हल्ली बहुतांश लोक सहकारी गृहनिर्माण संस्थांमध्ये रहिवासी सभासद असतात. सदनिका खरेदीदार इमारतीमधल्या त्याच्या सदनिकेत राहायला आल्यानंतर काही काळाने त्याचा इमारतीमधल्या व आसपासच्या रहिवाशांशी परिचय होतो आणि त्याचे रूपांतर मत्रीत होते. अनेक सोसायटय़ांमध्ये वर्षभर निरनिराळे विविध उपक्रम आयोजित केले जातात. उपक्रम, सण, समारंभ, इ.मुळे सोसायटीतले सभासद, रहिवासी यांच्यामध्ये सलोखा निर्माण होतो. मात्र त्याचबरोबर सोसायटीतल्या सभासदांमध्ये काही ना काही कारणांमुळे वाद उपस्थित होतात आणि सरतेशेवटी वादाचे निराकारण व्हावे यासाठी कोर्टाची पायरीदेखील चढावी लागते.

मुंबईतील वरळी इथल्या एका सोसायटीच्या इमारतीत राहणाऱ्या दीनानाथ आणि जागृती (नावे बदलली आहेत) यांच्यामधील वादाची परिणतीदेखील न्यायालयीन लढाईत झाली. इमारतीतल्या ज्या ब्लॉकमध्ये दीनानाथ राहतात, त्याच्या बरोबर वरती असलेल्या वरच्या मजल्यावरील ब्लॉकमध्ये जागृती यांचे वास्तव्य आहे. जागृती या पक्षीमित्र संघटनेच्या कार्यकर्त्यां आहेत. त्यांनी आपल्या ब्लॉकच्या गच्चीच्या भिंतीला लोखंडी ब्रॅकेटस् ठोकून घेऊन त्यावर एक पत्र्याचा ट्रे बसवला आणि या ट्रेवर रोज सकाळ-संध्याकाळ कबुतरे, कावळे, इ.पक्ष्यांकरिता धान्य, पाणी, इ. ठेवण्यास सुरुवात केली. जागृती यांनी पक्ष्यांकरिता केलेल्या या सोयीमुळे त्यांचा रहिवास असलेल्या ब्लॉकच्या गच्चीत आणि परिसरात सकाळी उजाडल्यापासून दिवस मावळेपर्यंत निरनिराळे पक्षी धान्याचे दाणे टिपण्याकरिता आणि पाणी पिण्यासाठी थव्याने येण्यास सुरुवात झाली. दीनानाथ व त्याचे कुटुंबीय जागृती यांच्या बरोबर खाली असलेल्या ब्लॉकमध्ये रहात असल्याने त्यांना सकाळपासून दिवस मावळेपर्यंत थव्याने यायला लागलेल्या वेगवेगळया पक्ष्यांची विष्ठा, फडफडवली जाणारी पिसे, जागृती यांच्या ब्लॉकच्या गच्चीतून खाली गळणारे पाणी, धान्याचे दाणे यांपासून भयंकर त्रास आणि उपद्रव होण्यास सुरुवात झाली. पक्ष्यांच्या विष्ठेमुळे आणि पिसांमुळे प्रदूषण आणि फुप्फुसांचे विकार होतात ते वेगळेच. त्यातच दीनानाथ यांचे वय ७०च्या आसपास आणि त्यांच्या वडिलांचे वय नव्वदीच्या पुढे.

दीनानाथ यांना जागृती यांच्या पक्षीप्रेमामुळे जो त्रास आणि उपद्रव होण्यास सुरुवात झाली त्याबद्दल त्यांनी प्रत्यक्ष जागृती यांच्याकडे तसेच इमारतीच्या गृहनिर्माण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्या. सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांकडे इतर रहिवाशांनीदेखील त्यांना होत असलेल्या उपद्रवाबाबत लेखी तक्रारी दिल्या. सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी जागृती यांना वेळोवेळी पत्रे देऊन दीनानाथ तसेच अन्य रहिवाशांना त्रास व उपद्रव होईल अशा तऱ्हेने पक्ष्यांना दाणा-पाणी देण्याचा उपक्रम करू नये. तसेच उपद्रवकारक वर्तणूक करू नये असे कळविले.

जागृती यांनी पक्ष्यांना धान्य व पाणी देण्याची जागा इतरांना त्रास न होईल अशा ठिकाणी बदलावी, असेदेखील सोसायटीतर्फे त्यांना सुचविण्यात आले. एवढे होऊनदेखील जागृती यांनी यापकी कोणत्याही सूचनेचा स्वीकार करण्याचे नाकारले.

उलटपक्षी त्यांच्या ब्लॉकच्या बाहेरील गच्चीवर जी व्यवस्था त्यांनी केली आहे ती पक्ष्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने योग्य आहे असे म्हटले. सरतेशेवटी दीनानाथ यांनी या विषयाबाबत जागृती यांच्याविरुद्ध मुंबई शहर दिवाणी न्यायालयात दावा दाखल करून विविध पक्ष्यांना धान्य आणि पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यामुळे जो त्रास व उपद्रव होतो त्या कृतीला मनाई करावी, तसेच याकरिता जो धातूचा ट्रे जागृती यांनी बसवून घेतला आहे तोदेखील हलविण्याचा प्रतिबंधात्मक आदेश द्यावा, अशी मागणी केली. दीनानाथ यांनी दाखल केलेल्या दाव्याला जागृती यांच्याकडून विरोध करण्यात आला.

मुंबई शहर दिवाणी न्यायालयाच्या न्यायाधीशांनी दीनानाथ यांनी दाखल केलेल्या दाव्याचा अंतिम निकाल होईपर्यंत मनाई हुकूम मंजूर केला आणि दीनानाथ किंवा सोसायटीतल्या इतर रहिवाशांना त्रास व उपद्रव होईल अशा प्रकारे कबुतरे, कावळे, इत्यादी पक्ष्यांना धान्य व पाणी उपलब्ध करून देण्यास जागृती यांना मनाई केली, तसेच ज्या ट्रेवर धान्य, पिण्याचे पाणी या गोष्टी उपलब्ध करून दिल्या जातात, तो ट्रेदेखील तेथील जागेवरून हलवावा, असा आदेश दिला.

ब्लॉकच्या गच्चीत आणि परिसरात सकाळी उजाडल्यापासून दिवस मावळेपर्यंत निरनिराळे पक्षी धान्याचे दाणे टिपण्याकरिता आणि पाणी पिण्यासाठी थव्याने येण्यास सुरुवात झाली. दीनानाथ व त्याचे कुटुंबीय जागृती यांच्या बरोबर खाली असलेल्या ब्लॉकमध्ये रहात असल्याने त्यांना सकाळपासून दिवस मावळेपर्यंत थव्याने यायला लागलेल्या वेगवेगळया पक्ष्यांची विष्ठा, फडफडवली जाणारी पिसे, जागृती यांच्या ब्लॉकच्या गच्चीतून खाली गळणारे पाणी, धान्याचे दाणे यांपासून भयंकर त्रास आणि उपद्रव होण्यास सुरुवात झाली. पक्ष्यांच्या विष्ठेमुळे आणि पिसांमुळे प्रदूषण आणि फुप्फुसांचे विकार होतात ते वेगळेच.

मुंबई शहर दिवाणी न्यायालयाच्या या मनाई हुकुमाच्या आदेशाविरुद्ध जागृती यांनी मुंबई उच्च न्यायालयात अपील दाखल केले आणि दिवाणी न्यायालयाच्या आदेशाबाबत अनेक हरकती सदरहू अपिलात घेण्यात आल्या. दीनानाथ आणि जागृती यांच्यामधील वाद हा सहकारी गृहनिर्माण संस्थेमधल्या दोन सभासदांमधला वाद असल्याने दिवाणी न्यायालयाला आदेश मंजूर करण्याचा अधिकार नाही. दावा दाखल करण्यापूर्वी १० वर्षांपासून विविध पक्ष्यांना धान्य, पाणी दिले जात असल्याने आता त्याबाबत तक्रार करण्याचा अधिकार रहात नाही, पक्षी हे मूक असल्यामुळे त्यांच्या दाणा-पाण्याची सोय ठरावीक उंचीवरूनच होणे जरुरीचे आहे, इ. असे विविध मुद्दे जागृती यांच्यातर्फे मांडण्यात आले.

शहर दिवाणी न्यायालयाने दिलेला मनाई हुकुमाचा आदेश योग्य आहे का? आणि या आदेशाबाबत काही हस्तक्षेप करण्याची आवश्यकता आहे का? असे दोन मुद्दे उच्च न्यायालयाच्या सन्माननीय न्यायमूर्तीसमोर विचारार्थ होते.

दीनानाथ (वादी) आणि जागृती (प्रतिवादी) यांच्या वतीने मांडण्यात आलेले मुद्दे विचारात घेऊन उच्च न्यायालयाच्या सन्माननीय न्यायमूर्तीनी मुंबई शहर दिवाणी न्यायालयाने दिलेला मनाई हुकुमाचा आदेश योग्य ठरविला.

सहकारी गृहनिर्माण संस्थेत राहणाऱ्या सभासदांनी व रहिवाशांनी सहकारी तत्त्वाचे योग्य ते पालन केले पाहिजे. सभासदांना व रहिवाशांना आपापले छंद जोपासण्याचा आणि सामाजिक उपक्रम करण्याचा अधिकार असला तरी आपण जोपासत असलेल्या छंदामुळे आणि उपक्रमांमुळे सोसायटीतल्या अन्य सभासदांना आणि रहिवाशांना त्रास आणि उपद्रव होईल अशा प्रकारचे कृत्य करण्याचा आणि वागण्याचा अधिकार पोहोचत नाही, असे निरीक्षण न्यायमूर्तीनी नोंदविले. सोसायटीतला एक सभासद दुसऱ्या सभासदाच्या त्रासदायक आणि उपद्रवकारक वर्तणुकीविरुद्ध न्यायालयाकडून मनाई हुकूम मागू शकतो हे या निकालावरून स्पष्ट झाले.

अ‍ॅड. सुरेश पटवर्धन adv.sureshpatwardhan@gmail.com