20 September 2018

News Flash

रेशमी घरटे : अण्णांचं घर!

गिरगावातच त्या वेळच्या २९ हजाराला त्यांनी पागडी पद्धतीची जागा घेतली.

जयंत सावरकर हे घराघरांत परिचित असणारं नाव! त्यांनी साकारलेल्या तळीरामापासून ते अगदी जाडूबाईच्या वडिलांच्या भूमिकेपर्यंत सगळ्याच भूमिका जोरात आहेत. वेगवेगळ्या भूमिका उत्तम साकारणाऱ्या, वयाची ऐंशी र्वष पार करूनही ठणठणीत आणि उत्साही असणाऱ्या अण्णा सावरकरांच्या घरात आज रेशमी घरटेमध्ये डोकावू या!

HOT DEALS
  • Vivo V5s 64 GB Matte Black
    ₹ 13099 MRP ₹ 18990 -31%
    ₹1310 Cashback
  • Moto C Plus 16 GB 2 GB Starry Black
    ₹ 6916 MRP ₹ 7999 -14%

गेल्या काही वर्षांपासून अण्णा ठाण्यात माजिवडय़ाला राहत असले तरी ते मूळचे गिरगावकर. त्यामुळे या सदरासाठी त्यांना भेटायला गेले तेव्हा गिरगावविषयीचं, जुन्या मुंबईविषयीचं प्रेम त्यांच्या बोलण्यात सतत जाणवत होतं. अण्णांनी कलाक्षेत्रात काम करायला सुरुवात केली त्याला आता साठ र्वष उलटून गेलीत. १९५५ मध्ये आकाशवाणीवर नभोनाटय़ात काम करायला त्यांनी सुरुवात केली, तेव्हा त्यांची स्वर-चाचणी पुलंनी घेतली होती! शिवाय नोकरी सांभाळून प्रत्यक्ष रंगभूमीवरही त्यांचं काम सुरू झालं होतं. नाटकाची पॅशन एवढी जबरदस्त होती की एके दिवशी त्यांनी नोकरी सोडून पूर्णवेळ नाटक करायचा निर्णय घेतला. या निर्णयापायी त्यांना राहतं घर सोडावं लागलं. मग गिरगावातच त्या वेळच्या २९ हजाराला त्यांनी पागडी पद्धतीची जागा घेतली. ती बिल्डिंग जुनी होती, मुलांनी कॉट वरून उडी मारली तर फरशी खाली जाईल अशा धोकादायक अवस्थेत ती बिल्डिंग होती. पण तिथून साहित्य संघ जवळ असल्यामुळे अण्णांना ती जागा सोयीची होती. चिकित्सक शाळेजवळ असणाऱ्या त्यांच्या मोहंमदी किंवा मोतीवाला बिल्डिंगमध्ये खूपच घरगुती वातावरण होतं. एका मजल्यावर बावीस बिऱ्हाडं होती आणि मधे मोठा चौक होता. अण्णांचं घर सर्वात वरच्या मजल्यावर असल्यामुळे त्यांच्या घराला पोटमाळा होता. हा पोटमाळा म्हणजे घरातली महत्त्वाची आणि वैशिष्टय़पूर्ण गोष्ट होती. त्या पोटमाळ्याचं त्यांच्याकडे येणाऱ्या-जाणाऱ्यांनाही खूप आकर्षण असे. तेव्हा तिथे राहणाऱ्या सगळ्यांच्या घरांचे दरवाजे दिवसभर उघडे असत. एखाद्या घराचा दरवाजा दिवसा बंद दिसला की नक्कीच काहीतरी बिनसलं आहे असं मानलं जाई. एखादा वेगळा पदार्थ घरात केला की तो मजल्यावरच्या सगळ्यांकडे पाठवला जात असे. सण-समारंभ, लग्नकार्य सगळं एकत्रितपणे साजरं केलं जात असे. कालांतराने अण्णा राहत असलेली बिल्डिंग redevelopment ला गेली. त्या दरम्यान अण्णा कुटुंबीयांसह ठाण्याला राहायला लागले. अण्णांचे सासरे नटवर्य मामा पेंडसे हे ठाण्यात राहत असल्यामुळे ठाण्याशी सावरकर कुटुंबीयांचे वेगळे ऋणानुबंध आहेत. अण्णांच्या मुलांनाही लहानपणी सुट्टय़ांमध्ये ठाण्याला येत, त्यामुळे ठाण्याचा परिसर त्यांच्या परिचयाचा होता. स्वत:च्या जागेत राहण्याचं, मोठय़ा घरात राहण्याचं स्वप्न प्रत्येक माणसाचं असतं. त्यामुळे गिरगावातली नवीन बिल्डिंग पूर्ण झाल्यानंतरही ठाण्यातच माजिवडय़ाला त्यांनी स्वत:चं प्रशस्त असं २ बीएचकेचं घर घेतलं. कर्ज काढून किंवा उधारीत काही करायचं नाही असं त्यांचं तत्त्व असल्यामुळे स्वत:चं मोठं घर, गाडी या गोष्टी आयुष्यात उशिराने त्यांना घेता आल्या. पण आपल्या तत्त्वांशी तडजोड करावी लागली नसल्यामुळे अण्णा समाधानी आहेत.

माजिवडय़ातल्या मोठय़ा घरात सावरकर कुटुंबीयांनी १ ऑगस्ट २०१५ ला राहायला सुरुवात केली. अण्णांचा मुलगा कौस्तुभने लिहिलेला ‘लोकमान्य -एक युगपुरुष’ हा चित्रपट खूपच लोकप्रिय ठरल्याने १ ऑगस्टला त्यांनी नव्या घरात राहायला सुरुवात केली. हे घर छान हवेशीर आणि प्रशस्त आहे. खूप इंटिरियर न करता उपयुक्त आणि साधीसुधी सजावट असल्यामुळे त्यांच्या घराला घरपण आहे. या सोसायटीतही सगळे सण-उत्सव इथले रहिवासी एकत्रितपणे साजरे करतात. शिवाय सोसायटी मोठी असल्यामुळे खाली भरपूर मोकळी जागाही आहे. अण्णांच्या घराच्या सगळ्या खोल्यांना फ्लॉवरबेड्स आहेत. हॉलमधली बाल्कनी ही सगळ्या कुटुंबीयांनी सकाळी आरामात बसून चहा पिण्याची, गप्पाटप्पा करण्याची त्यांची आवडती जागा आहे. तिथून बाहेर नजर टाकली की झाडं दिसतात, आकाश दिसतं. मोकळी स्वच्छ हवा आणि बऱ्यापैकी शांतताही अनुभवायला मिळते! तिथे बसल्यावर जवळचं पुस्तकांचं कपाट आणि हॉलमधल्या भिंतीवरच्या शो-केसमधले अण्णांचे पुरस्कार लक्ष वेधून घेतात. नव्या जागेत राहायला आल्यावर घराचा दरवाजा लावणं किंवा बेल वाजल्यावर दार उघडायला हातातलं काम टाकून यावं लागणं अशा गोष्टी घरच्या सगळ्यांना अंगवळणी पाडून घ्याव्या लागल्या.

गिरगावातलं घर, तिथलं वातावरण, आपुलकी या सगळ्या गोष्टी अण्णा आजही मिस करतात, पण त्याच जोडीला पाìकगसह दोन बेडरूम्सचा स्वत:च्या मालकीचा फ्लॅट घेतल्याचा, मोठय़ा घरात राहण्याचं स्वप्न पूर्ण झाल्याचा आनंदही मानतात!

anjalicoolkarni@gmail.com

First Published on February 17, 2018 12:14 am

Web Title: article on jayant sawarkar house actor jayant sawarkar