25 March 2019

News Flash

दिवाळीनिमित्त कलाकारांनी सांगितल्या घरातील आनंददायी आठवणी

पूर्ण नीट मेंदी नाही काढता आली तरी सुरुवात तरी करून देतो. मग त्याही आमच्या हातावर मेंदी काढतात.

दिवाळी म्हणजे दिव्यांचा सण. रोजच्या नोकरीतून दगदगीतून जसा आपल्याला विरंगुळा, वेगळेपण हवं असतं तसं ते कलाकारांनाही हवंच असतं. दोस्त, नातेवाईकांना भेटण्यातून पडणारा आनंदाचा प्रकाश सर्वानाच हवाहवासा असतो. आपल्या आवडत्या मालिकांमधल्या लाडक्या कलाकारांनाही दिवाळीच्या निमित्ताने हा घरगुती माहौल खुणावतो आहे. दिवाळीनिमित्त या कलाकारांनी सांगितलेल्या घरातील या आनंददायी आठवणी खास ‘वास्तुरंग’च्या वाचकांसाठी!

आजोळची स्मरणीय दिवाळी

माझ्साठी दिवाळी हा सण नसून एक सुंदर अनुभव असतो. मी छोटय़ा कुटुंबात लहानाचा मोठा झालो आहे. लहानपणी दिवाळीच्या सुटय़ांमध्ये खूप धमाल करायचो. सुट्टया म्हणजे मजेशीर अनुभवांची पोतडीच! त्यातही दिवाळी म्हणजे थंडीचे दिवस आणि मला ते खूप आवडतात. पुण्याला आजोळच्या घरी गेल्यावर तिथे मामा-मावशा भेटायचे. माझ्यासाठी दिवाळी म्हणजे संपूर्ण कुटुंबाने एकत्र येणं. कधी आजी आणि घरचे सगळे परभणीला यायचे, कधी आम्ही पुण्याला जायचो. आजीच्या हातचे अनारसे मला खूप आवडतात. तसंच पाटोदा लाडू मला खूप आवडतो. पाटोदा हे बीड जिल्ह्यातील एक गाव आहे. आमची आजी आधी बीडला राहायची, हा बेसनच्या लाडवाचाच एक प्रकार ती तिथे शिकली. त्यामुळे त्या लाडूच्या प्रकाराला पाटोदा लाडू हे नाव पडलं. हा लाडवाचा प्रकार कुठल्याच मिठाईच्या दुकानात आजपर्यंत मी बघितला नाही. या लाडवांविषयी बोलतानाही माझ्या तोंडाला पाणी सुटतंय.

गेली दोन वर्ष ‘विठुमाऊली’ मालिकेच्या चित्रीकरणामुळे मी मुंबईत राहायला आलो आहे. त्यामुळे गावी जाणं झालं नाहीय. पण यावर्षी मी दिवाळीत परभणीला जाणार आहे. त्यामुळे दोन-तीन दिवस खूप धमाल करणार आहे. दिवाळीत आम्ही एकत्र धमाल करताना एक गोष्ट करतो. ती म्हणजे, घरचे सगळे पुरुष मिळून घरातल्या स्त्रियांच्या- आजी, आई, बहीण, काकू अशा सगळ्यांच्या हातावर मेंदी काढतो.

पूर्ण नीट मेंदी नाही काढता आली तरी सुरुवात तरी करून देतो. मग त्याही आमच्या हातावर मेंदी काढतात. त्यामुळे एकमेकांच्या हातावर मेंदी काढण्याची रीत घरात अजूनही आहे.

अजिंक्य राऊत (विठु माऊली)

दिवाळीचा आनंद एकत्र येण्यातच!

माझे दादा-वहिनी पुण्याला असतात. आई-बाबा नाशिकला असतात. मी आणि माझी पत्नी गिरिजा ठाण्यात राहतो. त्यामुळे आम्हा सगळ्यांना एकमेकांचा सहवास फार कमी लाभतो. त्यामुळे आम्ही सहसा सगळे मुख्य सण आमच्या नाशिकच्याच घरी साजरे करतो. ठरवून सगळे सुट्टी घेऊन एकत्र येतो. त्यानिमित्ताने भेटीगाठी होतात, समाजमाध्यमांमुळे संवाद साधत असलो तरी प्रत्यक्ष एकमेकांना भेटायला नेहमीच भारी वाटतं. आम्ही दिवाळीत फटाके कधीच फोडत नाही. आणि इतरांनाही सांगतो की फटाके फोडू नका. आम्ही घरीच फराळ बनवतो. आमच्याकडे फक्त स्त्रियाच नाही तर पुरुष मंडळीही तितक्याच हिरिरीने फराळ तयार करण्यास मदत करतात. यावेळी एकमेकांसोबत राहून सुख-दु:खांची, आचार-विचारांची देवाणघेवाण होते, ती महत्त्वाची वाटते. घरातले सगळे माझी मालिका बघतात, त्यावर प्रतिक्रिया देतात. मी शेंडेफळ असल्यामुळे मलाच बकरा बनवतात. आणि मीही त्याचा आनंद पुरेपूर घेतो.

चिन्मय उदगीरकर (घाडगे अँड सून)

नाशिकच्या घरची पारंपरिक दिवाळी 

आमच्या नाशिकच्या घरी अगदी साग्रसंगीत दिवाळी साजरी होते. वसुबारसपासून लगबग सुरू होते. आजीच्या घरी बालपण गेल्यामुळे गाईची पूजा, गायीला नैवेद्य देणं असं सगळं नीट सगंतवार व्हायचं. मग दारासमोर गेरू लावून रांगोळीसाठी जागा करणं ते एकीकडे रांगोळीचे रंग खरेदी, आकाश कंदील- कपडय़ांची खरेदी होत असते. दिवाळीतली रोषणाई, मातीचे दिवे, अभ्यंग, उटणं, रांगोळीचे रंग, घरभर पसरलेला प्रकाश असं सगळं मला साधेपणानं केलेलं जास्त आवडतं. साध्या-सोप्या आणि पारंपरिक पद्धतीने घरात दिवाळी साजरी करायला मला आवडतं.  नाशिकच्या घरची एक आठवण सांगायची झाली तर ‘माझिया प्रियाला प्रित कळेना’ या माझ्या पहिल्या मालिकेचं चित्रीकरण सुरू होतं आणि मला नाशिकला घरी जायला मिळत नव्हतं, पण एक दिवस सुटी मिळाली. सकाळी ४ वाजता शुटिंगचं पॅक अप झालं आणि माझा भाऊ  मला घरी न्यायला आला. त्या दिवशी मी घरी जाऊन रात्री पुन्हा चित्रीकरणाला हजर झाले. तो दिवस मी कधीच विसरू शकणार नाही.

यंदा मी सासरी- पुण्याला दिवाळी साजरी करणार आहे. गेल्या वर्षी माझी लग्नानंतरची पहिली दिवाळी अमेरिकेतल्या घरी साजरी झाली होती. पण यावर्षी मी दिवाळी पुण्याला सासरी साजरी करणार आहे. यावेळी माझा नवरा अमेरिकेला असल्याने माझ्यासोबत तो नसेल, त्यामुळे पाडव्याला त्याची खूप आठवण येईल.

मृणाल दुसानिस (हे मन बावरे)

घर सजवण्याचा उत्साह

कल्याणच्या घरी आम्ही आई-बाबा, भावंडं आणि आजी असे सगळे एकत्र दिवाळी साजरी करतो.  वडील कामानिमित्त कतारला असतात, त्यामुळे त्यांना दरवर्षी आमच्याबरोबर दिवाळी साजरी करता येत नाही. पण आम्ही दिवाळीत खूप धमाल करतो. भाऊ  कंदील बनवण्याच्या व्यवसायात आहे. त्यामुळे आमच्या घरीही आम्हीच कंदील बनवतो. मला स्वत:ला दिवाळीच्या फराळाचे सगळे प्रकार छान करता येतात. त्यामुळे मी उत्साहाने फराळ बनवण्यात भाग घेते. मी, आई आणि आजी आम्ही तिघी मिळून फराळ बनवतो. दिवाळीच्या दिवसांत घर आकर्षक दिवे, कंदील आणि दारासमोर रांगोळीने सजवतं. वेगवेगळ्या प्रकारचे कागद, टिश्यू पेपर वगैरे वापरून वेगळा कंदील बनवण्याकडे आमचा कल असतो. आम्ही दिवेही घरीच बनवतो. त्यांना मी छान रंग देते, ते सगळं सजावटीचं-रंगरंगोटीचं काम करायला मला खूप आवडतं. दिवाळीला आमच्या घरी गेट-टुगेदर असतं. तसंच एक दिवस वेळ काढून मी माझ्या मित्रमैत्रिणींना भेटण्यासाठी डोंबिवली किंवा ठाण्याला ‘दिवाळीत पहाट’च्या कार्यक्रमाला जाते. तिथेच सगळेजण भेटतात. दिवाळी सणानिमित्ताने खरेदी, सजावट आणि फराळ करणं या सगळ्या गोष्टी करताना माझ्यात वेगळा उत्साह संचारतो. गेल्या वर्षीच्या दिवाळीतली एक आठवण इथे सांगावीशी वाटतेय. माझा पहिला पगार झाला होता, त्या पैशातून मी भावंडांसाठी त्यांच्या आवडीच्या भेटवस्तू घेतल्या होत्या. त्यामुळे ते खूप खूश होते.

नम्रता प्रधान (छत्रीवाली)

साताऱ्याचं घर आणि दिवाळी एक अतूट नातं

साताऱ्याला आमच्या घरी वसुबारसच्या दिवशी गायीची पूजा करून दिवाळीला सुरुवात होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सगळेजण लवकर उठून उटणं अंगाला लावून अगदी मस्त मनसोक्त पहिली अंघोळ होते. त्यानंतर आमच्याइकडे साताऱ्याला कुर्णेश्वर इथं प्रसिद्ध गणपती मंदिर आहे. तिथे सगळेजण मिळून दर्शनाला जातो. ते ठिकाण अतिशय प्रसिद्ध असल्यामुळे तिथे दिवाळीच्या पहिल्या दिवशी साताऱ्यातील भाविकांची भरपूर गर्दी असते. त्यानंतर शेजारच्या घरांत, मित्रांकडे, नातेवाईकांच्या घरी भेट देऊन येतो. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी संध्याकाळी घरी पूजा असते. त्या दिवशी आमच्याकडे लक्ष्मीच्या तसबिरीची पूजा करतो, त्याचबरोबर केरसुणी आणि घरातील मौल्यवान वस्तूंची पूजा करतो. त्या दिवशी झेंडूच्या फुलांनी घराच्या सजावटीत नैसर्गिक शोभा वाढते. पाडव्याच्या दिवशी काही विशेष नाही, पण एखादी चांगली वस्तू घ्यायची (खरेदी करायची) असते असं वडीलधारी मंडळी सांगतात. आई-बाबा, दादा, मी, वहिनी आणि दीड वर्षांचा पुतण्या असे आम्ही एकत्र मिळून घरीच दिवाळी साजरी करतो.

मालिकेचं चित्रीकरण साताऱ्याजवळच होत असलं तरी अलीकडे घरच्यांसाठी फारच कमी वेळ मिळतो. दिवाळीची एक वेगळी आठवण म्हणजे, ४-५ वर्षांचा असताना बाबा फटाके लावत होते. त्यांना वाटलं त्याची नीट वात पेटवली नाहीय, त्यामुळे ते पुन्हा बघायला गेले तेव्हा तो फटाका त्यांच्या हातातच फुटला. त्यामुळे त्यांचा हात भाजला ती रात्र मला अजूनही आठवते, ती विसरता येत नाही. तेव्हापासून फटाके वाजवायचे नाहीत, हे माझ्या मनावर कोरलं गेलं. आतापर्यंत मी दिवाळी माझ्या साताऱ्याच्याच घरी साजरी केली आहे, अन्यत्र कुठेही नाही. फराळाबरोबर पोह्यच्या गोड पाककृती बनतात आणि बाकरवडीही असते. पण घरात सगळ्यांना बेसनाचा लाडू प्रिय आहे, त्यामुळे बेसनाचे लाडू जरा जास्तच बनवले जातात. आमच्याकडे आजूबाजूला घरोघरी जाऊन फराळ वाटण्याची पद्धत आहे, ती अजूनही जपली आहे. गेल्या वर्षी ‘लागीरं झालं जी’ मालिकेची टीम आमच्या घरी आली होती, यावर्षीही दिवाळीला त्यांना घरी घेऊन जाणार आहे.

नितीश चव्हाण (लागीरं झालं जी)

घर सजवण्यातला आनंद..

दिवाळीत घर सजवायला मला खूप आवडतं. लहानपणापासून मी आणि माझा भाऊ  कंदील घरीच बनवतो. नुकतंच दादाचं लग्न झालंय, त्यामुळे आमच्या जोडीला यंदा वहिनीही आहे. आम्ही यावर्षी खूप धमाल करणार आहोत. माझे बाबा आणि दादा र्मचट नेव्हीमध्ये असल्याने आम्हाला फार कमी वेळा एकत्र दिवाळी साजरी करायला मिळते.

पुण्याच्या घरी एकत्र जमून आम्ही दिवाळी साजरी करतो. यावर्षी ‘मी तुला पाहते रे’ मालिकेच्या चित्रीकरणानिमित्त मुंबईत आहे. पण आता सुट्टी घेऊन दिवाळीत घरी जाणार आहे. दिवाळीत रांगोळी काढायला मला खूप आवडतं. दिवसातून दोनदा सकाळी आणि संध्याकाळी दारासमोर रांगोळी मीच काढते. आमच्या बिल्डिंगमधली मंडळीही खूप उत्साही आहेत. आम्ही एकमेकांच्या घरी जाऊन धमाल करतो, पण फटाके फोडणे हा प्रकार मला अजिबात आवडत नाही. मी लोकांनाही सांगते, ‘फटाके फोडू नका.’

दिवाळीत घरातील लाइटिंग करण्याची जबाबदारीही माझ्यावर असते. स्वत:चं डोकं लढवून घराची सजावट करायला खूप आवडतं. सजावटीसाठी मी काचेच्या बाटल्या घेते. त्यांना वेगवेगळे गडद रंग देते. मग आतून एलईडी लाइटिंगची माळ सोडते किंवा पणत्या पेटवून त्यात त्या लावते. त्यामुळे घरात छान रंगीबेरंगी प्रकाश पडतो.

दिवाळीच्या दिवसांमध्ये आईची स्वयंपाकघरामध्ये फराळाची लगबग सुरू असते. तिला माझ्याकडून फारशी मदत होत नाही. कारण मदतीऐवजी फराळवर ताव मारण्यात मी पुढे असते. दिवाळीत घरातच एकत्र मिळून आम्ही धमाल करतो. पुण्यात दिवाळीच्या दिवसांत मस्त वातावरण असतं.

 गायत्री दातार  (तुला पाहते रे)

सोलापूरच्या घरची धमाल दिवाळी

सोलापूरच्या घरी दिवाळी साजरी करतानाच्या लहानपणीच्या असंख्य आठवणी आहेत. माझे आई-वडील आणि दोन आत्या, त्यांची मुलं असे सगळे मिळून दिवाळी साजरी करायचो. ते चार दिवस अतिशय आनंदाचे असायचे. आता त्या सगळ्याची खूप आठवण येते. दिवाळीनिमित्ताने एकत्र जमल्यावर वर्षभरातील गोष्टींवर चर्चा व्हायची, मोठय़ांचं मार्गदर्शन मिळायचं. माझी मोठी आत्या सगळ्यांना मार्गदर्शन करायची. काय केलं पाहिजे, काय नाही हे ती समजावून सांगायची. आता आत्याची मुलं परदेशात असतात, माझा भाऊ  लातूरला असतो आणि मी गेली १० वर्ष मुंबईत आहे; त्यामुळे सगळेजण एकमेकांपासून खूप दूर आहोत. माझे सोलापुरातील मित्रही कामानिमित्ताने बाहेर असतात. त्यामुळे सगळ्यांच्या भेटीगाठी होत नाहीत. पण मी सगळ्यात लहान आणि सगळ्यांचा लाडका असल्यामुळे माझी जबाबदारी आहे की, सगळ्यांना एकत्र आणणं. मला माझ्या घरच्यांना दिवाळीच्या दिवसात एकत्र आणून सोलापूरच्या घरी धमाल करायची आहे. ही जबाबदारी माझीच आहे असं मी मानतो. मला सगळ्यांचीच खूप आठवण येते. यावेळी मीच पुढाकार घेऊन सगळ्यांना सोलापूरच्या घरी एकत्र आणणार आहे. आत्याचे मार्गदर्शक बोल ऐकण्यासाठी आतुर झालोय.

सोलापूरच्या घरी फेणी हा नमकीनचा प्रकार बनतो. तो मैद्यापासून बनतो आणि मेतकुटाबरोबर खाल्ला जातो. माझी आईच बनवते, तो इतरत्र कुठेही मिळत नाही. तो माझा सगळ्यात

आवडता पदार्थ आहे. माझ्या घरच्यांप्रमाणेच मी माझ्या मित्रांसाठीही आवर्जून वेळ काढतो. सोलापूरला गेलो की एक दिवस फक्त मित्रांसोबत घालवतो.

अक्षर कोठारी (छोटी मालकीण)

शब्दांकन : भक्ती परब

First Published on November 3, 2018 1:03 am

Web Title: artists said pleasant memories of the house on occasion of diwali
टॅग Diwali 2018