12 December 2018

News Flash

घरगोष्टी : भिंतीवरी दिनदर्शिका असावी!

एके काळी प्रचंड कौतुक असलेल्या या दिनदर्शिका नक्की कधीपासून प्रचलित झाल्या कल्पना नाही,

प्रतिनिधिक छायाचित्र

बदलत्या काळाबरोबर घरातल्या वस्तूंचेही रूप पालटले. अनेक जुन्या गोष्टींची जागा आधुनिक गोष्टींनी घेतली; तरीही जुन्यांशी असलेला जिव्हाळा कायम राहिला. अशाच गोष्टींची सय जागविणारे सदर..

आज सकाळी बरीच कापडखरेदी केली तेव्हा त्यासोबत दुकानदाराने तत्परतेने एक मोठीशी दिनदर्शिका.. अर्थात कॅलेंडर त्या पिशवीत ठेवलं. घरी आल्यावर ती दिनदर्शिका मी उघडून पाहिली. भारतातील निरनिराळ्या पर्यटनस्थळांची माहिती चित्ररूपात त्यावर दिली होती. गुळगुळीत कागदावरची ती चित्रे आणि माहिती खूपच उद्बोधक आणि चित्तवेधक होती. दोन-तीन वेळा मी त्या दिनदर्शिकेकडे उलटून पालटून पाहिले, पण मग शांतपणे तिची गुंडाळी करून आवरून ठेवली कुणाला तरी देण्यासाठी, कारण ती मोठय़ा आकाराची दिनदर्शिका आमच्या आकर्षक वॉलपेपर लावलेल्या.. वारली पेंटिंगनी सजवलेल्या दिवाणखान्यात शोभणारी नव्हती. किंबहुना आमच्या कुठल्याही खोलीत ती विसंगत वाटली असती. त्याच वेळी काहीतरी आठवून पिशवीतून मी पैसे मोजून विकत घेतलेली दिनदर्शिका काढली. मागून पुढून उलटून तिच्यावरील येत्या वर्षांतील सणवार घरातल्यांचे वाढदिवस सुट्टय़ा यावर झरझर नजर फिरवली आणि कौतुकाने स्वयंपाकखोलीच्या भिंतीवर तिची प्रतिष्ठापना केली.

आज फुकटात मिळालेल्या दिनदर्शिकेचे फारसे अप्रूप नसले किंवा मिळेल ती दिनदर्शिका घरात लावण्याची प्रथा आता बंद झाली असली तरी काही वर्षांपूर्वी या भेट मिळणाऱ्या दिनदर्शिकेची सर्वाना प्रचंड अपूर्वाई होती. नववर्ष सुरू होण्यापूर्वी दुकानातील खरेदीवर किंवा बँकेतून लोक हक्काने त्या मागून घेत. आणि मुख्य म्हणजे सर्वसामान्य लोकांच्या घरांच्या भिंतीवर ती हौसेने लावली जाई. प्रत्येक घरात १-२ तरी दिनदर्शिका झळकत असत. कदाचित तो त्यावेळचा गृहसजावटीचा भागही असेल, कारण घरात महागडी पेंटिंग्ज वगैरे लावून आपली सौंदर्यदृष्टी.. अभिरुची दाखवण्याची कल्पना कदाचित अस्तित्वात नसेल म्हणण्यापेक्षा सामान्यांना ती कदाचित परवडणारीही नसेल. मुळात सर्वसामान्यांच्या घरात अंतर्गत सजावट (Interior decoration) वगैरे कल्पनाच रुजली नसावी. म्हणूनच देवादिकांच्या.. कुटुंबीयांच्या तस्वीरी तसेच घरच्या गृहिणीची कलाकुसर दर्शवणाऱ्या पांढऱ्या बटणांचे बदक, ससे किंवा जिगाच्या भरतकामाच्या तस्वीरीशेजारीच इथेतिथे अशा दिनदर्शिकाही फडफडत असायच्या. फुकटात मिळालेल्या अशा दिनदर्शिकेनी आपसूकच गृहसजावट साजरी होई. शिवाय काही ठिकाणी रंग किवा पोपडे उडालेल्या भिंती झाकण्याची सोयही त्यामुळे साधली जात असेल कदाचित.

एके काळी प्रचंड कौतुक असलेल्या या दिनदर्शिका नक्की कधीपासून प्रचलित झाल्या कल्पना नाही, पण आपल्या उत्पादनाची जाहिरात घरोघरी आणि महिनोन्महिने व्हावी या उद्देशाने दिनदर्शिकेच्या रूपाने घराघरात शिरण्याच्या जाहिरातदारांच्या कल्पनेला सलाम केलाच पाहिजे. दिनदर्शिकेचे प्रकार तरी कित? नुसत्या तारखांची- म्हणजे एक महिन्याचे एक पान अशी बारा पानी त्याहूनही चित्रांच्या दिनदर्शिका तर फारच प्रेक्षणीय प्रकार त्यावर निरनिराळया देव-देवता, प्राणी-पक्षी, निसर्गचित्रे  फुले, मुले, लावण्यवती  खासकरून सिनेतारका आणि स्वातंत्रपूर्व काळात काही नेतेमंडळीसुध्दा त्यावर विराजमान असत. काजळ आणि औषधाची जाहिरात करणाऱ्या एका गुळगुळीत कॅलेंडरवर तर कायम राम, कृष्ण किंवा महादेव वगैरे देवाचा मोठा फोटो मध्यभागी आणि त्याच्या सभोवती किंवा खाली बारा महिन्यांच्या तारखा अगदी छोटय़ा टाइपात असत. लांबून बघणाऱ्याला फक्त कंपनीचे नाव आणि देवाचे दर्शनच घडण्याची शक्यता असायची. एका रेडिओ कंपनीची जाहिरात करणाऱ्या कॅलेंडरवर ओठाशी तर्जनी ठेवलेल्या छोटय़ा गोंडस बाळाचे चित्र तर घरोघरी बघायला मिळायचे. आपापल्या बाळांचे तशी पोझ देऊन फोटो काढायची तर तेव्हा फॅशनच आली होती. कागदाव्यतिरिक्त काही वस्त्र उत्पादक गिरण्यांची दिनदर्शिका  कापडावरच वर-खाली लाकडी रुळांवर बांधलेली असायची, जी एखाद्या इतिहासकालीन खलित्याप्रमाणे वाटायची. कालांतराने प्लॅस्टिकचा जमाना आला आणि टेबलावर म्हणण्यापेक्षा टेबलावरील काचेच्या खाली ठेवता येतील अशा सुटसुटीत किंवा अगदी पत्त्याच्या आकाराच्या दिनदर्शिकाही छापल्या जाऊ  लागल्या. अशी पॉकेट दिनदर्शिका लोक खिशातल्या पाकिटात ठेवण्यासाठीसुद्धा वापरू लागले. याच्याशिवाय फक्त पुठ्ठय़ावर मोठे चित्र आणि त्याखाली नियमितपणे बदलता येणारी तारीख, महिना, वार अशी दिनदर्शिका किंवा चित्राशिवायच, पण खूप मोठय़ा टाइपात रोज तारीख बदलता येणाऱ्या दिनदर्शिका आपल्याला मोठमोठय़ा ऑफिसात बघायला मिळतात. याशिवाय दिनदर्शिकेचा आणखी एक खास प्रकार म्हणजे टेबल दिनदर्शिका- ज्या पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे त्रिकोणी स्वरूपात उभ्या असतात. तर काही वेळा बाजूला पेनस्टँड असलेली तारखांची दिनदर्शिका एक शोपीस बनून उच्चभ्रू घरातील स्टडीटेबलवर किंवा वॉलयुनिटमध्ये विराजमान होऊन त्या घराची शोभा वाढवते.

आजवर यच्चयावत दिनदर्शिकांना न्याय मिळालेला दिसायचा उसाच्या गुऱ्हाळात. त्यावर्षी छापलेल्या बहुतांश चित्रांच्या दिनदर्शिकांची तिथे जत्रा असे, ज्यामुळे गुऱ्हाळाच्या भिंती झाकलेल्या असत. आजकाल मात्र त्यांची जागा परदेशी शीतपेयांच्या जाहिरातींतील तारे-तारकांनी आणि क्रीडापटूंनी घेतलेली दिसते.

घरातही या दिनदर्शिकांचा सर्वात जास्त वापर होताना दिसतो तो गृहिणींकडून. भिंतीवरच्या दिनदर्शिकांची नुसती पाने उलटली तरी त्यावर दुधाचे हिशोब, धोब्याचे हिशोब,गॅस सििलडर जोडल्याची तारीख त्या महिन्यातील कुणाचे वाढदिवस कुणाकडचा काही कार्यक्रम वगैरे नोंदी ठेवण्यासाठी गृहिणींना दिनदर्शिकेपेक्षा उत्तम आणि सुलभ साधन नाही असे म्हणायला हरकत नसावी. दिनदर्शिकांच्या विश्वात अभूतपूर्व क्रांती घडवली ती एका अत्यंत कल्पक अशा मराठी उद्योजकाने, कारण यापूर्वी एखाद्या उत्पादनाची जाहिरात करण्यासाठी ज्या दिनदर्शिकेचा वापर सुरू झाला ती दिनदर्शिकाच स्वत: एक उत्पादन बनली आणि ते उत्पादन म्हणजेच दिनदर्शिका विकण्यासाठी त्याचीच जाहिरात सुरू झाली. त्या उत्पादकाने त्याचे बारसे करून त्याला छानसे नावही दिले. जे आज दिनदर्शिकेचा पर्यायी शब्द बनलेय. अर्थात ते मराठी व्याकरणानुसार विशेषनाम बनले आहे, पण यापूर्वी भाषाप्रभू सावरकरांनी सर्रास वापरल्या जाणाऱ्या कॅलेंडर या इंग्रजी शब्दाला दिनदर्शिका असा अत्यंत समर्पक मराठी  शब्द सुचवला, जो आज बऱ्याच प्रमाणात रूढही झालाय. स्वत:चे खास असे विशेषनाम असलेल्या नव्या दिनदर्शिकेमध्ये इंग्रजी दिनदर्शिकेसोबत मराठी पंचांगाची सांगड अशा विलक्षण पद्धतीने घातली गेली की आपले मराठी सणवार किंवा विशिष्ट तिथी बघण्यासाठी पूर्वीचे ते लांबोडके आणि काहीसे क्लिष्ट पंचांग बघण्याचा त्रासदायक प्रकार सोपा झाला. प्रत्येक महिन्यावर नजर टाकली की त्या महिन्यातील पौर्णिमा, अमावास्या, सूर्योदय, चंद्रोदय, संकष्टी, गुरुपुष्यसारख्या तिथी पटकन समजू लागल्या. शिवाय संतमहंत, नेत्यांची जयंती, पुण्यतिथी आणि अनेक उत्सव याची माहिती यातून सहजपणे मिळत गेली. सर्वात महत्त्वाचे म्हणजे दिनदर्शिकेच्या मागील पानाचाही अत्यंत कल्पकतेने वापर केला गेला. त्यावर मिनी पंचांग मांडले गेले, अगदी त्या त्या महिन्याच्या मुहूर्त आणि राशीभविष्यासह.. त्याशिवाय दिनदर्शिकेचा उपयोग फक्त तारीख-वार दाखवण्यासाठी असतो ही संकल्पना जवळपास मोडीत काढून ते वाचनीयसुद्धा व्हावे या हेतूने अनेक प्रथितयश लेखकांचे निरनिराळ्या विषयांवरचे लेखही छापले जाऊ  लागले. तेही कमी पडले म्हणून की काय, त्या त्या ऋतूतील संभाव्य आजारांसाठी घरगुती औषधे, योगासनांचे प्रकार घरगुती तसेच सौंदर्यासाठीच्या टीप्स पाककृती त्यांच्या स्पर्धा.. यावरही कडी म्हणजे रेल्वे आणि बसगाडय़ांचे वेळापत्रक.. अक्षरश: ‘देता किती द्याल तुम्ही आम्हास १२ पानांवरी?’.. असे विचारायची पाळी आता ग्राहकांवर आली. यावरचा सर्व मजकूर अगदी बारकाईने आणि फुरसतीने वाचायचे म्हटले तर किमान महिना तरी लागेल. अशा अभिनव कल्पनेच्या दिनदर्शिकेला मिळालेला उदंड प्रतिसाद पाहून स्वत:चे नाव घेऊन अनेक दिनदर्शिका बाजारात आल्या आणि अजूनही दरवर्षी त्यात भर पडतेच आहे.

एकेकाळी दिनदर्शिका ही पैसे मोजून विकत घ्यायची वस्तू आहे, असे कुणी म्हणाले असते तर त्याला इतरांनी कदाचित वेडय़ात काढले असते. कारण जानेवारी महिन्यातील खरेदीवर ते मोफतच मिळणार हा दंडकच होता, पण आता ते इतर वस्तूंप्रमाणेच एक उत्पादन बनल्यामुळे जानेवारी महिन्याच्या आधी किंबहुना दिवाळीनंतरच ते बाजारात येते आणि आपण ते विकत घेतो. इथे छपाई झालेल्या या दिनदर्शिकांनी आता तर पार सातासमुद्रापार भरारी मारून परदेशातील भारतीय घरांमध्ये जागा पटकावली आहे.

आजही काही सेवाभावी संस्था, कंपन्या, बँका, सरकारी उद्योग आपल्या प्रसिद्धीसाठी दिनदर्शिका छापतात, त्याचे वाटप करतात; तरीही प्रत्येकाला विकत घेतलेल्या आणि त्यातही वर्षांनुवर्षे सवयीचे झालेल्या जणू काही स्वत:च्या ब्रँडच्या दिनदर्शिकेचीच गरज वाटते आहे. खरं तर आजच्या हायटेक जमान्यात घडय़ाळात, मोबाइलमध्ये एवढेच काय टी.व्ही.च्या रिमोटमध्येसुद्धा दिनदर्शिका म्हणजे निदान वार, तारीख बघणे शक्य झालेय.

काळ बदलतोय.. आणि  काळाबरोबर आपली मानसिकताही बदलते आहे. म्हणूनच आपण काळ दर्शवणारी मोफत मिळालेली दिनदर्शिका घराच्या भिंतीवर लावणे नाकारून पदरमोड करून घेतलेली दिनदर्शिका घराच्या भिंतीवर लावायचा निर्णय घेतो तेव्हा तिची उपयुक्तता तसेच गृहसजावटीचाही विचार करतोय.
कालाय तस्मै नम: दुसरं काय?

अलकनंदा पाध्ये  alaknanda263@yahoo.com

First Published on January 13, 2018 5:31 am

Web Title: calendar should be hang on wall