News Flash

घर सजवताना : बाथरूम

भारतीय इतिहास पहिला तर अगदी काही दशकांमागेही न्हाणीघर व शौचालय या तशा अस्पृश्य जागा होत्या.

भारतीय इतिहास पहिला तर अगदी काही दशकांमागेही न्हाणीघर व शौचालय या तशा अस्पृश्य जागा होत्या. परंतु बदलत्या काळानुसार या जागा फक्त आपल्या घराचाच नव्हे तर जीवनशैलीचा एक भाग बनून गेल्या. बरोबर ओळखलंत! आज आपण बाथरूम किंवा टॉयलेट याच विषयावर बोलणार आहोत.

फार पूर्वीच्या काळी तुर्कस्थानात असणाऱ्या सार्वजनिक हमामांपासून ते राणी क्लीओपात्रा हिच्या राजसी अंघोळीपर्यंतच्या सुरस कथा आपल्यापैकी बऱ्याच जणांनी ऐकल्या असतील. आपल्याकडेही राणी लक्ष्मीबाईंच्या (झाशीच्या राणीच्या ) सात सात हांडे सुगंधी पाण्याच्या स्ननाच्या काही वदंता आहेतच. तो काळच असा होता जेव्हा स्वत:चे खाजगी स्नानगृह असणे ही फार मोठी आणि श्रीमंती गोष्ट होती.

आजच्या काळात मात्र सर्वसाधारण माणसाच्यादेखील बेडरूमला जोडून स्वत:चे असे बाथरूम असते. खरं तर बाथरूम शब्दापेक्षा रेस्ट रूम हा शब्द मला अधिक आवडतो. कारण मुळात सोय म्हणून असणारी ही जागा सुरेख इंटिरियर डिझाइनच्या स्पर्शाने कधी आरामाची आणि वेळ घालवण्याची खोली होऊन जाते ते आपलं आपल्यालाही कळत नाही.

म्हणूनच घराचे इंटिरियर डिझाइन करत असताना जितके लक्ष आपण आपली लिव्हिंग रूम सजवताना देऊ  तितकेच किंबहुना त्याहूनही थोडे अधिक लक्ष बाथरूम सजविताना दिले पाहिजे. बाथरूम लहान असो वा मोठे, परंतु आपले बाथरूम कसे दिसावे याबद्दलच्या आपल्या कल्पना स्पष्ट असल्या पाहिजेत. बाथरूमचे इंटिरियर करताना लक्षात ठेवायची एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे बाथरूममधील बरेच भाग हे फिक्स असल्याने जितक्या सहजतेने आपण बेडशीट किंवा पडदे बदलू त्याच सहजतेने बाथरूमचे इंटिरियर बदलता येत  नाही. त्यामुळेच प्रत्येक वस्तू निवडताना पुढील काही वर्षे हीच वस्तू वापरायची आहे हे ध्यानात ठेवूनच निवड केली पाहिजे. त्याचप्रमाणे बाथरूमचे इंटिरियर करून घेताना जरी तुम्ही खूप तरुण असाल तरी वय हे नेहमी वाढणारच हे गृहीत धरून वाढत्या वयातही वापरायला सोयीचे होईल असे इंटिरियर करणे कधीही शहाणपणाचे. त्यातून तुम्ही जर वृद्धत्वाच्या उंबरठय़ावर असाल तर पुढे जाऊन योग्य ठिकाणी आधारासाठी रॉड अथवा हँडल असे मदतनीस सामावून जातील अशी इंटिरियरची रचना असावी म्हणजे आपले बाथरूम सदैव आपल्याला आनंद देत राहील.

जर बाथरूम बऱ्यापैकी मोठे असेल आणि वापरणारे दोघे नवरा-बायको असतील तर अशा वेळी दोघांना एकाच वेळी बाथरूममधील विविध साधने वापरता येतील का? याचाही विचार करायला हरकत नाही. याकरता आपण दोन वॉश बेसिन तसेच शॉवरसाठी व ६ ू  म्हणजेच शौचालयासाठी वेगळे क्युबिकल्स देऊ  शकतो. बाथ टब हेदेखील अनेकांचे स्वप्न असते. मोठय़ा आकाराच्या बाथरूममध्ये हेदेखील स्वप्न पुरे होऊ  शकते. बाथ टबमध्ये सेल्फ स्टँडिंग तसेच बाजूने बांधकाम करून आत बसविण्याचे असे निरनिराळे पर्याय उपलब्ध असतात. यातील आपल्याला आवडेल रुचेल तो प्रकार आपण घेऊ  शकतो.

बाथरूम कितीही लहान असो वा मोठे त्यात ड्राय एरिया व वेट एरिया वेगवेगळे ठेवणे हेदेखील एक आव्हान असते. बऱ्याच लोकांना हा प्रश्न पडतो कशाला असे करायचे? त्याने काय साध्य होणार? तर याचा महत्त्वाचा फायदा म्हणजे तुम्ही अंघोळ केल्यावर अंग कोरडे करण्यासाठी आणि कपडे व्यवस्थित घालण्यासाठी तुम्हाला वेगळी कोरडी जागा मिळते त्याचसोबत शॉवरचा ओला भाग वेगळ्या ठिकाणी असल्याने किंवा काचेच्या पार्टिशनने बंद केलेला असल्याने शॉवरचे पाणी

wc वर पडून ते सतत ओले राहत नाही, जेणेकरून ते वापरताना स्वच्छ वाटते.

बाथरूममधील लायटिंग हादेखील फार महत्त्वाचा मुद्दा आहे. शक्यतो बाथरूममध्ये दोन प्रकारचे लायटिंग करावे. एक तर मूड लायटिंग तर दुसरे टास्क लायटिंग. बरेचदा बाथरूम लहान असल्याने एखादा वॉल लाइट किंवा फॉल्स सीलिंगमधील स्पॉट लाइट्सदेखील मंद आणि उबदार वातावरणनिर्मितीसाठी पुरेसे ठरतात. पण त्याचसोबत बाथरूमची स्वच्छता वैगेरे करताना थोडय़ा प्रखर प्रकाशाची आवश्यकता असते, अशा वेळी टास्क लाइट्सची गरज पडू शकते म्हणून आधीच ती सोय करून ठेवावी. काही ठिकाणी मी पाहिलंय वॉश बेसिनवरील आरसा हा स्पेशल मेकअपसाठीदेखील वापरला जातो, अशा ठिकाणी आरशाच्या वर खास प्रकारचे पिवळे मेकअप लाइट्सदेखील द्यायला हवेत.

हे सर्व झालं कृत्रिम प्रकाशाबद्दल, पण बाथरूममध्ये कृत्रिम प्रकाशसोबतच नैसर्गिक प्रकाश आणि खेळत्या हवेचीही गरज असते. यासाठी बाथरूमला खिडकी असणे गरजेचे. बाथरूमच्या खिडकीची रचना अशी असायला हवी की जेणेकरून बाहेरून आतील काही दिसायला तर नकोच, पण तरीही नैसर्गिक प्रकाश मात्र भरपूर आत आला पाहिजे. बाथरूम जर एखाद्या बंगल्याचे असेल तर त्याला उंच कंपाउंड वॉल घालून आपण बाहेर एक लहानसे गार्डनदेखील करू शकतो.

बाथरूमचे इंटिरियर डिझाइन करताना आणखीही काही गोष्टी आवर्जून लक्षात घ्याव्या लागतात. त्यातील अत्यंत महत्त्वाची म्हणजे बाथरूम ही जरी घरातील एक पूर्णपणे वेगळी खोली असली तरी इंटिरियर करताना ती घराचा एक भाग आहे हे विसरू नये. किंबहुना बेडरूमचंच एक वाढीव अंग असल्याप्रमाणे त्याला ट्रीट करावे. उदा. जर संपूर्ण घराची सजावट ही पारंपरिकतेकडे झुकणारी असेल तर बाथरूमची सजावट अचानकपणे मॉडर्न नसावी. जी घर सजावटीची थीम असेल तीच बाथरूममध्येही झळकावी म्हणजे ते बाथरूम त्या घराचा एक भाग वाटेल.

आज आपण फारतर बाथरूमविषयी खूपच सर्वसाधारण माहिती घेतली. कारण मुळातच बाथरूम हा विषय फार खोल आहे. म्हणूनच या शृंखलेत निरनिराळ्या प्रकारची बाथरूम व त्या अनुषंगाने येणाऱ्या तांत्रिक बाबींबद्दल आपण चर्चा करणारच आहोत. त्याचसोबत बाथरूममध्ये वापरण्याच्या विविध आधुनिक साधनांचीही आपण माहिती घेऊयातच. सध्या फक्त इतकंच सांगेन तुमचं बाथरूम कितीही सुंदर दिसो किंवा तुम्ही त्यावर कितीही खर्च करा, पण मूळ बाथरूमच्या वापराचा जो उद्देश आहे त्याला सर्वात जास्त महत्त्व असूद्यात, थोडक्यात, functionality is more important than the look….

(इंटिरियर डिझायनर)

गौरी प्रधान ginteriors01@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 18, 2017 3:28 am

Web Title: best bathroom design ideas
Next Stories
1 फर्निचर : टीव्ही युनिट
2 बांधकामाची स्ट्रक्चरल डायरी सक्तीची हवी
3 रंगविश्व : टेश्चर पेंट
Just Now!
X