संपदा वागळे

एकटं राहणाऱ्या ऐंशीच्या घरातील माणसाचं घर म्हटल्यावर नकळत एक चित्र डोळ्यासमोर उभं राहतं- रंग उडालेल्या भिंती.. पडल्या पडल्या टी. व्ही. बघता येईल अशा तऱ्हेने बाहेरच्या खोलीतच ठेवलेली लोखंडी कॉट. शेजारी एक स्टूल, त्यावर तांब्या-भांडं. भिंतीला लागून एक स्टीलचं कपाट.. वगैरे वगैरे. या थकल्याभागल्या मानसचित्राला संपूर्ण छेद देणारं एक चिरतरुण घर मी अलीकडेच पाहिलं. त्या तरुण ताज्या घराकडे पाहताना मनात मंगेश पाडगावकरांच्या ओळी जाग्या झाल्या –

तरुण असलो की तरुण असतं म्हातारपण

रडत बसलो की करुण असतं म्हातारपण

रामदास पाध्ये (बोलक्या बाहुल्यावाले नव्हेत) यांचं  ठाण्यातील एल. बी. एस. मार्गावरील ‘शिल्प रेसिडन्सी’ सोसायटीमधील घर पाहताना प्रवेशद्वारापासूनच आपलं ‘अगंबाई, अरेच्चा’ सुरू होतं. दारालगत वर चढत जाणाऱ्या जिन्याच्या भिंतीवर त्याच दिशेने लावलेल्या चार फ्रेम्सपासूनच घराच्या वेगळेपणाला सुरुवात होते.

आत पाऊल टाकताच पहिल्या दृष्टिक्षेपात जाणवते ती घरमालकाची सौंदर्यदृष्टी आणि टापटीप. संपूर्ण हॉलमध्ये ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाइट रंगसंगती. सर्व भिंती पांढऱ्या शुभ्र रंगाने न्हालेल्या, पण खिडकीलगतच्या एका भिंतीचा काही भाग मात्र काळा. त्यावर पुसटसं सेल्फ डिझाइन. हे वर्णन वाचताना चमत्कारिक वाटू शकतं, पण प्रत्यक्ष बघायला लोभसवाणं. इलेक्ट्रिकची बटणंही एक सफेद, एक ग्रे अशा प्रकारे झोकात बसलेली. झालंच तर क्रीम कलरचा गुबगुबीत सोफा, काळ्या रंगाच्या लॅमिनेशनने नटलेलं टी. व्ही. युनिट, खिडकीचे बांबूचे पडदे पाहून प्रश्न निसटलाच.. ‘नव्याने सजवलंत वाटतं घर?’ यावर पाध्ये काकांचं उत्तर, ‘नाही हो, हा सोफा आणि हे युनिट २५ वर्ष जुनं आहे. डाळ्यांना बरं वाटावं म्हणून मी आतला गाभा तोच ठेवून वर प्लॅस्टिक सर्जरी करत राहतो एवढंच..’

पाध्येकाका हे गृह सजावटीतील प्लॅस्टिक सर्जनच आहेत. कमर्शियल आर्टिस्ट म्हणून नोकरी करत असतानाही त्यांनी आवड म्हणून अनेक घरांचं रूप बदललंय.

भिंतींवर ठिकठिकाणी विराजमान झालेल्या वैशिष्टय़पूर्ण फ्रेम्स हे या घराचं एक सौंदर्यस्थळ. सोफ्याच्या पाठचं ‘मिळून साऱ्याजणी’ हे चित्र तर खासच. (हे नामकरण त्यांचे जावई मिलिंद जोशी यांनी केलंय.) चित्रात डोक्यावर हॅट आणि पूर्ण लांब ड्रेस.. अशा उंच शिडशिडीत आठ स्त्रिया. म्हटलं तर चित्राला एक धूसर डूब आहे, तरीही एक तजेला आहे. चित्राचं बलस्थान म्हणजे सर्वजणींचे बोलके चेहरे. नाक, कान, डोळे न रंगवताही प्रत्येक चेहरा बोलतोय आणि वेगळा भासतोय. सगळ्याजणींचा मिळून एक छान ग्रूप झालाय, एकजिनसी आणि समरस. (अर्थात हे सर्व पाध्येकाकांच्या नजरेतून पाहिल्यावरच उमजतं.) पुढची गोष्टही ऐकण्यासारखी. मी विचारलं, ‘कुठे मिळालं हे चित्र?’ तर म्हणाले, ‘नेटवर सापडलं’.  त्याची रंगीत झेरॉक्स काढली आणि त्यावर सूर्यकिरण परावर्तित न करणारी काच (नॉन रिफ्लेक्टिंग) बसवून हवी तशी फ्रेम करून घेतली.

या ‘हवी तशी’मध्ये फार मोठा अर्थ भरलेला आहे. कारण फक्त चित्र सुंदर असून भागत नाही, त्याला कोणतं अंगडं – टोपडं घातलंय यावर त्याचं रूप खुलतं, या विधानाची प्रचीती पाध्यांच्या घरातील जागोजागच्या फ्रेम्स बघताना येते. या आठवणींशेजारी काही अंतरावर एकाखाली एक अशा चार फ्रेम्स लावल्या आहेत. त्यांचीही कथा तोंडात बोटं घालायला लावणारी. भेट म्हणून मिळालेल्या एका सुंदर कॅलेंडरचे स्वतंत्र भारतातील असे चार तुकडे कापून या फ्रेम्स बनवल्यात हे ऐकल्यावर माझ्या डोळ्यांसमोर कुठे लावणार.. म्हणून याला त्याला देऊन टाकलेल्या कॅलेंडरच्या गुंडाळ्या आल्या आणि घशात आवंढा दाटला.

मिसेस पाध्ये यांचा येताजाता दिसावा अशा प्रकारे लावलेला तरुणपणीचा हसरा फोटोही कवी ग. दि. मा. यांच्या ‘एका तळ्यात होती..’ या कवितेसह विराजमान झालाय. मी त्यांच्याकडे गेले तो दिवस नेमका पाध्ये वहिनींचा जन्मदिन असल्याने फोटोखाली एक घमघमता पुष्पगुच्छ.. त्यांच्या आठवणी सुगंधित करणारा.

पत्नीची साथ १५ वर्षांपूर्वी सुटली असली तरी ती घरातच आहे अशी पाध्येकाकांची मनोधारणा आहे. बेडरूमच्या वॉर्डरोबमधील एक विभागही तिच्या साडय़ा, ब्लाउज आणि इतर वस्तू पोटात घेऊन होता तस्साच उभा आहे. डबल बेडवरही उशा मांडलेल्या की जणू दोन व्यक्ती झोपताहेत.

या घरातली आजच्या जमान्यातील एक दुर्मीळ चीज म्हणजे रेकॉर्ड प्लेअर आणि अर्थातच खूप साऱ्या रेकॉर्ड्स श्रवणानंदात व्यत्यय नको म्हणून विस्मृतीच्या वाटेवरील या वाद्याचा त्यांनी डॉक्टरही शोधून ठेवलाय. पाध्येकाकांना शास्त्रीय संगीतापासून पाश्चात्त्य म्यूझिकपर्यंत सगळ्यांची आवड आहे. त्यासाठी हॉलमध्ये रेकॉर्ड प्लेअर आणि बेडरूममध्ये डी. व्ही. डी. अशी चोख व्यवस्था.

त्यांना भ्रमंतीचीही आवड आहे. विशेषत: दक्षिण मुंबईत चोरबाजार ते पेडररोड भटकताना त्यांनी हटके चिजा जमवल्या आहेत. इंग्रजांच्या काळातील गाडीचं (हेरिटेज कार) मॉडेल, गॅलरीच्या भिंतीवर विराजमान झालेले यक्ष-किन्नर (मुखवटे) एवढंच नव्हे तर नेपाळहून आणलेली कुकरी.. असं बरंच काही.

घराचं किचन लहानसं, पण अद्ययावत. मिक्सर ते मायक्रोवेव्ह सगळी साधनं वापरातली. घरात टांगलेले कपडे कुठेही दिसले नाहीत, अगदी वाळत घातलेलेसुद्धा. विचारल्यावर कळलं की त्यांच्यासाठी खास व्यवस्था केलीय. पॅसेजमध्ये उंचावर लावलेल्या दांडय़ांच्या खाली मागे – पुढे करता येणारी लाकडी सीलिंग त्यामुळे पसारा नावाची चीज घरात नाही.

आईच्या जन्मदिनानिमित्त आलेली पाध्येकाकांची मोठी मुलगी वीणा म्हणाली, ‘आमचे बाबा नेहमीच काळाच्या पुढे होते. माझ्या लहानपणी आम्ही डोंबिवलीत राहायचो त्या काळी / म्हणजे घरी जाताना शेताच्या बांधावरून जावं लागत असे तेव्हाही बाबांनी आमच्या घराच्या छताला पिवळा आणि दाराला लाल रंग दिला होता. पेपरलवाला, दूधवाला, पोस्टमन.. हे सगळे आम्हाला लाल दारवाले पाध्ये म्हणून ओळखत.

पाध्येकाकांची रसिकता बाथरूममध्येही बघायला मिळते. तिथल्या खिडकीच्या कट्टय़ावर विविध आकारांच्या सुंदर सुंदर बाटल्या सूर्यप्रकाशात चमकत होत्या. वीणा म्हणाली, ‘‘आमच्या बाबांना दुसरं कसलं व्यसन नाही, पण रिकाम्या झालेल्या कसल्या ना कसल्या आकर्षक बाटल्या जमा करायचं वेड आहे. त्यात पाणी भरून रंगीबेरंगी द्रावणाचे दोन-चार थेंब टाकले की खिडकीतून येणारे किरण त्यांना झगमगून टाकतात. अशा प्रकारे बाबांचं बाथरूम हेदेखील एक प्रेक्षणीय स्थळ बनलंय. खरंच, वन बेडरूम किचनच्या या छोटय़ाशा घरात टकामका बघत राहावं अशी अनेक स्थळं आहेत. बेडरूममधील लाकडी कपाटातही स्पीकर्स असे बसवलेत की सांगितल्यावरच कळावं. टेबल लॅम्पमधून रूपांतर होऊन बाहेरच्या टीपॉयवर बैठक जमवलेल्या ठेंगण्या – ठुसक्या बाटलीचीही तीच कथा.

या घरात फिरताना राहून राहून जाणवणारी गोष्ट म्हणजे कमालीचा नीटनेटकेपणा.. सर्वत्र एखाद्या गृहकृत्यदक्ष बाईचा हात फिरत असल्यासारखी स्वच्छता. (बाराही महिने हे घर असं टकाटक असतं ही छुपी बातमी) पलंगावर छानसा बेडस्प्रेड. (तेही चार-पाच आहेत म्हणे.. अदलून बदलून घालण्यासाठी) आतली चादर व्यवस्थित, ताठ खोचता यावी म्हणून तिच्या चार कोपऱ्यांना इलॅस्टिक लावून घेतलेलं. टी.व्ही.चा रिमोट हात घातल्याक्षणी मिळावा म्हणून सोफ्याच्या बाहेरील बाजूस सॉकेट लावून अडकवलेला कुठल्याही तारखेचा पेपर क्षणार्धात काढता येईल अशा प्रकारे रचलेली रद्दी. सोफ्यावर विशिष्ट कोनात ठेवलेल्या उशा.. हे सर्व बघताना पाध्येकाकांच्या एकटेपणातही आनंदात जगण्यामागचं गुपित उलगडतं.

म्हणूनच आज त्यांचं वय जरी अठ्ठय़ाहत्तर असलं तरी त्यांच्या घराचं वय अठराच आहे आणि कायम तेवढंच राहील, त्यांच्या मनाप्रमाणं!

waglesampada@gmail.com