काळ आणि वयाप्रमाणे प्रत्येकाचे अंगणाशी असणारे नातेसंबंध बदलत होते. जसजसं मोठं होऊ लागलो तसतशी त्याची जाणीव होत गेली. चाळीत किंवा आजूबाजूच्या वाडीत परस्परांत त्या काळात ठरलेल्या अनेक प्रेमविवाहात, तिथल्या झाडांचा, विहिरीचा म्हणजेच तात्पर्याने अंगणाचा सहभाग फार मोठा होता.

मालाड हे तसं वाडय़ा-वस्त्यांचं गाव! मध्यभागी कौलारू, बैठी टुमदार घरं किंवा चाळी आणि चार बाजूला नारळी तसेच असंख्य फळझाडं आणि फुलझाडांनी नटलेलं अंगण! ज्याची खासगी मालमत्ता होती तो स्वत:च्या मर्जीने वाडीतील झाडांची रचना करे. पण चाळीपुढच्या अंगणात वैविध्य असायचं. प्रत्येक भाडेकरू आपापल्या आवडीची झाडं आपल्या घरापुढे लावायचा. नावाला आपलं त्यांची वाडी, त्यांचं अंगण असायचं. पण आम्ही मुलं मात्र कोणत्याही वाडीत किंवा अंगणात बिनदिक्कत जायचो. कुठेही आम्हाला मनाई नव्हती. हल्ली सर्वधर्मसमभावाच्या आपण एवढय़ा गप्पा ऐकतो, पण त्या काळची अंगणं हे त्याचं मूíतमंत प्रतीक असायचं. अगदी कोणताही गाजावाजा न करता! मुळात जातीशी वगैरे ओळखच नसायची. सर्व मुलं-मुली मनसोक्त हुंदडायचो. अंगणावर जणू मुलांचा मालकी हक्कच असायचा. वाळवणं वगैरे घातली की कधी एकदा ती काढतात असं वाटायचं. काही मुलं तर इतकी द्वाड होती की, वाळवणातलं बरचसं गायब व्हायचं. उदा. चिकवडय़ा, पापड.. बायांचा जीव नकोसा व्हायचा, पण त्याही हे तितकं गंभीरपणे घ्यायच्या नाहीत. त्यातल्या त्यात मुली म्हणजे जरा सोज्वळ, सभ्य, म्हणून मग आम्हाला वाळवणं राखायला बसवायचे. आम्हाला असं म्हणण्याचं कारण म्हणजे सगळय़ा चाळीचे कुरडया-पापड एकत्रच व्हायचे. कावळे, इतर पक्षी यांच्यापासून वाचविण्यासाठी वर पांढरं पातळ कापड व छोटे-छोटे दगड लावायचे. आम्ही मुली आपल्या उगाचच एखादी काठी हाताशी धरून एखाद्या झाडाच्या सावलीत कादंबरी, कथासंग्रह वाचत बसायचो किंवा पत्ते खेळत नावापुरती राखण करायचो. खिशात रायआवळे भरलेले असायचे. मधूनच झाडावर चढून पिकलेला पेरू शोधून आणायचो. बर्फाचे गोळे हा तर आमच्या बालपणाचा अविभाज्य भाग होता. त्याच्या गाडीची छोटी घंटा ऐकायला आमचे कान आतुर असायचे. अशी राखण, अशी कामं सांगितली की, आयांकडून जास्त बक्षिसी मागून गोळे खायचे. दर दोन मिनिटाला त्याच्याकडून वर रंग घालून आणायचा आणि तोही न कंटाळता आम्हाला रंग व बर्फ द्यायचा. गोळे तर रोजचेच, पण कधी तरी बदल म्हणून मग मिल्क कोिल्ड्रक्स़  एकीने पातेलं, एकीने दूध, एकीने साखर अशी वाटणी असायची आणि मग बर्फाचे रंगीत गोळे त्यात बुडवून गारेगार रंगीत दूध प्यायचं. गोळे खाल्ल्यावर सारख्या लाल जिभा काढून एकमेकींना दाखवायच्या. हल्ली आरोग्य, हायजीन असे अनेक शंभर विचार डोक्यात येऊन एखादा बर्फाचा गोळा खायची वेळ आली तर नको वाटतं. आणि खाल्लं तरी तब्येतीच्या काळजीने पूर्वीसारखी त्याची मजा घेता येत नाही. त्या वेळचे गोळे खाणं आठवलं तरी अजूनही त्याची मजा वाटते.

children holidays, holidays, Parents worry,
सांदीत सापडलेले : सुट्टी!
chaturang article, maintain relationship, good relations, avoid assuming, assuming in relationship, assume, stay away from toxic people, spreading bad thoughts in relationship, husband wife
जिंकावे नि जगावेही : नात्यांमधला नीरक्षीरविवेक!
How to make solkadhi marathi recipe
recipe : चिकन, मटणाच्या जेवणासह हवी थंडगार सोलकढी? मालवणी पद्धतीने कशी बनवायची जाणून घ्या
why Sleeping Pills Rising Among Young Adults
झोपेच्या गोळ्या निद्रानाशावरचा अंतिम उपाय आहेत का? झोपेच्या गोळ्या शक्यतो घेऊ नका असं डॉक्टर का सांगतात?

मे महिना म्हणजे तर नात्यातल्या भावंडांची प्रत्येक घरी भर पडायची आणि त्यातल्या त्यात दादर, गिरगावकडची मुलं तर हमखास अंगणाच्या आकर्षणामुळे आपापल्या नातेवाईकांकडे यायची. एक तर ऊन अगदी जीवघेणं असायचं. मग दुपारभर अंगणाच्या सावलीत पत्ते आणि बर्फाचे गोळे. नुसता धुमाकूऴ  मोठी माणसेही आमच्यात सामील होऊन गोळे खायची. आयांना गोळे खाताना पाहून आम्हाला खूप मजा वाटायची आणि सारखं उगाचच हसत बसायचो.

बालपण आणि अंगण या दोन गोष्टींचा मी कधीच वेगळा विचार करू शकत नाही. आता विचार करते तेव्हा लक्षात येतं, की घरातल्या प्रत्येकाच्या जीवनाचा अंगण हा अविभाज्य भाग होता. वातानुकूलित यंत्र तर सोडाच, पण पंखेही फारसे नसायचे. उकाडा असहय़ झाला की उघडय़ा अंगाने घामोळय़ावर जानवे मागेपुढे फिरवत फेऱ्या घालणारे वडील, पातळाचा ओचा, पदर मुद्दाम ओला ठेवून तो चेहऱ्यावर, मानेभोवती फिरवणारी आई. सगळय़ा भावंडांना आवर्जून सुती पांढरे कपडे असायचे, घराघरांतून हातपंखे बाहेर पडायचे. अंगणातलं सर्वात विसाव्याचं ठिकाण म्हणजे विहीर. तिचा मोठा कठडा तर होताच, पण दोन्ही बाजूला धुण्याच्या सोयीसाठी फरशा घालून कोबा केलेला असायचा. त्यांच्या चारी बाजूला खांब लावून वर शाकारणी आणि त्याचा गरमपणा जाणवू नये म्हणून मांडव करून, वर वेगवेगळय़ा वेली चढविलेल्या कृष्णकमळाचा वेल तर अजूनही डोळय़ासमोर जशाचा तसा उभा आहे. उंच उंच पसरत जाणारा हिरवागार वेल, नि ती काळसर निळी मंद मधाळ सुगंधाची देखणी फुलं. भानच विसरायला व्हायचं. ती फुलं काढायची जणू स्पर्धा लागायची. आजीला पूजेसाठी आणि शाळेत बाईंसाठी कधी फूल काढतोय असं व्हायचं. हल्लीच्या मुलांना कृष्णकमळाचं फूलच माहीत नाही. एका कवितेत उल्लेख होता म्हणून मुलांना ती प्रतिमा समजण्यासाठी मी ते फूल शोधायचा खूप प्रयत्न केला. अनेक ओळखीचे फूलवाले, त्यांना सांगून पाहिलं, पण शेवटपर्यंत ते फूल मिळालं नाही. मधे मात्र एकदा मालाडच्याच मैत्रिणीने आग्रहाने लावून अणि आवर्जून वाढवलेला कृष्णकमळाच्या संपूर्ण फुलांचा वेल पाहून देहभान हरपलं.

.. तर काय सांगत होते, आमच्या त्या अंगणात तो वेल पसरलेला आणि विहिरीच्या ओटय़ावरून धुण्या-भांडय़ाचे पाणी जायला एक वेगळी चिंचोळी वाट केलेली असायची आणि त्या पाण्यावर छोटी खळी करून केळी लावलेली आणि मधेमधे अळूची पाने, त्या केळीच्या झाडांचा गारवा, हिरवेपणा, त्याची वाढ, त्यावरचा केळीचा लोंगर मग त्यावर सारखं लक्ष ठेवणं. घड पिकल्यावर पूर्ण वाडीत त्याची वाटणी व्हायची. पेरू, जांभूळ, आंबा, चिकू, सीताफळ.. किती फळझाडं होती. सकाळ-संध्याकाळ अंगणाचा केर काढला जायचा. सकाळ-संध्याकाळ सडा असायचा. आई मग घाईघाईत रांगोळी घालायची. प्रत्येक घरापुढे रांगोळी असायचीच, प्रत्येकाची. आपापल्या घरासमोरच्या अंगणाची आणि झाडांची काळजी घ्यायची.

वर्षांतून एकदा अंगण पुन्हा नवं केलं जायचं. तो एक मोठा सोहळाच असायचा. तेव्हा मात्र आम्हा मुलांचं अंगणातलं वास्तव्य तीन-चार दिवस बंद असायचं. मग पुढच्या गॅलरीत मुक्काम! पण तोही थोडाच. कारण अंगण बनवताना बघणं ही सुद्धा मजाच असायची. गडी उखळ, कुदळ, फावडी घेऊन यायचे. कायमच्या झाडांच्या जागा सोडून सगळं उकरून काढायचे. पुन्हा नवी, चांगली माती घालून ते सारखं करायचे. मग त्याची चोपणी असायची. ती बघताना तर मजाच यायची! सारखं त्या गडय़ांच्या मागून मागून आम्ही फिरायचो. फारच कावला, तर तो आम्हाला ओरडायचा. आमची लुडबुड मात्र त्याच्या मागे चालूच असायची. मोठी पुरुष मंडळी जातीनं देखरेख करून अंगणाची पातळी समान होते की नाही, भराव नीट झाला का, इत्यादी गोष्टी बघायची. आम्हाला मात्र ते अंगण कधी तयार होतंय, असं झालेलं असायचं. मग त्यावर शेणाचा खळा घालून गडी ते अंगण इतकं सुरेख, रांगोळीसारखं सारवायचे की पूर्ण अंगण झाल्यावर त्या देखण्या अंगणावर दोन-तीन दिवस खेळायलाही नको असे वाटायचे. पुन्हा माती उखडली जावून त्या जाळीदार रेषा नाहीशा होतील, म्हणून एक दोन दिवस कमी धुमाकूळ करायचा, पण मग मात्र ये रे माझ्या मागल्या!

संध्याकाळच्या वेळेला अगदी अबाधितपणे मुलांचाच हक्क अंगणावर असायचा. झाडं छान वाढलेली होती. त्यामुळे लपाछपी, गंडा, एैसपैस, लंगडी, लगोऱ्या, खो-खो, आटय़ापाटय़ा, खांब-खांब खांबोळ्या कधी तरी सागरगोटे असे खेळ चालायचे. क्वचितच क्रिकेट आणि तेव्हा मात्र मुलांचं वर्चस्व असायचं. ऋतूंप्रमाणे आणि परीक्षांच्या वेळापत्रकानुसार खेळांचे प्रकार बदलत जायचे. आत्ता हे थोडेसेच खेळ आठवले, पण काही काही खेळांना तर नावच नसायचं. उत्स्फूर्तपणे रोज एखादा नवीन खेळ शोधला जायचा. कोणी तरी, कधी तरी, गावाहून किंवा शहरातल्या एखाद्या मित्र-मैत्रिणींकडून नवा खेळ शिकून यायचा आणि मग तो सगळय़ांना समजावून सांगायचा. लपाछपीमध्ये ज्याच्यावर राज्य असायचं, त्याची रडकुंडीची अवस्था असायची. झाडे आणि कट्टय़ांच्या मागून अंदाजही यायचा नाही, शिवाय प्रत्येक घराची कोळशाची पिंपं असायची. ती तर लपायची हमखास जागा होती. तेच थोडं की काय, पण थोडं मोठं झाल्यावर आम्ही इतर वाडय़ा आणि अंगणातही धूम ठोकायचो. अतिच झालं आणि राज्य असणारा रडकुंडीला आला की, ठरवून मग गटागटांनी प्रकट व्हायचं. आज त्या प्रत्येक वाडय़ा-चाळी येथील अंगणांच्या जागी उंच इमारती झालेल्या बघताना घशात आवंढा येतो, नि पोटात खड्डा पडल्यासारख होतं. आमच्या लहानपणचे एक-दोन खेळ सोडले, तर आज मुलांना ते खेळही काय, त्यांची नावंही माहीत नाहीत आणि दुर्दैवाने ते खेळ खेळायला आज अंगणही नाही.

प्रत्येक ऋतू, सणवार, मुलांच्या सुट्टय़ा, याप्रमाणे अंगणाचे रूप-स्वरूप बदलायचं. झाडं तीच असायची पण उद्योग वेगवेगळे! बदलते ऋतू आणि फुलझाडांविषयी किती लिहिलं तरी संपणार नाही अशी परिस्थिती आहे. प्रत्येक ऋतूत अंगण वेगळं सजायचं. फुलझाडांचं किती बोलकं नातं असतं ऋतूंशी! तुळस, पांढरी तगर, डवल तगर, तेरडा, सदाफुली, गुलबक्षी, कोरंटी, कुंदाची फुलं, पांढरा-पिवळा सोनटक्का, जास्वंदं व त्याचे अनेक प्रकार, ही तर प्रत्येकाच्या दारात असायचीच. पण आवडीप्रमाणे मग प्रत्येक जण गुलाब, मोगरा, जाई-जुई, सायली, चमेली, शेवंती, चिनी गुलाब असे लावायचे. ऋतूंप्रमाणे त्यांचे बहर असायचे. सगळय़ांना फुलं वाटली जायची. मुलींचे केस कापण्याची पद्धत नव्हतीच. त्यामुळे घरोघरी लांब शेपटे, वेण्या, खोपा, आंबाडे यावरच फुले माळायची. विशेष लांब केस असलेलीचं कौतुक होऊन अशा मुलीला किंवा वहिनीला, काकूला मुद्दाम दारातल्या फुलांचा गजरा किंवा वेणी मिळायची. इतकं निरागस आणि सात्त्विक वातावरण! द्वेष-मत्सराची तर आम्हा मुलांना ओळखंच नसायची. गरिबी-श्रीमंतीशी तर तोंडओळखही नव्हती. मोठी माणसं कदाचित त्या विभागाकडे बघत असावीत. पण आम्ही मुलं मात्र रोजचा अभ्यास, खेळणं, हुंदडणं यातच मग्न असायचो. खाण्या-जेवण्यापुरतं जेमतेम घरात जायचं. बाकी शाळेचा वेळ सोडला तर बराचसा वेळ हा गॅलरी आणि अंगणातच जायचा.

पावसाळय़ात खेळायला जास्त संधी मिळायचीच नाही. पण चिंब भिजण्याचा आनंद मात्र भरपूर घेतला. झाडातून तुरळक  पडणाऱ्या पावसात भिजायचं. त्या वेळच्या पावसाळय़ातल्या श्वासाश्वासात भरून घेतलेल्या मातीचा गंध आजही विसरता येत नाही. तोच गंध आजही प्रदूषणाच्या काळात आम्हाला तारून नेत असावा. पहिल्या पावसाबरोबर तो मातीचा गंध-दरवळ कितीही भरभरून घेतला तरी समाधानच व्हायचं नाही.

श्रावणात अंगण फुलझाडांनी नटून जायचं. मुलींचा सर्वात आवडता कार्यक्रम म्हणजे पत्री गोळा करणे. हरताळका, गणपती, गौरी, मंगळागौर यांसारख्या प्रत्येक पूजेला घराघरांतून आया मुलींना पिटाळायच्या. मग परडय़ा घेऊन पळत जायचं आणि स्वत:चं अंगण तर सोडाच, पण काही दुर्मीळ झाडांच्या पानांसाठी ओळखीच्यांच्या शेतात, वाडीत घोळक्या घोळक्यांनी जायचं, जास्तीत जास्त पत्री गोळा करून आईला खूश करायची स्पर्धा लागायची. ज्याच्याकडे जायचो, तेही भरपूर पानं काढायला परवानगी द्यायचे. शिवाय हातावर काही तरी खाऊ मिळायचा तो वेगळाच.

उन्हाळय़ामध्ये अंगणात बायकांची वाळवणं तर दुपारी असायचीच. सकाळची कामं लवकर आटोपून हळद, तिखट कुटण्याचा एक कार्यक्रम असायचा. हे सर्व घरीच करायची तेव्हा पद्धत होती. कष्ट होतेच, पण एकोपा असल्यामुळे सगळय़ा जणी हसत-खेळत, गप्पा मारत एकत्र काम करायच्या. त्यामुळे मनही हलके व्हायचे. शिकेकाई कुटायचाही एक सुगंधी कार्यक्रम असायचा. या सगळय़ा कुटाकुटीत एक सामूहिक िशकाचा कार्यक्रम असायचा आणि त्याचीही मजा आम्ही लुटायचो. लग्नकार्य किंवा मुंजीसारखे मोठे कार्य एखाद्याच्या घरी असले की ते सगळय़ा चाळीचेच कार्य असायचे. नावापुरती असलेली मधली दारे उघडली जायची. वयाप्रमाणे चाळीतल्या बायकांची कामाची वाटणी व्हायची. काही खरेदी, काही रुखवत मग या सगळय़ा गोंधळात त्या लग्न ठरलेल्या मुलीची थट्टा चालायची. जावई मधून कधी आलाच तर त्याला बघण्यासाठी दाराबाहेर आणि दाराआडून जी काही तारांबळ उडायची की सांगता सोय नाही. ती मजा काही औरच असायची. सगळय़ा चाळीचा तो जावई असायचा. न ठरवता, न सांगता अशी एकजिनसी, एकजीव झालेली ती नाती होती. निरपेक्ष आणि सात्त्विक. सगळय़ांची सुखं-दु:खं एक होती, वाटली जात होती. बायका दळण दळताना, निवडणं करताना, धुणी धुताना मनं मोकळी करायच्या. पुरुष कधी मुद्दाम गप्पा मारायला, चहा प्यायला एकमेकांकडे यायचे. आवडीचे किंवा खास पदार्थ एकमेकांकडे पाठवले जायचे. यासाठी मुलांनाच पिटाळायला जायचं आणि मुलंही आवडीने जायची. कारण रिकाम्या भांडय़ात दुसरा पदार्थ आणि हातावर खाऊ असायचाच. पुरुष क्वचित कॅरम किंवा पत्ते एकत्र खेळायचे. आम्ही मुलं मात्र पत्ते कुटायचो. किंबहुना, मला आजही वाटतं की आमच्याइतके पत्ते आणि त्याचे अनेक खेळ आज माहीतही नसतील.

होळी आणि कोजागरीचं अंगणातलं जागरण हे तर कधीच विसण्यासारखं नाही. पुरुष, स्त्रिया आणि मुलं, आपापल्या पद्धतीने एकत्र जमून आनंद लुटायची. खाण्यापिण्याच्या चमचमीत पदार्थाची चंगळ असायची. भेळ तर अविभाज्य भाग होता. कोजागरीला एखादा गाण्यांचा कार्यक्रम असायचा. पण त्यातला मोठय़ा माणसांचा सहभाग सोडल्यास आम्ही मुलं मात्र मसाला दुधाची वाट पाहत असायचो. बायका मूड लागला तर सारीपाट खेळायच्या आणि पहाटेपर्यंत जागायच्या.

आमचे चाळीचे मालक बदलल्यावर, दोन गोष्टी आम्हा मुलांच्या दृष्टीने प्रामुख्याने नव्याने आल्या, त्या म्हणजे त्यांचा मोठा झोपाळा आणि खंडू कुत्रा. परिचयाचे नवीन पाठ संपताच तो झोपाळा सगळ्यांचा झाला आणि खंडय़ाही. मांजरं तर किती तरी प्रकारची असायची. अभ्यासाचा कंटाळा आला की मांजरांशी खेळायचं. शेजारचं मांजर तर त्यांची पूजा होऊन घंटा वाजायच्या वेळेला, नैवेद्यासाठी बरोबर हजर असायचं.

सगळ्यांचंच त्या अंगणाशी वेगवेगळं नातं होतं. आणि प्रत्येकाला ते आपलंच वाटत होतं. हेच तर त्याच वैशिष्टय़ होतं. वयस्क लोकांचं तर हमखास विरंगुळ्याचं ठिकाण होतं. रविवारी किंवा सुट्टीच्या दिवशी पुरुष आणि मुलांचा विहिरीवर सामुदायिक पोहण्याचा कार्यक्रम असायचा. इतर वाडय़ांमधूनही मुलं यायची. पोहण्याच्या जणू स्पर्धाच लागायच्या. आम्हा मुलांची रविवार सकाळ तर विहिरीवरच असायची. बघण्यासाठी हीऽऽ गर्दी जमायची. एखाद्या भित्र्या मुलाला मुद्दाम पाण्यात ढकलून मग शिकवलं जायचं. माझा डबा बांधून पोहण्याचा पहिला आणि शेवटचा प्रयत्न, याच विहिरीच्या साक्षीने झाला. काही बायकाही पोहण्यात तरबेज होत्या आणि त्या संधी साधून पोहायच्या. गावात मोठी विहीर झाल्यावर मग सामुदायिक गणेशविर्सजन तिकडे होऊ लागलं. पण काही र्वष गणपतीविर्सजन अंगणातल्या विहिरीतच झालं. तेव्हाच्या आरत्या, गणपती पाण्यात सोडताना येणारं रडू, काकडी, खोबरं, पोहय़ाची खिरापत यांपैकी काहीच विसरण्यासारखं नाही. आईचा डोळा चुकवून मध्येच आम्ही कासव आणि मासे बघायला विहिरीवर पळत असू. अर्थातच थोडं थांबावं लागे, वाकून बघावं लागे आणि तोपर्यंत आमच्या आयांचे जीव अगदी कासावीस होत असत.

विहिरीवरच्या दगडांवर आम्हा मुलींचा मुख्य कार्यक्रम म्हणजे मेंदी वाटणं. आजूबाजूला वाडय़ांमधून मेंदीची पानं गोळा केली जात. मग त्यामध्ये कात काय, विडय़ाची पानं काय, काय काय घालून ती वाटायची घाई आणि वाटताना मग

कोणाचा हात जास्त रंगतोय ते बघायचीपण घाई. मग रात्री मेंदी लावण्याचे कार्यक्रम. सकाळी पुन्हा कोणाची मेंदी किती रंगली ते पाहण्याची उत्सुकता असायची.

काळ आणि वयाप्रमाणे प्रत्येकाचे अंगणाशी असणारे नातेसंबंध बदलत होते. जसजसं मोठं होऊ लागलो तसतशी त्याची जाणीव होत गेली. चाळीत किंवा आजूबाजूच्या वाडीत परस्परांत त्या काळात ठरलेल्या अनेक प्रेमविवाहात, तिथल्या झाडांचा, विहिरीचा म्हणजेच तात्पर्याने अंगणाचा सहभाग फार मोठा होता हे आम्हाला हळूहळू कळलं. खरंच! सर्वाच्या सर्व बदलत्या वयाशी, भावस्पंदनांशी किती जवळचं नातं होतं त्या अंगणाचं! माहेरवाशिणींची केलेली पाठवणी, सासुरवाशिणींचं केलेलं स्वागत या सगळ्याला अंगण साक्षी होतं. इथल्या सासुरवाशिणी तर संसाराची काही गुपितं, पदार्थाच्या कृती यांची देवाणघेवाण इथेच करीत. स्वत:च्या झाडांच्या काढलेल्या फुलांच्या बनवलेल्या वेण्या आणि गजरे हा तर सुगंधी आणि आनंददायी प्रकार होता. पहिलं धडपडणारं पाऊल इथल्या सारवलेल्या अंगणावरच इथली चाळीतली मुलं टाकत असत. लाल बोळक्यांशी खेळत, चिऊ-काऊचे घासही या मुलांनी इथेच घेतले. उगवता आणि अस्ताचा सूर्य नि त्या वेळेचं सोनेरी अंगण आम्ही डोळे भरून पाहायचो. चंद्राच्या चांदण्याचा आनंदही लुटला. सर्वात कहर म्हणजे तिथल्याच मातीची छोटी-छोटी भांडी बनवून, ती उन्हात वाळवून, त्याच्यात आयांकडून खरेखुरे डाळ-तांदूळ आणून खेळलेली भातुकली तर आम्ही जन्मात विसरणार नाही. आमचे भातुकलीचे सर्व लाड या अंगणाने पुरविले. तसंच कायम लक्षात राहणारं म्हणजे सामुदायिक गौरीचं हळदी-कुंकू! त्या वेळेला नटलेलं-सजलेलं अंगण, आंबेडाळ-पन्ह्य़ाची न विसरता येणारी चव! दुसरी कायम लक्षात राहणारी गोष्ट म्हणजे, भोंडला व त्याची गाणी! हत्तीच्या चित्राभोवती वेगवेगळ्या अंगणांत जाऊन म्हटलेली भोंडल्याची गाणी, खिरापत खाणं आणि मग उशिरा घरी येणं, तिथल्या गमती आईला सांगणं!

अंगणातल्या झाडाखालीच मुक्काम ठोकून वि. स. खांडेकर, ना. सी. फडके यांच्या कादंबऱ्यांचा फडशा पाडला. स्वामी, मृत्युंजयाची तासन् तास पारायणं केली. बाबासाहेब पुरंदऱ्यांची शिवचरित्रं देहभान विसरून वाचली. नारायण धारप, झुंजारराव यांच्या शौर्य आणि रहस्यकथा भान विसरून वाचल्या. पदवी परीक्षा किंवा त्यापुढील परीक्षांचा अभ्यास घरातील लहान जागेत किंवा महाविद्यालयाच्या वाचनालयात करणं अशक्य वाटलं, तेव्हा या अंगणानेच मला अभ्यासात मोलाची साथ दिली. सकाळी खूप लवकर उठून, अंगणाचा केर काढून, सडा घालून, खुर्ची टाकून सूर्योदयानंतर अंगणाची इतर लगबग सुरू व्हायच्या आत इथेच शांतपणे अभ्यास केला. इथेच संध्याकाळच्या शांत वेळेत अभ्यासाची तंद्री लागायची. माझ्या काव्यलेखनाकरिता नव्या जाणिवांची काव्यातून झालेली आविष्कृती, हे सारं त्या अंगणाचंच श्रेय आहे. माझ्या मनाचा हळुवारपणा, मार्दव, सोशिकता टिकवण्यासाठी, माझ्या या अंगणाचा फार-फार मोठा, पण एक अबोल आणि सखोल सहभाग आहे, हे मला आता चांगलंच जाणवू लागलं आहे. माझ्या काव्यलेखनाकरिता अनेक उत्कट अनुभवांचं प्रेरणास्थान आणि साक्षीदारही हे अंगणच आहे.

लहानपणी अंगणात काळोख झाल्यावर भीती वाटायची. मोठेपणी त्या काळोखाशी, त्यांच्या स्पंदनांशी तिथल्या नीरवतेशी, वेगळ्या सुगंधाशी एक वेगळीच मत्री जमत गेली. उन्हाळ्यात बरेचदा रात्री अंगणात झोपणं व्हायचंच. पण चांदण्या रात्री अंगणात निवांत आकाशाकडे बघण्याचा आनंद काही वेगळाच होता. दिवसाच्या प्रत्येक घटकेला त्या अंगणाचं रूप बदलायचं. संध्याकाळी निळ्या आकाशाकडे बघत बघत हळूच कातरवेळेला अंधारणारं अंगण मनात उगाचच काहूर माजवायचं. एक अनामिक व्याकूळता दाटून यायची. कित्येकदा अकारण आणि सकारण आलेल्या अश्रूंना या अंगणात मोकळी वाट करून दिली आहे.

या अंगणाचं सारंच लक्षात ठेवण्यासारखं आहेच. पण चिरस्मरणात राहतो तो तिथला पारिजातकाचा सडा! अंगणात विहिरीकडे किंवा पायवाटेवर दोहो बाजूंनी पारिजातकाची उंच, डेरेदार झाडं होती. पहाटेला पक्ष्यांच्या आवाजाबरोबरच घराच्या आत तो अनोखा सुगंध येऊन जाग आणायचा. लहानपणी तर ती फुलं गोळा करून आम्ही दमायचो, पण फुलं संपायची नाहीत. मग त्याचे हार करायचे, पण तेही नाजूकपणाने! जीवनातला नाजूकपणा या फुलांनीच शिकवला असावा. हातांना लागलेला तो केशरी रंग! त्याची कडवट उग्र चव! मोठेपणी कळलेली सत्यभामेची पारिजातकाची गोष्ट! अक्षरश: मोती पोवळ्यांच्या राशी अंगणात विखुरलेल्या असायच्या. तिथून पायवाट असल्याने जाणं तर अपरिहार्यच असायचं. खेळतानासुद्धा आम्ही कडेकडेने उडय़ा मारून, फुलांना न दुखावता खेळायचो. परिजातकाचं झाड हलवून त्याचा सडा पाडणं, तो निरखून बघणं आणि गंध भरभरून घेत ती फुलं गोळा करणं यासारखा सुंदर, सुगंधी नि समृद्ध अनुभव क्वचितच असेल. मोठेपणी त्यातल्या तरल सौंदर्याची जाणीव झाल्यावर मला तो पडलेला सडा, मोती पोवळ्यांनी भरलेली ती पायवाट सरूच नये असं वाटायचं. ऊन येऊच नये, फुलं कोणी उचलूच नयेत असं वाटायचं. ठरवून आखणी करून मनोरंजन आणि नेत्रसुखासाठी बनवलेल्या बागा, उद्यानं, क्षणिक सुख आणि आनंद जरूर देत असतील, पण तोही मोजकाच!

जीवनातल्या प्रत्येक स्पंदनाशी जोडलं गेलेलं अंगण, तिथली अर्निबध अकृत्रिमता, तिथला अकृत्रिम जिव्हाळा आणि आपुलकी जगाच्या पाठीवर कुठेच मिळणार नाही.

मानसी श्रीकृष्णचंद्र जोशी vasturang@expressindia.com