मागे वाहिन्यांवर राशिभविष्यावर आधारित एक कार्यक्रम लागत असे. ज्यामध्ये एका विशिष्ट राशीचे लोक कसे घराबाहेर पडताना परत येऊन येऊन दरवाजाचे कुलूप नीट लागले आहे अथवा नाही हा किस्सा ते सादरकर्ते अतिशय रंगवून सांगत. तो किस्सा कितीही वेळा ऐकला तरी प्रत्येक वेळी हसून पुरेवाट होत असे. यातला गमतीचा भाग जरा बाजूला ठेवला तर आपल्या घराची सुरक्षा हा प्रत्येकाच्याच जिव्हाळ्याचा विषय; मग त्यासाठी आपली रास कोणती का असेना, त्याने काहीच फरक पडत नाही.

मागच्या लेखात जेव्हा आपण मुख्य प्रवेशद्वाराचा विचार केला तेव्हा त्याचं दिसणं, रंगरूप यावर जोर दिला होता. त्या वेळी दरवाजाच्या सुरक्षेवर मुद्दामच भाष्य करणं मी टाळलं होतं, कारण दरवाजाची सुरक्षा ही येताजाता एकदोन वाक्यांत बोलण्याची गोष्ट नक्कीच नाही.

moong dal scrub for glowing skin
Skin Care Tips: मुग डाळीचा असा वापर कराल तर खऱ्या वयापेक्षा दिसाल लहान व तरुण; सुरकुत्या, पिंपल्सही होतील दूर!
Loksatta chaturang Think rationally disbelief restless
इतिश्री: भावनेवर तर्कशुद्ध मात!
Which yoga asanas can help you burn calories faster? Yoga for weight loss
Weight Loss Yoga: पोट, कंबर व हातांवरील अतिरिक्त चरबी घटवण्यासाठी करा ‘ही’ आसने! चेहऱ्यावरही येईल ग्लो
wife
पत्नीने तक्रार दाखल करणे क्रुरता नाही…

दरवाजाच्या सुरक्षेचा विचार करताना निरनिराळ्या अनेक गोष्टी विचारात घ्याव्या लागतील. जसं की, दरवाजाची फ्रेम कशी असावी? त्याची जाडी, त्याचे दाते.. या झाल्या लहानसहान एरवी लक्षातही न येणाऱ्या बाबी, पण तितक्याच महत्त्वाच्या. त्यानंतर दरवाजाच्या सुरक्षेत अत्यंत महत्त्वाची भूमिका निभावणारा प्रति मुख्य दरवाजाच- म्हणजेच सेफ्टी दरवाजा. हा फक्त घर सुरक्षेचंच काम करत नाही तर मुख्य दरवाजाचे सौंदर्य खुलविण्याचीही जबाबदारी आपण बिनदिक्कत याच्यावर टाकू शकतो. त्यानंतर घर सुरक्षेतील काही आधुनिक तर काही पारंपरिक शिलेदार- ज्यांच्याविना घर सुरक्षित होऊच शकत नाही. उदा. कडी, कोयंडे, कुलूप, लॅच, डेड लॉक तसेच व्हिडीओ डोअर फोन, सीसी टीव्ही कॅमेरा, डोअर अलार्म, इ.

बघता बघता बरीच मोठी यादी झाली नं तयार! तर सुरुवात करू दरवाजाच्या फ्रेमपासून. मुख्य दरवाजाची फ्रेम घेताना ती उत्तम प्रतीच्या लाकडापासून बनलेली आहे याची खात्री करून घ्यावी. यानंतर फ्रेम बनवतानाही ती लोखंडी होल्डफास्टच्या साहाय्याने भिंतीत बसवणे गरजेचे, तरच तिला अपेक्षित मजबुती मिळू शकेल. या फ्रेमचे दातेदेखील महत्त्वाचे, कारण दरवाजा इथेच येऊन थांबणार असतो आणि लॉकदेखील होतो. त्यामुळे दरवाजा आणि दाते एकमेकांत व्यवस्थित बसले तरच दरवाजाला भक्कमपणा मिळतो.

आता थोडं मूळ दरवाजाकडे वळूयात. बाजारात तयार फ्लश दरवाजे विकत मिळतात. हल्ली हे सर्रास वापरले जातात. फ्लश दरवाजे ब्लॉक बोर्डपासून बनवले जातात. हे दरवाजे घेताना ते चांगल्या प्रतीचे आणि पूर्ण भरीव आहेत याची खात्री करून घ्यावेत. बाजारात पाईनच्या लाकडाच्या ब्लॉक बोर्डला जास्त पसंती दिली जाते. मुख्य दरवाजासाठी ३५ मी. मी. ते ४० मी. मी. जाडीपर्यंत ब्लॉक बोर्ड चालू शकते.

आता थोडं सेफ्टी दरवाजाविषयी बोलू. घराच्या सुरक्षेतील हा महत्त्वाचा घटक. मुख्य दरवाजाच्याही बाहेर, बाहेरील बाजूस उघडणारा हा दरवाजा आपल्या आवडीप्रमाणे आपण बनवून घेऊ शकतो. झटपट तरीही मजबूत, शिवाय कमी खर्चातदेखील सेफ्टी दरवाजे बनतात. बाजारात सेफ्टी दरवाजांसाठी तयार लोखंडी किंवा स्टीलच्या जाळ्या मिळतात. त्यातील आपल्या आवडीप्रमाणे डिझाइन आणि साइझ घ्यावी आणि तयार फ्लश दरवाजा तिच्या साइझप्रमाणे कापून त्यात ती बसवली की सेफ्टी दरवाजा तयार! पण विषय इंटेरिअर डिझाइनशी निगडित असल्याने अगदीच सौंदर्यदृष्टी बाजूला ठेवून मी नाही विचार करू शकत. त्यामुळे तयार जाळी घेण्यापेक्षा आपल्या आवडीच्या डिझाइनप्रमाणे बनवून घेतलेली जाळी कधीही जास्त भाव खाऊन जाईल. शिवाय नेहमीच ही जाळी फ्लश दरवाजामध्ये बसवणे गरजेचे नाही. लोखंडाच्याच फ्रेममध्ये केलेला संपूर्ण जाळीचा दरवाजाही छान दिसतो आणि त्यातून मुख्य दरवाजाच्या डिझाइनचेही दर्शन होते. अर्थात अशा प्रकारे जाळीदार सेफ्टी दरवाजे बनवताना त्याच्या सळयांची जाडी, दोन सळयांमधील योग्य अंतर यांचा अभ्यास करूनच तो बनवणे सुरक्षित, खेरीज दरवाजाचे लॉक लावताना तिथपर्यंत चोराचे हात पोहोचणार नाहीत याचीही खातरजमा करून घ्यावी.

आता लॅच, लॉक, इ.चा विचार करायला हरकत नाही. दरवाजाच्या सुरक्षेचा विचार करत असताना आपण घरात असतानाची सुरक्षा आणि आपण घराबाहेर असतानाची घराची सुरक्षा अशा दोन्ही बाबींचा विचार व्हायला हवा. आज बाजारात घर सुरक्षेची एक ना अनेक उपकरणे उपलब्ध आहेत. अगदी सेफ्टी दरवाजा नसला तरी चालेल इतपत. पारंपरिक पद्धतीमध्ये लॅच किंवा डेडलॉक एवढे असले की घर सुरक्षित, पण लॅच हे फार प्राथमिक स्तरावरचे लॉक झाले. लॅचकडे सुरक्षिततेच्या  दृष्टिकोनातून पाहण्यापेक्षा दरवाजा दात्यांमध्ये योग्य प्रकारे बसवणारे उपकरण म्हणून पाहिल्यास जास्त योग्य ठरेल. घराची खरी सुरक्षा होते ती डेडलॉकमुळे. डेडलॉक हे बाहेरील बाजूने फक्त किल्लीने आणि आतील बाजूने किल्लीने किंवा त्याला आतून बसवलेल्या नॉबच्या साहाय्याने उघडता येते. डेडलॉक घेताना ते किती लिव्हरचे आहे हे पाहून घ्यावे. सिंगल लिव्हर शक्यतो टाळावेच, कारण हे लॉक चोरांना सहज उघडता येते. जितके जास्त लिव्हर तितके लॉक महाग, पण तितकेच सुरक्षितदेखील!

बऱ्याच वेळा दरवाजाचे सौंदर्य जपण्याच्या हेतूने मॉर्टाइस प्रकारचे लॉक जास्त पसंत केले जातात. मॉर्टाइस लॉक म्हणजे दरवाजा आतून पोकळ करून त्यात बसवण्याचे लॉक. यामुळे मागून पुढून दरवाजा छान प्लेन दिसतो, पण मजबुतीचं म्हणाल तर दरवाजाच्या आतील बाजूने वरून बसवण्याचे लॉकच उत्तम.

कॅमेरा बसवण्याचा पर्याय जास्त सोयीस्कर. सीसीटीव्ही कॅमेरा २४ x ७  रेकॉर्डिग करू शकतो, तसेच आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने सीसीटीव्हीचे थेट प्रक्षेपण आपण आपल्या स्मार्ट फोनवरही पाहू शकतो. म्हणजे आपल्या गैरहजेरीतही आपल्या घराकडे लक्ष ठेवणे कित्ती सोपे.

अर्थात या पारंपरिक आणि आधुनिक साधनांचा उपयोग करून आपण आपले घर अगदी सहज सुरक्षित ठेवू शकतो, पण शेवटी इतकंच सांगावंस वाटतं की सुरक्षेच्या या सर्व उपकरणांचा वापर सजगपणे करावा. त्यामागे केवळ आधुनिकतेच्या प्रदर्शनाचा सोस नको. तसेच निव्वळ  सौंदर्य जपण्याच्या नादात सुरक्षेला छेद जाईल असे कोणतेही डिझाइन वापरू नये. कारण सौंदर्य जितके महत्त्वाचे त्याहून कितीतरी अधिक पटींनी घराची सुरक्षा महत्त्वाची!

(लेखिका इंटिरियर डिझायनर आहेत.)

ginteriors01@gmail.com