, प्रमुख पाच घटक मिळून दुर्ग निर्मिला जातो. वप्र, प्राकार, परिखा, अट्टालक व गोपुर असे हे पाच घटक. वप्र म्हणजे मातीचा उंचवटा, प्राकार म्हणजे तटबंदी वा िभत, परिखा म्हणजे खंदक, अट्टालक म्हणजे बुरूज व गोपुर म्हणजे प्रवेशद्वारे, याला प्रतोली असे दुसरेही नाव आहे.

या नियमांप्रमाणे प्रथम खंदक खणला जायचा. मग त्यातून उपसलेली माती दुर्गाच्या आतील भागात वप्राच्या निर्मितीसाठी अन् उंचसखल भाग समपातळीत आणण्यासाठी उपयोगात आणली जायची. नद्या, तळी, इत्यादी पाण्याच्या साठय़ाशी खंदक जोडले जायचे. पाणी साचून कुजू नये म्हणून ते खंदक वरचेवर स्वच्छ केले जायचे. त्यात कमळांच्या वेली सोडल्या जायच्या. शत्रूला अडथळा म्हणून मगरीही त्यांत असायच्या. दुर्गाच्या आतील भागात उपयोगी पडणारी झाडे, तर बाहेर काटेरी झुडुप लावली जायची. प्राकार अथवा तटबंदीच्या बाबतीतही गरजेनुसार निकष लावले जायचे. प्राकाराला साल असेही दुसरे नाव होते. साल या शब्दाचा अर्थ पापुद्रा, बाह्य़त्वचा. अन् लौकिकार्थानेही तटबंदी ही दुर्गाची सालच. ती त्याचा बाह्य़ पापुद्रा. यातही विविध प्रकार : महासाल, प्रतिसाल, रक्षासाल अशी त्यांची नावे. ती मुळाशी रुंद व वर वर निमुळती होत गेलेली. निरनिराळ्या शिल्पशास्त्रांत याची निरनिराळी परिमाणे दिलेली आढळतात. यात सर्वात जास्त रुंदी व उंची अगस्त्य वास्तुशास्त्रात दिलेली आढळते. अगस्त्यांच्या मतानुसार बत्तीस हात उंचीचा व अठ्ठावीस हात रुंदीचा प्राकार धरतीवरील राजासाठी सर्वात श्रेष्ठ. हा प्राकार दर सहा हात उंचीनंतर दोन दोन हात कमी करत न्यावा. तर सर्वत्र कमी उंची ‘समरांगणसूत्रधार’ व ‘अपराजितपृच्छा’ या ग्रंथात आठ हात तर सर्वात कमी रुंदी ‘वास्तुमंजरी’ या ग्रंथामध्ये चार हात एवढी दिलेली आहे.

जी गत प्राकाराची तीच अट्टालिका किंवा बुरुजांची. निरनिराळ्या ग्रंथांमध्ये या बुरुजांच्या एकमेकांपासूनची लांबी, त्यांची उंची व रुंदी याची निरनिराळी परिमाणे दिलेली आढळतात. शिल्पशास्त्रावरील ग्रंथांमध्ये याचा उल्लेख बाहू, महाबाहू, कोस्तक, विद्याधरी अन् कर्ण अशाही नावांनी होतो. सरळसोट उभ्या तटबंदीस मजबुती लाभावी व तटबंदीस भिडलेल्या शत्रूस त्याच्या बगलांवर टिपणे सोपे जावे, असा या बुरूज वा अट्टालिकांच्या रचनेमागचा संकेत. निरनिराळ्या ग्रंथांमध्ये दोन बुरुजांमधील अंतरेसुद्धा दिलेली आहेत. कौटिल्याच्या ‘अर्थशास्त्रा’मध्ये तीस हात, ‘समरांगणसूत्रधारा’मध्ये शंभर हात, ‘अपराजितपृच्छा’मध्ये तीस ते चाळीस हात, ‘जयपृच्छा’मध्ये वीस ते बहात्तर हातांपर्यंत, ‘वास्तुराजवल्लभा’मध्ये तीस ते चाळीस हात एवढे अंतर दोन बुरुजांमध्ये असावे असे म्हटले आहे.

‘जयपृच्छा’ या ग्रंथात बुरुजांच्या संख्येनुसार भूदुर्गाची नावे अन् प्रकार आहेत. सहा बुरुजांच्या दुर्गापासून ही जंत्री सुरू होते व चार चार बुरूज वाढवीत जात एकशे शेहेचाळीस बुरुजांच्या दुर्गापर्यंत छत्तीस प्रकारच्या दुर्गाची नावे हा ग्रंथ आपणास सांगतो.

दुर्गाच्या रचनेतला शेवटचा अन् अतिशय महत्त्वाचा भाग म्हणजे त्याचे द्वार. ग्रंथांच्या मते, याचे नाव ‘गोपुर’ अथवा ‘प्रतोली’. दो बाजूंचे स्तंभ व भारपट्टिका हे याचे दोन प्रमुख भाग. यांस अलंकृत करण्यासाठी मग तोरण, निर्यूह, स्तंभिका, मदल, मकरी, शीर्ष, घटपल्लव, भारवाहक, गजव्याळ अशा एका स्तंभाच्या अनेक भागांचे आयोजन करण्यात आले. मूळ दरवाजा खिळ्यांनी युक्त अशा भक्कम लाकडाचा, तर चारही बाजूंचा आधार दगडी, अशा प्रकारची ही बांधकामे असत. या द्वारांमधून खंदकांपार जाण्यासाठी स्थायी किंवा ओढून घेता येणारे पूल असत. थोडय़ाफार फरकाने हीच योजना सर्वच दुर्गाच्या वा तटबंदीयुक्त शहरांच्या बाबतीत वापरली जाई. अपवाद असावा बहुधा गिरिदुर्ग व जलदुर्गाचा.

हे सारं पाहिलं की दुर्गाचे वर्गीकरण, त्यांचे गुणधर्म, त्यांचे उपयोग, त्यांची वैशिष्टय़े टिपताना तत्कालीन मुत्सद्द्यांची व राज्यकर्त्यांची दृष्टी किती विचक्षण होती हे जाणविल्याशिवाय राहत नाही. स्मृतिकर्ता मनू म्हणतो :

‘एक:शतं योधयति प्राकारस्थो धनुर्धर:।

शतं दशसहस्राणि तस्माद्दर्गो विधियते॥

यथा दुर्गाश्रितानेतान्नोपिहसन्ति शत्रव:।

तथाऽरयो न िहसन्ति नृपं दुर्गसमाश्रितम्॥’

अर्थ असा की, ‘तटबंदीच्या आश्रयाला असलेला एक धनुर्धर शत्रूच्या शंभर योद्ध्यांशी लढू शकतो, तर अशा दुर्गाच्या आश्रयाला असलेले शंभर जण दशसहस्र शत्रूंचा विरोध अगदी सहजच करू शकतात. ज्याप्रमाणे दुर्गात आश्रयास असलेल्या श्वापदांस व्याधापासून संरक्षण लाभते, अगदी त्याचप्रमाणे दुर्गाच्या आश्रयास असलेला राजा शत्रूंपासून सुरक्षित असतो.’

मनूस द्रष्टा म्हणतात ते काही उगाच नाही! अन्यथा शिवछत्रपतींच्या उज्ज्वल कर्तृत्वाची नोंद त्यानं इतक्या सहस्रकांपूर्वी कशी बरे नोंदून ठेवली असती?

(लेखकाने प्राचीन भारतीय संस्कृतीया विद्याशाखेत दुर्गशास्त्रया विषयात पीएचडी केली आहे.)

discover.horizon@gmail.com