कविता भालेराव

‘‘ए,जरा उठून एसी सुरू कर ना, बघ की रिमोट कुठे ठेवलाय. नाही ना सापडत. मघाशी मी उठलो होतो.’’ अशा प्रकारचे संवाद आपल्याला रोज घरात ऐकायला मिळतात. ऑनलाइन बुकिंग करणारे आपण रिमोटसाठी उठतो. रिमोट लांब आणि फोन मात्र जवळ,असेच असते ना! आजच्या स्मार्ट फोनच्या काळात सगळीकडे संगणकीय वातावरण असताना मात्र काही बाबतीत मागेच असतो. स्मार्ट टी.व्ही., स्मार्ट फोन या सगळ्या काळात आपण ‘स्मार्ट होम’चाही विचार केला पाहिजे.

आता स्मार्ट होम म्हणजे नेमकं काय? स्मार्ट होम म्हणजे आपले घर तांत्रिकदृष्ट्या परिपूर्ण असणे. थोडक्यात काय, तर आपल्या घरातील लाइट, टी .व्ही., ए.सी. हे आपण आपल्या फोनने किंवा कॉम्पुटर, टॅबलेटद्वारे ऑपरेट करणे. यात फार काही अवघड नाहीये बरं का! पण स्मार्ट होमचा पर्याय स्वीकारताना त्याबाबतची पूर्ण माहिती करून घेणे आवश्यक आहे. या प्रणालीला ‘होम ऑटोमेशन’ असे संबोधले जाते. आपले इंटिरियरचे काम सुरू  असतानाच हे केले तर फारच छान. आपल्याकडे फर्निचर आहेच. किंवा इंटिरियर  झाले असले तरीही हे करता येते, पण त्यासाठी थोडे बदल हे करावेच लागतात. काही इलेक्ट्रिकल पॉइंट काढावे लागतात आणि ठरावीकच कंपन्या हे काम करतात. पण जर का काम सुरू करायचे असेल तर मात्र तुमच्या बजेटमध्ये थोडी भर घालून तुम्ही होम ऑटोमेशन नक्की करू शकता. आता आपण बघू होम ऑटोमेशन म्हणजे नक्की काय? तर एका सिंगल कंट्रोलवर तुमच्या घराचे लाइट सुरू होणार व बंदही होणार. टी.व्ही., ए .सी. एकाच वेळी बसल्या जागेवरून न उठता ऑपरेट करू शकतो. पडदेही उघडू किंवा बंद करू शकतो, तेही न उठता. सगळी जादूची दुनिया करू शकतो..

. लायटिंग- होम ऑटोमेशनमधील सर्वात प्रसिद्ध आणि उपयुक्त संकल्पना म्हणजे लायटिंग. तुम्ही फक्त लाइट एका रिमोटने ऑपरेट करणे एवढय़ापुरते हे नाहीये; तर तुम्ही हे फंक्शन पर्सनलाइज्डही करू शकता. मात्र यासाठी व्यवस्थित नियोजन लागते. तुम्ही लाइटचे सगळे कंट्रोल घरच्या एका भागात घ्या. जरुरी नाहीये की तुम्ही सतत उठून जा किंवा जिने चढ-उतार करत लाइट ऑपरेट करा. ते तुम्ही तुमच्या जागेवरूनच ऑपरेट करू शकता. याशिवाय तुम्हाला रात्री कोणता दिवा हवाय, किती वेळ हवाय, याशिवाय संध्याकाळी दिवेलागणीला नक्की कुठले दिवे, किती वाजता सुरू झाले पाहिजेत याचे सेटिंगही करू शकता. आणि हो, हे सगळे तुम्ही बाहेरगावाहूनही ऑपरेट करू शकता. असे बरेच महत्त्वाचे फंक्शन्स आहेत ते प्रत्येक कंपनीप्रमाणे आणि तुम्ही कोणत्या पद्धतीची सिस्टिम घेणार त्यावर अवलंबून असते.

.  ए. सी.- ए. सी. साठीही आपल्याला वेळ निश्चित करावी लागते. जसे- आपण ऑफिसमधून घरी जर ८ ला येत असू तर सेटिंग अशा पद्धतीने करायचे की घरात आल्यावर आपल्याला गार हेवेचा आनंद घेता येईल. आणि जर का कधी उशीर होणार असेल, तर आपण आपल्या कामाच्या ठिकाणाहूनसुद्धा त्याचे सेटिंग बदलू शकतो.

. पडदे- पडदेही जर ऑटोमेशनवर टाकले तर छानच आहे. त्याचीही वेळ आपण सेट करू शकतो किंवा हवे तेव्हा आपण ते उघडू शकतो, पाहिजे तेवढीच खिडकीची काच आवश्यकतेप्रमाणे उघडी ठेवू शकतो.

४. इलेक्ट्रिकल वस्तू- काही कंपन्या तर आपले वॉशिंग मशीन, कॉफी मशीन आणि अजून काही ंस्र्’्रील्ल२ी२ आपल्याला ऑटोमेशन प्रणालीखाली वापरायचे फंक्शन्स देतात.

हे सगळे अगदी स्वप्नवत वाटते, पण आपण हे प्रत्यक्षात आणू शकतो. आता आपण जरा सुरक्षिततेकडे वळू. होम ऑटोमेशन हे अगदी सुरक्षित असते. जर का उत्तम आणि  व्यवस्थित कंपनीचे असेल तर काही प्रश्नच नाही. स्मोक डिटेक्टर किंवा फायर अलार्म यांच्यापेक्षाही पुढच्या तंत्राने त्यांनी हे सगळे इंटरकनेक्ट केलेले असते, त्यामुळे यदाकदाचित काही जर का समस्या उद्भवली तर ही प्रणाली बंद होऊन तुम्हाला मेसेज येतो, अलार्म वाजतो. त्याचे इन्स्टॉलेशनही कंपनीकडून झालेले असते, त्यामुळे त्यांनी या सगळ्याची काळजी घेतलेली असते.

याशिवाय याचा फार मेंटेनन्सही नसतो. पण वाय-फाय मात्र उत्तम हवे. ए .सी. ला थोडा मेंटेनन्स लागतो, पण तोही फार नाही. पण वायरिंग मात्र उत्तम इलेक्ट्रिशियनकडूनच करून घ्यायचे. आजकाल होम ऑटोमेशन सिस्टीमचे आप्लिकेशन फोन, आयपॅड यावर टाकून हे सगळे फंक्शन एका खोलीत बसूनही ऑपरेट करू शकतो याशिवाय त्यावर कोणते लाइट सुरू आहेत हेही दिसत असते. कुठल्या रूमचे पडदे बंद आहेत असे सगळेच आपल्याला बसल्याजागी करता येते. त्यामुळे आपण सगळ्या घराचा कंट्रोल या अप्लिकेशनद्वारे ठरवून ते मस्त ऑपरेट करू शकतो. तसेच घरातील ज्येष्ठ व्यक्तीही याचा वापर सहज करू शकतात. त्यांना तर हे तंत्रज्ञान फारच उपयुक्त आहे. कधी कधी लहान मुले वाचत वाचत झोपून जातात आणि जर का हे उशिरा लक्षात आले तर उठून जाऊन लाइट बंद करायची गरज नाही ते मोबाइलवरूनच ते बंद करू शकतो.

kavitab6@gmail.com