तशी अगदी पहिल्यापासून मुंबई अहोरात्र जागीच असायची. कारण या उद्योग नगरी मुंबईत शेकडो कारखाने आणि कापड गिरण्या रात्र पाळीत काम करत होत्या. पण मुंबईला जाग येऊन ती धावू लागायची- ती मात्र  व्ही.टी. आणि चर्चगेटहून भोंगा वाजवून पहिली लोकल दिवसभराच्या सेवेसाठी सुरू व्हायची, तसेच बेस्टची पहिली बस कुलाब्या हून आणि बॉम्बे सेन्ट्रल बस डेपोतून घंटी वाजवून बाहेर पडायची, त्या वेळेला. या दोन प्रमुख सार्वजनिक वाहनांबरोबरच अजून एक सेवा मुंबईकरांच्या सेवेसाठी मुंबईभर फिरण्यासाठी निघत असे ती म्हणजे सरकारी दूध योजनेची- दुधाची गाडी. वरळी दुग्ध शाळेतून अशा असंख्य दुधाच्या गाडय़ा मुंबईभर पसरलेल्या सरकारी दूध केंद्रांवर दूध पोचविण्यासाठी बाहेर निघत. आज जागोजाग खासगी दूध डेऱ्या पाहायला मिळतात. अगदी पाव लिटर दुधापासून कितीही मोठय़ा प्रमाणात पैसे मोजल्यावर दूध अगदी सहजगत्या कोणालाही उपलब्ध होऊ  शकते. परंतु एक जमाना असा होता की धान्य आणि दूध याची मुंबईत प्रचंड टंचाई भासत होती. त्यामुळे शासनाने धान्य आणि प्रमाणित दूध मुंबईकरांना मिळण्यासाठी त्याचे रेशनिंग सुरू केले. मुंबईकर मग तो श्रीमंत असो किंवा गरीब यांना दोन ठिकाणच्या रांगेत उभे राहावेच लागे. त्या दोन रांगा म्हणजे रेशनचे धान्य दुकानासमोरची आणि शासकीय दूध सेंटर समोरची. आता खासगी कंपन्यांचे दूध प्लॅस्टिकच्यापिशव्यांतून मिळते, तसेच शासकीय दूध योजनेचे दूधदेखील प्लॅस्टिकच्या पिशव्यांतून मिळू लागले होते. पण त्या आधी मात्र शासकीय दुधाचा पुरवठा काचेच्या जाडजुड बाटल्यांतून होई. हे दूध प्रमुख दोन प्रतीचे होते- एक होल आणि दुसरे टोन्ड.

होल दूध अधिक मलईदार आणि अर्थातच महाग, त्यामुळे सधन कुटुंबालाच ते घेणे परवडे. मध्यमवर्गीय आणि गरीब जनता मात्र होल दुधापेक्षा थोडे स्वस्त असल्याने टोन्ड दूध वापरत होती. वर्षभर होल दूध घेणाऱ्या कुटुंबाला वस्तीत श्रीमंत म्हणून गणले जात होते. या होल दुधाच्या बाटलीला निळे बुच लावलेले असायचे आणि जनता दुधाला मात्र पांढरे बुच लावलेले असायचे. दुधाचा तुटवडा असल्यामुळे प्रत्येक कुटुंबाला ठरावीक प्रमाणातच दूध मिळावे म्हणून त्यासाठी शासनातर्फे कार्ड वितरित करण्यात येई. त्या कार्डवर त्या व्यक्तीचे नाव आणि ती व्यक्ती किती दूध घेण्यास पात्र आहे याची नोंद केलेली असायची. दूध सेंटरवरच्या कर्मचाऱ्याला शासनातर्फे पुरविण्यात आलेल्या वातीच्या कंदिलाच्या प्रकाशात कार्डावरील मजकूर तपासण्याची खास कला अवगत झालेली होती. या अर्धवेळ कर्मचाऱ्याला मॅनेजर हे पद बहाल केलेले होते. मर्यादित पुरवठा आणि मागणी अधिक म्हटले की जे इतर बाबतीत होते ते या सेंटरवरदेखील होत असे. म्हणजे दूध ग्राहक आणि दूध सेंटरवरचे कर्मचारी यांच्यात झगडा ठरलेला. त्या कर्मचाऱ्यांनी त्या सर्वाला रोज तोंड देण्याची सिद्धीदेखील प्राप्त केलेली होती. या दणकट काचेच्या बाटल्या नेण्या-आणण्यासाठी, वेगवेगळ्या प्रकारचे आणि बाटल्यांच्या संख्येप्रमाणे बनविलेले क्रेट विकत मिळायचे. मुंबईभर भल्या पहाटे साडेपाच-सहा वाजता शासकीय दूध वितरण केंद्रे सुरू होत. आणि शासकीय दुधाची गाडी अशा दूध केंद्रांवर प्लॅस्टिकचा क्रेट येण्यापूर्वी धातूच्या मजबूत क्रेटमधून बाटल्या आणून अक्षरश: आदळायची, पण या बाटल्या अशा मजबूत आणि खमक्या असायच्या की सगळ्या आडदांडपणाला त्या पुरून उरायच्या. बाटल्या उतरताना होणारा खणखणाट भल्या पहाटे आजूबाजूच्या वस्तीत घुमायचा आणि सेंटरवर दूध आल्याची खबर घरोघर मिळायची. सगळा व्यवहार रोखीत पार पाडून या निळ्या आणि पांढऱ्या बुचाच्या दुधाने भरलेल्या बाटल्या ग्राहकाने आणलेल्या रिकाम्या बाटल्यांच्या बदल्यात ज्याच्या त्याच्या गरजेनुसार नव्हे, तर शासनाने ठरवून दिलेल्या प्रमाणात क्रेटमध्ये बसून घरोघर पोचायच्या. सेंटरवरून दूध आणण्याचे काम बहुतेककुटुंबातील वृद्ध व्यक्तीवर सोपवलेले असायचे. आपल्याकडे उत्तम आणि सामान्य असे दोनच दर्जा ठेवून चालत नाहीत. त्याला आणखी एक मध्यम दर्जा असावा लागतो, शासकीय दूधदेखील याला कसे अपवाद ठरणार. त्यामुळे या दुधात अजून एक प्रकार नंतर मिळू लागला त्या प्रकारच्या दुधाला स्टँडर्ड दूध म्हणायचे. त्या बाटलीचे बुच नारिंगी रंगाचं आणि किमतीत फरक.

temperature drop in mumbai
तापमानात घट; मात्र आर्द्रतेमुळे उष्मा कायम
flowers, plant flowers,
निसर्गलिपी : हिरवा कोपरा
Can adding salt to drinking water help prevent dehydration this summer
उन्हाळ्यात पाण्यात चिमूटभर मीठ टाकून प्यावे का? डॉक्टर काय सांगतात वाचा….
पाणी किंवा चहात फक्त १५ मिली ‘हे’ द्रव घातल्यास कंबरेचा घेर व वजन होईल कमी; नवीन अभ्यास काय सांगतो?

दुधाचे वाटप शासकीय पद्धतीने होत असल्यामुळे त्यासाठी प्रत्येकाला कुटुंबात राहाणाऱ्या व्यक्ती लक्षात घेऊन रोज मिळणाऱ्या दुधाचा कोटा मंजूर होत असे. त्यासाठी परत तात्पुरते कार्ड आणि कायम कार्ड असे दोन प्रकार. अगदी सुरुवाती सुरुवातीला पुठ्ठय़ाचे कार्ड मिळायचे. नंतर त्यात सुधारणा होऊन प्लॅस्टिकचे कार्ड आले आणि कायम कार्डला धातूचे अ‍ॅल्युमिनिअमचे कार्ड मिळू लागले. रेशनचे कार्ड आणि दुधाचे कार्ड हे प्राणापलीकडे जपणे क्रमप्राप्त होते. कारण ही दोन कार्डे जवळ नसली तर कुटुंबाचे रोजचे जगणे अशक्य होत असे. ही दोन्ही कार्ड मिळवणे यासाठी अनंत दिव्यातून जावे लागे आणि मगच ती कार्डे हाती लागत.

लोकाग्रहास्तव शासकीय योजनेचे दूध दर दिवशी दोनदा म्हणजे सकाळी आणि दुपारी असे दूध सेंटरवर उपलब्ध होत असे. सकळच्या वेळी हे काम बरेच शांतपणे पार पडत असे. परंतु दुपारचे दूध वितरण म्हणजे दूध सेंटरवर ग्राहकांची अवर्णनीय धुमश्चक्री अनुभवायला यायची. मर्यादित पुरवठा आणि मागणी अधिक यामुळे वशिलेबाजीचे आरोप-प्रत्यारोप होत आणि दूध घरोघर पोचविणारे कामगार आणि ग्राहक यांच्यात हमखास हमरीतुमरी पाहायला मिळायची. दूध केंद्राला दुधाचा पुरवठा काही कारणाने कमी प्रमाणात झाला की, अशा वेळी दूध केंद्रावरील कर्मचारी त्याच्या अधिकारात प्रत्येकाला दूध देताना त्यात कपात करी आणि मग ग्राहक आणि दूध सेंटरचे कर्मचारी यांच्यात भांडण ठरलेले. त्याकाळी कितीतरी गरीब लोकांनी दूध घरोघर पोचविण्याचा व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह चालविलेला आहे.

मुंबई महापालिकेला आज लोक कितीही दुषणे देत असले तरी त्या काळी महापालिकेने, महापालिकेच्या शाळेतून शिक्षण घेणाऱ्या गरीब मुलांची आरोग्याची काळजी घेतलेली आहे. सर्व विद्यार्थ्यांना पोषक आहार म्हणून चिक्की, संत्रे किंवा केळे आणि सरकारी योजनेचे दूध रोज मिळेल याची व्यवस्था केलेली होती. पांढऱ्या बुचाची पाव लिटरची दुधाची बाटली त्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यांला मधल्या सुट्टीत प्यायला मिळे. त्या बाबतीत त्या काळातील महापालिकांच्या शाळातून शिक्षण घेतलेली विद्यार्थ्यांची पिढी महापलिकेच्या प्रती कृतज्ञच राहील.

बाटलीच्या बुचाच्या रंगानुसार दुधातील स्निग्धांशामध्ये फरक असायचा, पण कुठल्याही प्रकारच्या दुधाच्या बाटलीचे अगदी पातळ पत्र्याचे झाकण दाबून बाटली उघडून बुच उलटे करून पहिले की त्याला दुधातील लागलेली मलई मुलांचे तोंड ओशट गोड करून टाकायची. आमच्या पिढीतील मुलांची शिक्षणाची आणि आरोग्याची काळजी घेण्याची जबाबदारी त्या टंचाईच्या काळात मुंबई महापालिकेने चांगल्या रीतीने पार पाडली म्हणायला हरकत नाही.

दुधाच्या त्या दणकट काचेच्या रिकाम्या  बाटल्यांचा उपयोग, घरातील धार्मिक कार्यासाठी देखील चांगला होत असे. सत्यनारायणाची पूजा, किंवा ज्या पूजेसाठी केळीचे किंवा कर्दळीचे खांब उभे करावे लागतात, ते खांब पक्के उभे राहावेत म्हणून ते खांब दुधाच्या दणकट काचेच्या रिकाम्या बाटल्यात ठेवून उभे केले की न डळमळता पक्केएकाजागी शेवटपर्यंत उभे ठाकत.

दुधासाठी प्लॅस्टिकच्या पिशव्या येण्यापूर्वी मुंबईतील एकही घर असे नसेल, मग ती गरिबाची झोपडी असो नाहीतर श्रीमंत माणसाचा बंगला, ज्या घरात सरकारी दुधासाठी खास तयार केलेल्या या काचेच्या दणकट बाटल्या नाहीत. महाराष्ट्रात धवल क्रांती घडली आणि सहजरीत्या दूध सर्वत्र उपलब्ध होऊ  लागले आणि या निळे बुच, पांढरे बुच आणि नारिंगी बुच हे दुधाचे प्रकार आणि त्यासाठी खास तयार केलेल्या काचेच्या बाटल्या आणि त्या वाहून नेण्या-आणण्यासाठी लागणारे गरजेनुसार कप्पे असलेले क्रेट आणि दूध कार्डदेखील इतिहास जमा झाले. परंतु त्या काळी शाळेत प्यायलेल्या दुधाची ओशट गोड चव त्या काळातील विद्यार्थ्यांच्या तोंडात अजूनही रेंगाळत असेल.

मोहन गद्रे gadrekaka@gmail.com