काहीही असो, ‘तो घरासाठी’ सदैव भूतकाळातला आनंद, वर्तमानातली सोय आणि भविष्याचा आधार आहे. गाडीत बसल्याबरोबर सामान वरती ठेवलं की हायसं वाटतं, तद्वतच आपल्या जीवनप्रवासातही घरातला माळा अगणित गोष्टी सांभाळून ठेवतो. त्याचं स्थान अतिशय आवश्यक, पण दुर्लक्षित. त्याच्याशिवाय घर ही कल्पनाच करता येत नाही, खरं ना!

घराचं रंगकाम अगदी रंगात आलं होतं. एकेक खोली रिकामी होत होती. घासूनपुसून स्वच्छ होत होती. गुळगुळीत होऊन रंगत होती. पूर्ण ‘मेकओव्हर’ होऊन सुंदर दिसत होती. इकडच्या तिकडच्या खोलीत पसरलेले सामान पुन्हा स्वत:मध्ये सामावून घेत होती. सगळं तिचंच होतं, हवंहवंसं असंच होतं. द्विधा मन:स्थितीचा प्रश्नच नव्हता. सरतेशेवटी माळ्याचा नंबर लागला. खरं तर त्याच्या उपस्थितीची दखलही घेतली जात नव्हती. पण ‘सर्वधर्मसमभाव’ जपण्याचं कर्तव्य पार पाडायचं होतं.

Shukra Gochar in Mesh
२४ तासांनी ‘या’ ६ राशींच्या नशिबाला मिळेल श्रीमंतीची कलाटणी? शुक्रदेवाच्या कृपेमुळे व्यापारात होऊ शकतो मोठा फायदा
Denial of child custody on charges of adultery is wrong
व्याभिचाराच्या आरोपास्तव अपत्याचा ताबा नाकारणे चुकीचे
How to prevent heart attacks
Heart Attack : हृदयविकाराचा धोका कसा टाळायचा? वयाच्या विसाव्या वर्षापासून लावा ‘या’ सवयी, तज्ज्ञ सांगतात…
How To Make Gudi Padwa Sakhrechya Gathi At Home gudi padwa 2024
गुढी पाडव्यासाठी साखरेच्या गाठी यंदा बनवा घरीच, साखरेच्या बत्तास्यांची सोपी झटपट कृती

कायमच उच्च पातळीवर असणारा, मंदिराच्या कळसाकडे बघावं तसं बघायला लावणारा, स्टुल किंवा शिडीचा हातभार नव्हे ‘पाय’भार लागल्याशिवाय दर्शन न देणारा ‘माळा’ खाली येऊ लागला. एकेक ‘डाग’ खाली येताना बघताना छाती दडपून जात होती. बाकीच्या खोल्यांमधील सामानाची हलवाहलव होताना विशेष काही वाटलं नाही. पण माळ्यावर आमचा सगळा भूतकाळ सामावलेला होता. प्रत्येक खाली येणारी वस्तू ‘मी पुन्हा माळ्यावर जायचंय ना!’ हा प्रश्न विचारतच येत होती. त्याला उत्तर देताना माझी ‘तळ्यात-मळ्यात’ अवस्था होत होती. अद्ययावत तंत्रज्ञानाने काचेची दारं कशी अलगद उघडतात, तशी भूतकाळाची दारं विनासायास किलकिली झाली.

इकडून तिकडे एकशे ऐंशी अंशातून मान फिरवणारा टेबल फॅन. एसीची खोकडी आणि सिलिंग फॅन याच्या राज्यात याला कोण विचारतंय? पण आजूबाजूच्या कोणत्याही घरात लग्नकार्य, अडीअडचण असली की हा बिचारा, खाली येत, कुरकूर न करता, पाहुण्यांना वारा घालून, डासांना पळवायला हजर असतो. येणारा-जाणारा ‘छान झोप लागली हं’ म्हणून दुवा देतो. म्हणूनच की काय कोण जाणे, सगळ्यांचा विरोध पत्करूनही त्याचं स्थान माळ्यावर अबाधित राहातं. पायात घुटमळणाऱ्या बोचक्याची गाठ सोडली अन् अनेक गाठीभेटीत अडकायला झालं. लग्न, मुंज, मंगळागौर, डोहाळजेवण यांच्या आठवणींची कॅसेट रिवाइंड होत गेली. अहेर वा पुष्पगुच्छ आणू नये या तळटीपेला जागा नसलेले ते दिवस. नात्याच्या, वयाच्या श्रेणीप्रमाणे ‘देणंघेणं’ असण्याचा रिवाज. सख्ख्या नातलगांना कापडचोपड आणि भाचरं, सुना, स्नेही मंडळी यांना ‘कुंडा.’ ज्याच्यात जिन्नस काढून ठेवू त्यातच गरम करण्याची सुविधा निघाल्यावर या ‘कुंडय़ांना’ विचारतंय कोण? ते बसले एकमेकांत अडकून वरती. एकएक कुंडा बाहेर काढून त्यावरचं पुसट नाव वाचताना आठवणींचा कोलाजच तयार झाला. मिळालेल्या भांडय़ांतून सजलेला तो नवा संसार, स्वयंपाकघरातली लाकडी मांडणी, त्यावर काही पालथे पडलेले, तर काही चकाकणारे, आताच्या मोडय़ुलर किचनमध्ये बसतात तसे लपून न बसणारे ती चित्रचौकट डोळ्यासमोर साकार होत पुन्हा नव्याने आनंद देत राहिली, अगदी धुकं विरल्यामुळे दिसू लागणाऱ्या परिसरासारखी. पितळेचे कडीचे डबे बघताना तर घरातल्या चिमण्यांचे  शैशवच झरकन् डोळ्यासमोर बागडले. दहादा डब्याचं झाकण उघडून पोळीचा लाडूच आहे ना याची शहानिशा करून घेणारे ते चिमुकले कोवळे हात, त्या हातांची गळामिठी केवळ कल्पनेनेही सुखावून गेली. पुस्तकांऐवजी फोनच्या आणि विजेच्या बिलांनी भरलेली शाईचे डाग पडलेली जुनी दप्तरे, पेटी, रंगहीन बोळक्यांचा ‘चिमुकला संसार’, प्लॅस्टिकचा कान नसलेल्या कपांचा टीसेट, लाकडी ठकी, हुकावर डोलत नृत्य करणारी बाहुली अशा अनेक खेळण्यांची इस्टेट वर्षां दोन वर्षांनी भारतभेटीला येणाऱ्या नातवंडांसाठी माळ्याच्या सेफ डिपॉझिटमध्ये सुरक्षित असते. त्यांच्यासाठी ती अलीबाबाची गुहाच असते. लोखंडी पत्र्याच्या शेगडीने हलव्याचे गोड दिवस जपून ठेवत त्याक्षणी झोपेवर संक्रांत आणली होती. आईपणाचं सुख मिरवताना शेकशेगडीच्या उबदार दिवसांची ऊब तर जन्मभर पुरणारी. सटरफटर काही उपयुक्त, काही मायेच्या पसाऱ्यात अडकलेली, काही ‘आशा’वाद मानणारी अशा सामानांनी भरलेली पाण्याची पिंपं, पाणीटंचाईच्या दिवसांची आठवण, त्यातला ओलावा जपत होती. रात्रीवार्ता पाणी भरताना वाचन संस्कृतीची भरभराट होई. कधी त्यात ‘रमले मी’ असं घडून ‘पाणीच पाणी चोहीकडे’ होऊन, ते निस्तरताना डोळ्यांची तळी पण वाहू लागत. असंख्य तसबिरी, बागकामाची अवजारं, खिळे, चुका, हातोडी, पकड, गणपतीच्या सजावटीची कागदी करामत, हौसेने साठवलेली वर्तमानपत्रातली पिवळी कात्रणं, चपला, रंगाचे डबे, लाद्या, छोटेमोठे पाइप अशा कितीतरी गोष्टींनी आठवणीतल्या आनंदाचा फेर धरला होता.

काळ बदलला, जागतिकीकरणाच्या वाऱ्यांनी ‘अर्थ’कारण वाहवत गेले. ब्रॅण्डेड वस्तूंचा जमाना आला, सादरीकरणाला जास्त महत्त्व प्राप्त झाले, झगमगाटात खरेदी होऊ लागली, त्याचं बोट धरून अनावश्यक खरेदीने जोर धरला, एकावर एक फ्रीचा जमाना आला, प्रदर्शने, शॉपिंग फेस्टिवलच्या आकर्षणाने, अंतिम तारखेच्या मर्यादेने खरेदीचा वेग वाढला. टिकाऊ, ‘जपून वापरा’ हे मंत्र कालबाह्य़ ठरले. स्वस्त, मस्त, अल्पजीवींचे वर्चस्व आले. भरभरून खरेदी न करणं ही आगळीक ठरू लागली. खरेदीमध्ये स्थितप्रज्ञता, वैराग्य म्हणजे अरसिकपणाच. ह्य़ा सगळ्याचा ‘नेटइफेक्ट’ म्हणजे घरांत मालाची आवक वाढली. खोल्यांमधील स्टोअरेज तट्ट फुगले. पण तेरडय़ाचा रंग तीन दिवसच टिकला. नव्याची नवलाई लगेच ओसरत चालली. टाकाऊपण मागे लागले. मग ही जमलेली-जमवलेली अडगळ ठेवण्याचा, कोंबण्याचा एकच पर्याय म्हणजे माळा. आजकाल पाण्याच्या टाकीला हाताशी धरत तो जरा ‘पाणी’दारही झाला आहे.

तर असा हा माळा, घराचा अतिशय महत्त्वाचा, वरती राहून खालची जागा मोकळी ठेवणारा, अविभाज्य भाग. त्याच्याशिवाय घर ही कल्पनाच करता येत नाही. जे जे समोर नको असेल, दृष्टीआड करावयाचे असेल, तात्पुरतं निरुपयोगी झालं असेल, त्याला माळ्याचीच वाट दाखवावी लागते. इथे अडगळीचा डोंगर होतो, हलायला जागाच नसते, मग आवरण्याचा प्रश्न येतोच कोठे? घरी आलेल्या पाहुण्यांना घराचं इंटिरिअर आवर्जून दाखवलं जातं. पण माळ्याच्या बाबतीत मात्र मौनम् सर्वार्थ साधनम्. खरं तर माळ्यामधील गुप्तधनाची सर कशालाच येत नाही. तो अ‍ॅण्टिक पीस जमा करत जातो. केव्हाही, काहीही वर भिरकवा, ‘कॅच’ घेतलाच म्हणून समजा. संपूर्ण घराचा नीटनेटकेपणा राखण्यात याचा सिंहाचा वाटा. स्वत:कडे गबाळेपणा घेत ‘मर्मबंधातल्या ठेवी’ आपलेपणाने संभाळणारा, पण याच्याकडे कौतुकाने बोट दाखवायला कोणी तयार होत नाही. ‘हा’ न दिसलेलाच बरा, अशी वृत्ती. कोणासमोर ह्य़ाच्या पोटात शिरायचा प्रसंग आला तर अगदी जिवावर येतं. आकारमान, स्थान याच्याविषयी त्याचा खास आग्रह, हट्ट नाही. ‘तुम्ही म्हणाल तसं,’ अशीच भूमिका. जसं असेल तसं आणि जे द्याल ते घ्यायला एका पायावर तयार. एरवी समजूतदार असला तरी वास्तवात डोक्यावर ‘चढलेला’ आहे. काटकसरी, चटकन् फेकून देण्याच्या वृत्तीची ‘निवृत्ती’. आवराआवरीचा कंटाळा, वेळेचा दुर्भिक्ष यामुळे ‘वाढता वाढता वाढे’ अशीच याची अवस्था. तो दिसू नये असं वाटत असलं तरी त्याच्यासाठी नवीन पडदा कदापि शक्य नाही. जुन्या साडीच्या पडद्यावरच त्याला समाधान मानून घ्यावं लागतं. तो ही काही कमी नाही, वाऱ्याशी अनुसंधान साधत तो पडदा पुढे मागे ढकलत बाहेर डोकावून रहातो. त्याची ही चाल यजमानांच्या लक्षात आल्यामुळे त्याला चांगले दिवस येऊ पाहत आहेत. चक्क सनमायका लावलेल्या लाकडी दारांनी त्याचं तोंडच बंद करण्याचा कट केला जात आहे.

काहीही असो, ‘तो घरासाठी’ सदैव भूतकाळातला आनंद, वर्तमानातली सोय आणि भविष्याचा आधार आहे. गाडीत बसल्याबरोबर सामान वरती ठेवलं की हायसं वाटतं, तद्वतच आपल्या जीवनप्रवासातही घरातला माळा अगणित गोष्टी सांभाळून ठेवतो. त्याचं स्थान अतिशय आवश्यक, पण दुर्लक्षित. त्याच्याशिवाय घर ही कल्पनाच करता येत नाही, खरं ना!

सुचित्रा साठे  vasturang@expressindia.com